मेहरून नाकाडेरत्नागिरी : वार्धक्याकडे वाटचाल करताना गुहागर तालुक्यातील पाभरे बुद्रुक येथील तुकाराम विश्राम पाष्टे यांनी शेतीची आवड जपली आहे. शेतीला जोड म्हणून ते दुग्धव्यवसाय करत आहेत.
खरीप, रब्बी, उन्हाळी शेतीसह बागायतीतून ते उत्पन्न मिळवितात. विशेष म्हणजे तुकाराम यांच्या पत्नीसुद्धा सतत शेतात राबत असतात. तुकाराम यांनी साडेसात एकर क्षेत्रावर बागायत फुलविली आहे.
साडेसात एकर क्षेत्रावर फळबाग लागवड केली आहे. त्यामध्ये १,५०० काजू, ५०० आंबा, ३० नारळ व १५० सुपारीच्या झाडांचा समावेश आहे. बागायतीतून उत्पन्न सुरू आहे. वाळलेली काजूबी एकत्र करून चांगला दर पाहून विक्री करतात.
सुपारीसाठी तर विक्रेते दारावर खरेदीसाठी येतात. आंबा मात्र मार्केटला न पाठवता स्वतःच विक्री करतात. नारळ गावातच विकतात. खरीप हंगामात भात व कारळा (तीळ) लागवड पाष्टे करत आहेत. एक एकर क्षेत्रावर भात लागवड करीत असून अडीच एकर क्षेत्रावर कारळा लागवड केली आहे.
तीळ लागवडीसाठी गावातील एका शेतकऱ्याची जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. तिळाचे तेल काढता येते, आरोग्यदृष्ट्या तिळाचे असलेले महत्त्व व तिळाला मिळणारा दर यामुळेच पाष्टे तिळाची लागवड करतात.
भात काढल्यानंतर भाजीपाला लागवड करतात, तर ६० गुंठे क्षेत्रावर कुळीथ पिकाची लागवड करीत आहेत. कुळथासाठी चांगला दर मिळतो. मूळा, माठ यांसारख्या पालेभाज्यांसह मिरची, वांगी, कोथिंबीर, पावटा लागवड करतात.
भाज्यांची विक्री शेताच्या बांधावरच होत आहे. शेतीला जोड दुग्धोत्पादन व्यवसाय सुरू केला आहे. गावठी पाच गायींचे संगोपन केले आहे. शेतीतून अर्थार्जनाचा मार्ग पाष्टे दाम्पत्याने अवलंबला आहे.
दुग्धोत्पादनाची जोड शेतीला दुग्धोत्पादनाची जोड देत तुकाराम पाष्टे गावठी गायींचे संगोपन करत आहेत. दररोज दहा लिटर दुधाची विक्री करतात. गायीचे शेण, बागायतीतील पालापाचोळा एकत्र करून कंपोस्ट खत तर गोमूत्रापासून जीवामृत तयार करून शेतीसाठी वापरतात. त्यामुळे शेतमालाचा दर्जा व उत्पन्न चांगले आहे. कुटुंबीयांसाठी दूध ठेवून उर्वरित दुधाचर्ची विक्री करतात. दूध, शेणखताला मागणी असल्याने विक्रीतून पैसे मिळतात.
आंब्याची खासगी विक्रीबागायतीमध्ये काजू लागवड मोठ्या प्रमाणावर केली असून, तुलनेने हापूस लागवड कमी आहे. परंतु, आंबा बाजारात विक्रीसाठी न पाठविता वर्गवारी करून पेट्या भरतात व खासगी विक्री करतात. वर्षानुवर्षे ग्राहकांशी असलेले ऋणानुबंध त्यांनी जपले आहेत. त्यामुळेच त्यांना आंब्याला चांगला दर मिळतो. सुपारी, काजूबीसुद्धा दर पाहूनच विक्री करीत असल्याचे तुकाराम पाष्टे यांनी सांगितले.
शेतीची आवड असल्यामुळेच नोकरीच्या मागे न लागता तरुणवयातच शेतीकडे लक्ष केंद्रित केले. साडेसात एकर क्षेत्राची मशागत करून त्यामध्ये नियोजनबद्ध फळबाग लागवड केली आहे. खरीपात भात व तीळ लागवड करतो. तिळासाठी मागणीही खूप आहे. शिवाय कुळीथ लागवड मोठ्या प्रमाणावर करतो. शेती/बागायतीसाठी कृषितज्ज्ञ संदीप डोंगरे मार्गदर्शन करत आहेत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा डोलारा अवलंबून आहे. दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त राहण्याचा आनंदच वेगळा आहे. शेतमालाची विक्रीसुद्धा स्वतःच करीत असल्याने फायदा होतो, कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासत नाही. - तुकाराम विश्राम पाष्टे, पाभरेबुद्रुक