सुरेंद्र शिराळकर
आष्टा येथील आष्टा ते बावची मार्गावरील कुमार मधुकर शिंदे यांनी ऊसशेतीला फाटा देऊन दहा गुंठ्यात दुधी भोपळ्याची लागवड केली आहे.
दररोज १०० किलो दुधी भोपळा मिळत असून सरासरी २० रुपयांप्रमाणे चार महिन्यांत सुमारे दोन ते अडीच लाखांचे उत्पादन मिळेल, असा विश्वास कुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
शिंदे यांनी उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. वेळ, उत्पादन आणि खर्चाचा विचार केल्यास उसाची शेती परवडत नाही. म्हणूनच ऊस शेती सोडून कोबी, फ्लॉवरचे पीक घेतले. या पिकातून त्यांना सुमारे एक लाखाचे उत्पादन मिळाले.
भाजीपाला पिकाबरोबरच तीन एकर क्षेत्रात गोल भोपळा केला होता. गोल भोपळ्यापासूनही अडीच लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. त्यामुळे त्यांनी मे महिन्यामध्ये आपल्या शेताची उभी आडवी नांगरट करून घेऊन शेणखत दिले.
पाच फुटावर सरी पाडून चार फुटावर 'वरून' जातीच्या दुधी भोपळ्याची २० जून रोजी लागवड केली. सुरुवातीला बेसल डोस दिल्यानंतर तणापासून बचावासाठी मल्चिंग पेपर अंथरून घेतला. सुमारे २५ हजार रुपये खर्च करून दुधी भोपळ्याच्या वेलासाठी मांडव तयार केला.
ठिबकच्या साह्याने नियमित विहिरीचे पाणी देण्याबरोबर ठिबकमधूनच रासायनिक खते दिली. वेळोवेळी बुरशीनाशक, कीटकनाशकाची फवारणी करण्यात येत आहे.
शेतीच्या कामामध्ये आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या मदतीने कुमार शिंदे दररोज १०० किलो दुधी भोपळा काढून हा भोपळा आष्टा बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत.
सध्या विक्री चालू असून दरही चांगला आहे. आणखी चार महिने दुधी भोपळ्याचा तोडा चालणार असून दोन ते अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे.
दुधी भोपळा दररोज काढणे गरजेचे आहे. दहा तोडे झालेले एकूण एक टन उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता महिन्यात ७० हजार रुपये मिळाले, चार महिन्यांत सरासरी दोन ते अडीच लाखांचे उत्पादन मिळेल. दुधी भोपळा लागवडी बाबत सोशल मीडियावरून माहिती घेतली. बावची येथील रणजित तळप यांचे मार्गदर्शन मिळाले. - कुमार शिंदे, शेतकरी, आष्टा