मेहरून नाकाडेरत्नागिरी : निव्वळ शेती न करता संलग्न व्यवसाय सुरू करून अर्थार्जनाचा मार्ग लांजा तालुक्यातील भडे येथील विलास गोविंद दळवी यांनी निवडला आहे. शेतीच्या कामासाठी त्यांचे दोन्ही मुलगे विवेक, विनय यांचे सहकार्य लाभत आहे. खरिपात भात लागवड, भात काढणीनंतर विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पन्न विलास दळवी घेत आहेत. शेतीशी संलग्न शेळीपालन, कुक्कुटपालन, गावठी गायींचे संगोपन करत आहे. गावात छोटेसे किराणा दुकानही सुरू केले आहे. आंबा, काजू, नारळ बागायतीतून उत्पन्न मिळवित आहेत.
खरिपात पावसाच्या पाण्यावर २० गुंठे क्षेत्रात विलास भात लागवड करतात. भात काढणी ऑक्टोबरमध्ये झाली की, जमिनीतील अंतर्गत ओलाव्यावर भाजीपाला, झेंडू लागवड करतात. भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, मिरची, केळी, मुळा, माठ, मेथी, चवळी पालेभाज्यांसह कोथिंबीर लागवड करत आहेत. २० गुंठे क्षेत्रात योग्य नियोजन करून टप्प्याटप्प्याने विविध पिके घेत आहेत. सेंद्रिय खतांचा सर्वाधिक वापर दळवी करत आहेत. शेतमालाचे उत्पादन व दर्जा सरस असून, शेतावरच विक्री होते. 'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीतून चांगला फायदा होत असल्याचे दळवी यांनी सांगितले.
अधिक वाचा: शोभा आजीची कमाल, हळद पिकात केली सोळा लाखाची उलाढाल
सेंद्रिय उत्पादनांवर भरविलास दळवी यांनी २५० हापूस आंबा, ४५० काजू, २५ नारळाची लागवड केली आहे. बागायतींचेही उत्पन्न सुरू झाले आहे. त्यांच्याकडे असलेल्या गायींचे शेण, कोंबडी, शेळ्यांची विष्ठा तसेच बागेतील पालापाचोळा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करून ते शेती व बागायतीसाठी वापरत आहेत. त्यामुळे शेतमालाचा दर्जा चांगला असल्याने विक्री हातोहात होते. सुरुवातीचा आंबा मार्केटला विक्रीसाठी पाठवतात. मात्र, मार्केटमध्ये आवक वाढल्यावर दर गडगडतात. त्यावेळी खासगी विक्रीवर भर दिला जातो. विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४ या काजूची लागवड केली असून, ओली व वाळलेली काजू बी ते विकत आहेत. वाळलेल्या काजूला चांगला दर प्राप्त झाल्यास तो विकतात. शेतकरी घरी येऊन काजू खरेदी करत आहेत.
शेळी, कुक्कुटपालनशेती व्यवसायाला पूरक शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसाय दळवी यांनी सुरु केला आहे. २५ शेळ्या त्यांच्याकडे आहेत. त्याचप्रमाणे १५० ते २०० कोंबड्या आहेत. कोंबड्या व अंड्यांचा खप होतो. विष्ठा विक्रीतून उत्पन्न मिळत आहेत. शेळ्यांची योग्य वाढ झाल्यानंतर विक्री करत आहेत. विलास यांच्याकडे गावठी गायी आहेत. दूध कुटुंबीयासाठी ठेवले जाते. मात्र, शेणाचा वापर खत व गोमुत्रापासून जीवामृत तयार करून शेतीसाठी वापर करत आहेत.
विविध भाज्यांची लागवडभात काढणीनंतर मुळा, माठ, पालक, चवळी, कोथिंबीर तसेच टोमॅटो, मिरची, वांगी लागवड करत आहेत. काही क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. शेतात विहीर असून, बागायती व शेतीसाठी ठिबक सिंचन सुविधा उपलब्ध केली आहे. लागवडीसाठी बियाणे निवडीपासून बाजारातील विक्रीपर्यंत विजय दळवी यांचे नियोजन असते.
मुलांची मदत शेती कामासाठी होते. कमीत कमी क्षेत्र, खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यायचे यासाठी कृषी तज्ज्ञ संदीप डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कुटुंबीयांच्या मदतीने प्लॉट तयार करून त्यामध्ये आलटून पालटून विविध प्रकारची पिके घेत आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, लक्ष्मीपूजनासाठी झेंडू विक्री करता येईल याप्रमाणे नियोजन करून झेंडू लागवड करत आहेत.