Farmer Sucessful Story : बदल हा निसर्गाचा नियम आहे.. हेच टेक्निक लक्षात घेऊन ३५ वर्षीय संतोष नागरे यांनी पारंपारिक पद्धतीला फाटा देत वडिलोपार्जित जमिनीमध्ये सोने पिकवले आहे. वडिलोपार्जित असलेल्या १८ एकर शेतामध्ये सध्या हा युवक अद्रक आणि फुलकोबी, ऊस सारख्या इतर पिकांच्या माध्यमातून लाखोंची कमाई करत आहे.
पारंपारिक पद्धतीला संतोष याने अत्याधुनिक स्वरूपातील लागवडीचे तंत्र वापरून अद्रकाची फोडणी दिली आहे. प्रचंड मेहनत, जिद्द आणि वेळोवेळी योग्य नियोजन यांच्या माध्यमातून त्याने संपादन केलेले यश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरणारे आहे.
पारंपारिक शेती पद्धतीतून मिळणाऱ्या कमाईवर समाधान न मानता नव्या प्रयोगातून निश्चितपणे लाखोंची कमाई करता येते, याचे अचूक टेक्निक संतोष नागरे यांनी फुलंब्री परिसरातील
आपल्या शेतीत यशस्वी करून दाखवले आहे.
औद्योगिक वसाहत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर फुलंब्री तालुका आहे. फुलंब्री शहरापासून जवळ असलेल्या नागरे कुटुंबियांनी आपल्या वडिलोपार्जित १८ एकर शेतीमध्ये अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करून लाखो रुपयांचे उत्पन्न संपादन केले आहे. यासाठीचा त्यांचा हा प्रयोग अनेक शेतकऱ्यांना यशो मार्ग दाखवणारा ठरत आहे.
यशाची त्रिसूत्री
योग्य प्रकारचे नियोजन, वेळोवेळी औषधीच्या फवारणीचे व्यवस्थापन आणि आर्थिक गुंतवणुकीची तयारी असली की, शेतीमधूनही सोनं पिकवण्याची संधी आहे, हाच आपल्या यशाचा मंत्र संतोष नागरे यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना दिला आहे. याच त्रिसूत्रीच्या माध्यमातून संतोष नागरे यांनी अद्रक पिकातून मोठी कमाई केली आहे.
८५ गुंठ्यात ३७७ क्विंटल विक्रमी अद्रक
संतोष नागरे यांनी अद्रक या पिकाच्या माध्यमातून राज्यात आपली ओळख निर्माण केली आहे. शेतीमध्ये त्यांनी नवनवीन प्रयोग साकारत उत्पन्न वाढीचा पराक्रम गाजवला आहे. फ्रेश असलेल्या आपल्या ८५ गुंठे शेतामध्ये संतोष नागरे यांनी अद्रक घेण्याचा निर्णय घेतला. लागवडीसाठी त्यांनी स्वत: चे बेणे वापरले. आणि यंदा चक्का त्यांना ३७७ क्विंटल आल्याचे उत्पादन मिळाले. अद्रक पीकासाठी त्यांनी सहा महिन्याच्या प्रचंड मेहनतीतून विक्रमी अद्रक घेतले. त्यांना १ डिसेंबर रोजी ११ लाख ३१ हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. अवघ्या सहा महिन्यात ६ लाख ३१ हजार रुपये निव्वळ नफा त्यांनी मिळवला आहे.
खचून जाऊ नका, नवा प्रयोग ठरतोय नव संजीवनी
निसर्गात होत असलेला बदल आणि अचानक येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या विकासात स्थिरता राहिलेली नाही. त्यामुळे अनेकदा योग्य प्रकारचे नियोजन करूनही अचानक होणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे हाती आलेले पीक निघून जाते. त्यामुळे निश्चितपणे पैसा आणि मेहनत वाया जात असल्यामुळे नैराश्य येते. मात्र, या दरम्यान कुठल्याही प्रकारे खचून न जाता शेतकऱ्यांनी वेळोवेळी नवा प्रयोग करण्याची तयारी ठेवावी. हाच नवा प्रयोग निराशेच्या गर्दीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे नव संजीवनी देणारा ठरतो. यामुळे मेहनत आणि नियोजन हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी सातत्याने शेतात वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असावे, असा मौलिक सल्ला संतोष नागरे यांनी दिला आहे.
पितृ छत्र हरवल्यानंतर जिद्दीने पेटले
कोरोना या महामारीने अनेकांवर जीव घेणे संकट ओढवले होते. याकाळात अनेकांचे संसार बेचिराख झाले. असाच एक आघात संतोष नागरे यांच्यावरही आला. कोरोनादरम्यान त्यांच्या डोक्यावर असलेले वडिलांचे छत्र हरवले. वडिल दत्तात्रय नागरे यांच्या निधनानंतर संतोष यांनी पत्नी आणि भाऊ यांच्यासोबत कुटुंबालाही सावरले. वडिलोपार्जित असलेल्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांनी मेहनत सुरू केली. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी शेतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, त्यामुळे यातूनच सोने पिकवण्यासाठी जिद्दीने पेटलेल्या संतोष यांना यादरम्यान अनेक संकटांचा सामना करावा लागला. आलेल्या संकटावर मात करत खचून न जाता त्यांनी यशोशिखर गाठले.
यांचे मिळाले मार्गदर्शन
अद्रक पिकात खत व्यवस्थापन तसेच किड व रोग नियंत्रण कसे करावे या विषयी कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे आणि कृषी सहायक रामभाऊ सांळुके यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. त्यामुळे नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे संतोष नागरे यांनी सांगितले.