मेहरून नाकाडेरत्नागिरी: शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आईवडील करत असलेल्या शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आता स्वतःच्या जमिनीत लागवड करून आसपासची जागा भाडेतत्त्वावर घेऊन ते सातत्याने प्रगतीचे पावले टाकत आहेत.
ही कथा आहे, करबुडे येथील विशाल दत्ताराम साळवी यांची. सद्यस्थितीत विविध प्रकारची पिकांची लागवड विशाल यांनी केली. खरीप हंगामात भात, नाचणी, तीळ/कारळा तर भात काढणीनंतर भाजीपाला, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर लागवड तर उन्हाळी बागायतीत आंबा, काजू, शेतीवर आधारित दुग्धोत्पादन तसेच मित्रांच्या मदतीने कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत.
वन्य प्राण्याच्या उपद्रवामुळे भाजीपाला लागवड गतवर्षी केली नव्हती परंतु पुन्हा लागवड करण्याच्या विचारावर ते ठाम आहेत. कोकणच्या लाल मातीत सर्व प्रकारचा भाजीपाला होतो व चांगले उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे विशाल यांनी दोन वर्षांपूर्वी टोमॅटोचे एक टन उत्पादन घेतले होते.
खरीप हंगामात एक एकर क्षेत्रावर भात लागवड तर २० गुंठे क्षेत्रावर नाचणी तसेच ३/४ गुंठे क्षेत्रावर कारळा/तीळ लागवड करत आहेत. विशेष म्हणजे तिळापासून ते तेल काढतात. गीर जातीच्या दोन व दोन म्हशींचे संगोपन करीत असून दररोज दूध डेअरीला पाठवतात.
भाजीपाला व अन्य पिकांमुळे दुभत्या जनावरांना ओला चारा उपलब्ध होत असल्यामुळे दुधात वाढ होत आहे. शिवाय शेणापासून खत, जीवामृत तयार करून शेतीसाठी वापरत आहेत. आंबा, काजू लागवड केली असून दर पाहून विक्री करत आहेत.
ओला काजूगर विक्रीविशाल यांनी ३०० काजू लागवड केली आहे. उत्पादित ओला काजूगर व वाळलेली बी दर पाहून ते विक्री करत आहेत. ओल्या काजूगराला दर चांगला मिळतो शिवाय मागणी अधिक असते. वाळलेली बी संकलित करून बाजारात चांगला दर पाहून विक्री करतात. काजूतून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे विशाल यांनी सांगितले. आंबा मात्र मुंबई मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवित असल्याचे सांगितले.
गांडूळ खत युनिटबागायतीत गांडूळ खत युनिट तयार केले आहे. गांडूळ खत तयार करून शेतीसाठी वापरतात शिवाय टनभर खताची ते विक्रीसुद्धा करतात. दर चांगला मिळत असल्यामुळे मागणी वाढती असल्याचे विशाल यांनी सांगितले. निव्वळ शेतीच नाही तर पूरक व्यवसायामुळे आर्थिक उत्पन्न मिळते, तसेच शेतीसाठी खतही उपलब्ध होते, त्यामुळे पिकाचा दर्जा तर सुधारतो, उत्पन्नही चांगले मिळत असल्याचे सांगितले.
शेती करायचे निश्चित केल्यानंतर पिकांमध्ये वैविध्य शोधण्याचा प्रयत्न केला. गावातील काही जमीन भाडेतत्त्वावर घेऊन लागवड केली. वन्य प्राण्याचा उपद्रव वगळला तर लाल जमिनीत चांगली पिके येतात. आम्ही चार मित्रांनी एकत्रित येत कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. गावठी पक्षी विक्री करतो. मागणी चांगली आहे व दरही उत्तम मिळतो आम्ही मित्रांनी मिळून शेळीपालन व्यवसायही केला होता. शेती असो वा पूरक व्यवसायात परिश्रमाची गरज आहे. वन्य प्राण्याचा उपद्रव होतो म्हणून शेती बंद करणार नाही, त्यापेक्षा वेगळी काही पिके घेता येतील का? याचा अभ्यास करत आहे. माझ्या मित्रांचे तसेच कुटुंबीयांचे सहकार्य शेतीसाठी मिळत आहे. - विशाल दत्ताराम साळवी