Join us

Farmer Success Story : आष्ट्यातील युवा शेतकरी प्रणव २५ गुंठे मिरचीतून काढतोय चार लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:43 IST

आष्टा (ता. वाळवा) येथील तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीची लागवड करून २५ गुंठ्याच्या क्षेत्रात चार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. हिरव्या मिरचीची तोडा अजून सुरू असल्याचे प्रगतशील युवा शेतकरी प्रणव शिंदे यांनी सांगितले.

सुरेंद्र शिराळकरआष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीची लागवड करून २५ गुंठ्याच्या क्षेत्रात चार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. हिरव्या मिरचीची तोडा अजून सुरू असल्याचे प्रगतशील युवा शेतकरी प्रणव शिंदे यांनी सांगितले.

प्रणव शिंदे यांनी शिंदे मळा येथील शेताची मशागत केली. या शेतात शेणखत पसरले. सप्टेंबरमध्ये रोपवाटिकेतून मिरचीची सुमारे चार हजार रोपे आणली, ही रोपे पाच बाय सव्वा फुटावर लावली.

या मिरचीला ठिबकच्या साहाय्याने नियमित पाणी दिले. तसेच मिरचीवर बुरशी, करपा अळी या रोगासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी केली. प्रणव शिंदे यांनी रणजित तळप यांच्या मार्गदर्शनाखाली मिरचीची काळजी घेतली.

मिरचीची झाडे मोडू नयेत म्हणून काठी व तारेचा वापर केला आहे. तसेच तणासाठी मल्चिंग पेपरही अंथरला आहे. ४५ ते ५० दिवसांनंतर मिरचीचे उत्पादन सुरू झाले. प्रत्येक तोड्यावेळी उत्पादन वाढत गेले.

सध्या एक हजार ४०० किलो एकावेळी उत्पादन मिळत आहे. आज अखेर आठ तोडे झाले असून पाच टन उत्पादन मिळाले आहे. त्यापासून दीड लाख उत्पादन मिळाले आहे.

एकूण बारा टन मिरचीचे उत्पादन मिळेल. मुंबई बाजारपेठेत या मिरचीला चाळीस रुपये किलो दर मिळत असल्याने चार लाख रुपयापर्यंत उत्पादन मिळणार आहे.

भाजीपाल्याकडे का वळावे?▪️आम्ही शेतामध्ये संकरित वाणाच्या मिरचीची लागण केली होती.▪️मिरची वीतभर लांबीची असून ती तिखट आहे.▪️या मिरचीला मुंबई व आसपासच्या बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे.▪️मिरचीची २५ गुंठ्यात लागण केली.▪️चांगले उत्पादन मिळाले असून दरही चांगला असल्यामुळे चांगला आम्हाला चांगला लाभ होणार आहे.▪️शेतकऱ्यांनी उसासारख्या शेतीतून बाहेर पडावे व जाणीवपूर्वक लक्ष देऊन भाजीपाला पिकाकडे वळणे गरजेचे आहे.▪️भाजीपाल्याची शेती फायदेशीर व चांगले उत्पन्न देणारी आहे, अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी प्रणव शिंदे यांनी सांगितले.

अधिक वाचा: तुरीच्या एका झाडाला सरासरी तब्बल १४०० शेंगा; निंबर्गीच्या या शेतकऱ्याने घेतले बंपर उत्पादन

टॅग्स :मिरचीपीकशेतकरीशेतीभाज्यासांगलीकीड व रोग नियंत्रणसेंद्रिय खतबाजार