रांजणगाव गणपती : खंडाळे येथील शेतकरी कैलासराव नळकांडे यांनी साडेसहा एकर कोथिंबिरीतून २१ लाखांचे विक्रमी उत्पादन घेऊन आजच्या तरुण शेतकरीवर्गापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
खंडाळे (ता. शिरूर) येथील प्रगतिशील शेतकरी कैलासराव नळकांडे यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एका कोथिंबीर वाणाची तब्बल साडेसहा एकरामध्ये पेरणी केली होती.
प्रथमतः जमिनीची चांगली मशागत करून थोड्या प्रमाणावर कोंबड खताचा वापर यामध्ये केला होता. रासायनिक खतांचा योग्य तो वापर केला. कोथिंबिरीच्या वाढीसाठी अनुकूल व पोषक वातावरण असल्याने करपा पडू नये म्हणून चांगली काळजी घेतली.
पारंपरिक शेती करत असताना आधुनिक शेतीची कास धरत सूक्ष्म फवारा सिंचन प्रणालीचा प्रभावीपणे वापर करत गेल्या दोन वर्षात तब्बल ८० लाखांहून अधिक विक्रमी उत्पादन विविध भाजीपाला क्षेत्रातून मिळविले आहे.
परिसरामध्ये नळकांडे परिवाराला 'भाजीपाला एक्स्प्रेस' म्हणूनही नव्याने ओळख मिळू लागली आहे. कोथिंबिरीचा तब्बल साडेसहा एकराचा प्लॉट खरेदीदार भाजीपाला व्यापारी अनिल गावडे व बंटीशेठ खिलारी यांनी तब्बल २१ लाख रुपयांना खरेदी केला आहे.
नवा आदर्श केला निर्माण- पुणे जिल्ह्यातील भाजीपाला पट्ट्यातील सदरचा व्यवहार विक्रमी खरेदीचा व्यवहार मानला जात आहे.- वरुणराजाने चांगली कृपादृष्टी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये यंदा तरी समाधानाचे वातावरण दिसत आहे.- ऊस शेतीबरोबरच परिसरामध्ये भाजीपाला पिकांनासुद्धा चांगले सुगीचे दिवस आलेले यातून दिसते आहे.- प्रगतिशील शेतकरी कैलास नळकांडे, अंकुश नळकांडे, डॉ. रोहिदास नळकांडे, आजोबा पोपटराव आणि युवा शेतकरी अमित नळकांडे, विशाल नळकांडे उपस्थित होते.- आजही एकत्र कुटुंब पद्धतीतून उत्तम शेती करता येते हे या तीनही भावांनी दाखवून देत तरुण शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केला गेला आहे.