मेहरून नाकाडेरत्नागिरी : पावसाळ्यात चिबूड, काकडी व तत्सम फळभाज्यांचे उत्पादन सर्रास अनेक शेतकरी घेतात. परंतु मंडणगड तालुक्यातील शेडवई येथील लहू शांताराम खापरे यांनी कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, गतवर्षी चिबडाचे उन्हाळी पीक घेतले होते.
नोव्हेंबरमध्ये लागवड केली असता फेब्रुवारी, मार्चमध्ये उत्पादन मिळाले. एक एकर क्षेत्रात त्यांनी साडेचार टन विक्रमी उत्पादन घेतले. शिवाय विक्री सुध्दा स्वतःच केली. दर्जा, उत्पन्न चांगले असल्यामुळे आर्थिक फायदा झाला असल्याचे खापरे यांनी सांगितले.
लहू खापरे शिक्षणानंतर मुंबईत गेले, तेथे त्यांना नोकरी मिळाली. परंतु तेथे त्यांचे मन रमले नसल्याने त्यांनी पुन्हा गावाकडची वाट धरली. गावात त्यांची साडेसात एकर जमीन होती. परंतु पाण्याची सुविधा नव्हती.
त्यामुळे एक वर्ष त्यांनी श्रीवर्धन येथील प्रशांत साळुंखे यांच्याकडे मजुरी करत शेती शिकून घेतली. वर्षभरानंतर त्यांनी उधार पैसे घेऊन प्रथम विहीर खोदली व पाईपलाईनने पाण्याची सुविधा केली.
नंतर त्यांनी १०० आंबा, ३०० काजू, ४५ नारळ लागवड केली. खरीप हंगामात ते दीड एकर क्षेत्रावर भात लागवड करतात. गुंठ्याला १०६ किलो विक्रमी भाताचे उत्पादन घेत भात उत्पादनात जिल्ह्यात (२०२१-२२) प्रथम क्रमांक मिळविला होता.
त्याबद्दल कृषी विभागातर्फे त्यांना गौरविण्यात आले होते. भाताबरोबर नाचणी लागवडही करतात. तर, भात काढल्यानंतर विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात. एक एकर क्षेत्रावर ते ३० प्रकारच्या विविध भाज्यांची लागवड करतात. स्थानिक बाजारातच विक्री करत असल्याने त्याचा त्यांना फायदा होत आहे.
तंत्रज्ञानाचा वापरजमिनीची नांगरणी करून ठराविक अंतरावर वाफे तयार करून त्यावर प्लास्टिक मल्चिंग पेपर घातला जातो. त्यामुळे तण उगवून येत नसल्याने काढण्याचा त्रास वाचतो. ठिबक सिंचनाद्वारे पाणी पिकाला दिल्याने पाण्याचा अपव्यय होत नाही. पॉवर टिलरमुळे नांगरणी सुलभ व कमी वेळेत होते. पॉवर स्प्रेअरमुळे फवारणी लवकर होते. यांत्रिक अवजारामुळे वेळ, श्रम, पैशाची बचत होत असल्याचे लहू खापरे यांनी सांगितले.
मिरची तसेच चिबूडचे विक्रमी उत्पादनएका एकरमध्ये साडेचार टन चिबूड तर दहा गुंठ्यात एक टन हिरवी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्यात खापरे यांनी यश मिळविले आहे. साडेतीन ते चार किलो वजनाचे चिबूड त्यांच्या शेतात तयार झाले होते. सरसकट ६० रुपये किलो दराने त्यांनी चिबूड विक्री केली. शिमगोत्सव व रमजानमुळे चिबडाचा खप उत्तम झाल्याने फायदा झाल्याचे सांगितले. मिरचीचीही त्यांनी स्वतः विक्री केली.
शेडवईच्या लाल मातीत सर्व प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेत आहे. योग्य मशागत, सेंद्रिय खतांचा वापर यामुळे भरघोस उत्पन्न मिळते. भाताचे गुंठ्याला सरासरी ४० ते ४५ किलो उत्पादन अपेक्षित असताना (२०२१-२२) मध्ये गुंठ्याला १०६ किलो भात पीक घेतले होते. त्यामुळे जिल्हास्तरावर भात उत्पादनात प्रथम क्रमांक मिळविला होता. शेतीच्या कामात पत्नी, मुले यांचे सहकार्य तर लाभते शिवाय कृषी सहाय्यक जी.एम. पाटील यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. भात, भाजीपाला, चिबूड, मिरची एकूणच प्रत्येक पिकासाठी बियाणे, खत, पाणी, मशागतीचे योग्य व्यवस्थापन असेल तर नक्कीच विक्रमी उत्पन्न मिळते. - लहू शांताराम खापरे, शेडवई, ता. मंडणगड