येणारा काळ शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आणि तेवढाच संधी देणारा असणार आहे. हवामान बदल, सरकारी धोरणे, बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती यामुळे होणारे नुकसान या आव्हानांना तोंड देत शेतकऱ्यांना आपली प्रगती करायची आहे. पण यासाठी शेतकऱ्यांना विविध अनुभवी तज्ज्ञांकडून वेळोवेळी मोफत आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. सध्या असाच शेतकऱ्यांचा एक ग्रुप शेतकऱ्यांसाठी आपल्या अनुभवाची, विचारांची शिदोरी घेऊन अविरतपणे काम करत आहे. कोणत्याही राजकीय विचारधारेशी संलग्न नसणारा आणि शेती, शेतकरी हीच धर्म व जात मानून एकोप्याने काम करणारा एक आगळा वेगळा शेतकरी समूह म्हणजे 'ही मैत्री विचारांची' शेतकरी समूह!
बदलत्या काळानुसार प्रत्येक समस्येवर मात देऊन हजारो शेतकऱ्यांना दिशा दाखवण्याचे काम हा समूह अविरत पणे करत आहे. बाजीराव गागरे, जगदीश गागरे, सुदाम गुंड, गणेश सलगर, लोकेश पाताडे, विठ्ठल कढवणे, नंदु पवार, रवीबापु पाटील, गणेश वडजे, देवराम गागरे, कांतीलाल पाटील, चैतन्य पाटील, संजय घोगरे, डॉ. सुनिल चौधरी, विजय जायभावे, आदित्य सांडभोर, पंडित वाघ या शेतकऱ्यांनी एकत्र येत हा समूह सुरू केला होता. या समुहामध्ये महाराष्ट्रा व्यतिरिक्त छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यातील सुद्धा शेतकरी सहभागी आहेत. या समुहाला ४ हजारांपेक्षा जास्त शेतकरी जोडले असून हंगामानुसार शेतीतील विविध विषयांवर या समुहाकडून मार्गदर्शन करण्यात येते.
हा समूह व्हाट्सअपच्या माध्यमातून ८ वर्षे आणि क्लबहाऊसच्या माध्यमातून ३ वर्षे कार्यरत असून आत्तापर्यंत ८८ हजारांपेक्षा जास्त शेतकरी या समुहाकडून आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. तर क्लबहाऊस रूमवर विविध तज्ज्ञांकडून ४८ हजार मिनिटांपेक्षा जास्त वेळ मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत या समुहाकडून शेतकऱ्यांसाठी ५५० पेक्षा जास्त मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांना बोलवून त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. भविष्यात हजारो शेतकऱ्यांना जोडून त्यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी 'ही मैत्री विचारांची' हा समूह कार्यरत असणार आहे. शेतकऱ्यांच्या भविष्यातील गरजा ओळखून नाविन्यपूर्ण काम करण्याचा आमचा सदैव प्रयत्न असल्याचं या ग्रुपमधील सहकारी शेतकरी सांगतात.
शेतकरी हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी एकत्र यावा, योग्य खत व पीक पद्धर्तीचा अवलंब करून त्याने प्रगतीशील व्हावं, उद्यमशील व्हावं, या विचारांची आणि घट्ट मैत्रीच्या नात्याने जोडली गेलेली महाराष्ट्रातील विविध भागातील प्रगतशील शेतकरी एकत्र येऊन 'ही मैत्री विचारांची' या नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपची सुरुवात केली आणि शेतकरी हिताच्या समाजकार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
या ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी शेती विषयक माहितीची देवाणघेवाण होते. यात शेतकरी आपापल्या पिकांचे, कापणीचे, मळणीचे, तोडणीचे फोटो, व्हिडिओ शेयर करतात. त्याचबरोबर एखाद्या समस्येवर प्रश्न विचारले जातात आणि अनुभवी शेतकरी त्याला उत्तरही देतात. पण व्हॉट्सअप ग्रुपवर काही मर्यादा येत होत्या, सर्वच प्रश्नांची उत्तर देणं शक्य होत नव्हतं, सर्वांशी एकत्रितपणे संवाद साधता येत नव्हता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ८ ऑगस्ट २०२१ रोजी 'क्लबहाऊस' या सोशल मीडियाच्या ऑडिओ अॅपवर 'ही मैत्री विचारांची' या नावाचा समूह सुरू करण्यात आला आणि अशा प्रकारे डिजिटल चावडीची सुरवात होऊन देशभरातील बांधावरचा शेतकरी सर्वांशी जोडला गेला.
विशेष म्हणजे क्लबहाऊस या ऑडिओ अॅपवर शेतकऱ्यांची २४ तास चर्चा चालू असते. समूहाचे सभासद एकत्र येवून आपल्या पिकांबद्दल माहिती, खतांचे प्रमाण, त्याचा विधी, हवामान अंदाज, शेती उत्पादनाचे बाजारमूल्य, भविष्यात करावयाची लागवड या विषयांवर चर्चा करतात. ज्या शेतकऱ्यांकडे विजेची रात्रीची सोय असते असे शेतकरी 'ही मैत्री विचारांची' या समूहावर गप्पा गोष्टी करत पिकाला पाणी देतात. समूहाचे शेतकरी प्रत्यक्ष एकत्र येवून कृषी प्रदर्शन किंवा विविध पीक शेतीला भेटी सुद्धा देतात. समूहाच्या माध्यमातून विविध शेतीविषयक चर्चासत्र व मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले जातात. शेतकऱ्यांनी मागणी किंवा सूचना केल्या प्रमाणे त्यांना गरज असलेल्या विषयांवर कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, पिक तज्ञ आणि प्रगतशील शेतशेकरी यांच्या मार्फत वेळोवेळी मार्गदन केले जाते.
या समुहात फक्त पुरुषच नाही तर शेतकरी महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग आहे. नवरात्री निमित्त 'जागर स्त्रीशक्तीचा उत्सव शेतीतील नवदुर्गेचा' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो यात महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतीत नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांचा जीवन प्रवास कथन आयोजित केला जातो. विशेष करून अशा कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन संपूर्णपणे शेतकरी महिलांच्या हाती दिलं जात. यांचा मूळ उद्देश शेतकरी महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देऊन इतर शेतकरी महिलांना प्रोत्साहन देणे हा आहे.
अशाच अपडेट्ससाठी join करा 'लोकमत ॲग्रो'चा व्हॉट्सॲप ग्रूप..https://chat.whatsapp.com/HV0xE9Q6mz4LMXStoq6Gpa
खराब वातावरण, अवकाळी पाऊस, बर्फ वृष्टी, दुष्काळ किंवा अस्थिर बाजारभावामुळे डोक्यावर झालेले कर्ज अश्या संकटाचा शेतकरी कायम सामना करत असतो आणि तो हताश होऊन शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या सारख्या टोकाच्या निर्णया पर्यंत येऊन पोहोचतो. या बिकट परिस्थितीत 'ही मैत्री विचारांची' या समुहाचे शेतकरी एकत्र येऊन अशा शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि पर्यायाने त्यांचे निराकरण करून त्यांना पुन्हा खंबीरपणे उभं राहण्याची ताकद देतात. नवीन बी बियाणे, खते उपलब्ध करून देणे असो किंवा मनुष्यबळ पुरवणे असो जेवढं शक्य होईल तेवढी मदत करून हा समूह अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबावर येणारं संकट पेलवून घेण्यासाठी सदैव तत्पर असतो. अशा कित्येक घटना या समुहातील शेतकऱ्यांच्या सक्रीय सहभागामुळे टाळल्या गेल्याची उदाहरणे आहेत.
या माध्यमातून एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी एका विचाराने नुकतेच 'ही मैत्री विचारांची फाउंडेशन' या नावाने सेवाभावी संस्था स्थापन केली आहे. या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून फक्त शेतकरी वर्गाला निस्वार्थ मदत करण्याचे काम पुढील काळात ही मैत्री विचारांची फाउंडेशन करणार आहे. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत, अशा शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शक्य ती मदत, महिलांना शेतीपूरक व्यवसायासाठी प्रशिक्षण, स्वत:च्या पायावर उभा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी सर्वोतोपरी मदत या संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे.