संजय बोकेफोडे
मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे कुसळंब हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील टोकावर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेलगत वसलेले आहे.
हे जिल्ह्यापासून सुमारे ७० किलोमीटर आणि तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले एक शेतीप्रधान गाव आहे. सोलापूर हा राज्यातला सर्वात कमी पावसाचा आणि त्यात दुष्काळी जिल्हा समजला जायचा.
दुष्काळामुळे या जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील कुसळंब लोकांचे मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत मजुरीसाठी एकेकाळी गावातून तीन ट्रक भरून मजूर कामासाठी बाहेरगावी जायचे पण या बोरांच्या बागांनी चित्र बदलून टाकले. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून मजुरीसाठी उलट कुसळंब गावीच मजूर येतात.
गावचा प्रमुख व्यवसाय शेती असून गावामधून ५४८ सी हा राज्य महामार्ग गेलेला आहे. आजूबाजूच्या १५ गावांना हे दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र आहे.
गावची जमीन ७० टक्के माळरान, २० टक्के जिराईत आणि १० टक्के बागायत आहे. गावातून कोणतीही मोठी नदी अथवा कालव्याचे पाणी जात नाही. गावाला शेतीच्या पाण्यासाठी सतत दुर्भिक्ष असते. शेती पूर्णपणे निसर्गाच्या भरवशावर आहे.
शेतकऱ्यांचा बोरांच्या बागेकडे कल वाढला. बोरबागेचे क्षेत्र वाढले. बाहेर गावाला जाणाऱ्या मजुरांची संख्या घटली. आपल्याच खडकाळ जमिनीत लावलेल्या बोर उत्पादन चांगले निघू लागले.
कुसळंबची बोरं इंदोर, कोलकाता, बंगळुरू, नागपूर, मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, आंध्र प्रदेश, राजस्थान या भागात मोठ्या प्रमाणात बोरांची मागणी वाढू लागली तसतसे बोरांचे क्षेत्र वाढले.
बोर बागायतदार ही या गावची खरी ओळख आहे. गावामध्ये शेतीत 'कुसळ' नावाचे टोकदार काटेरी गवत आढळते. या 'कुसळ' वनस्पतीवरूनच गावाचे 'कुसळंब' असे नामकरण झालेले आहे.
लोकगीतामध्ये या गावाचा उल्लेख आहे. दगडाधोंड्याचं हे गाव माळरान सारी माती साऱ्या शेतात 'कुसळं' लोकं मजुरीला जाती, असा उल्लेख आढळतो.
नापीक जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी भगीरथ प्रयत्न करून बोराच्या बागा उभ्या केलेल्या आहेत. कुसळंबमधील बोरांच्या जाती उमराण चमेली, चेकनेट कडाका, अॅप्पल बोर अशा विविध प्रकारच्या बोरांच्या जातींची लागवड केली आहे.
सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी यावेळी बोरांचं उत्पादन सुरू होतं. कुसळंबमध्ये एकाच वेळेस चार-पाच ट्रक भरले जातात. त्या त्या राज्यात, परराज्यात विक्रीसाठी पाठवल्या जातात.
परंतु गेल्या काही वर्षांपासून बोर उत्पादकांचे आर्थिक उत्पादनाचे गणित खात्रीशीर ठरत नाही, दरातील चढ-उतार त्याचं आर्थिक गणितच कोलमडून सोडते. त्यामुळे कधी कधी आता पुढे काय? हा मोठा प्रश्न बोर उत्पादकांसमोर उभा राहतो.
ग्राहकांना गोड बोराची चव चाखायला देणाऱ्या बोर उत्पादक शेतकऱ्याला मात्र अनेकदा बोरं आंबट लागू लागतात. खूप मोठ्या क्षेत्रावर बोर फळाची लागवड असून बोर उत्पादक वर्षभर कष्ट करून अतिशय चांगल्या प्रतीची बाग तयार केली जाते.
मात्र काबाडकष्ट करूनही त्यांच्या हाती मात्र काहीच लागत नाही. बोर उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरल्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.
शासनाने येथील बोर उत्पादक शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून हात दिल्यास बार्शी तालुक्यातील कुसळंब नव्हे तर इतर भागातील बोर उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रगतीच्या मार्गावर गेल्याशिवाय राहणार नाहीत.
त्यासाठी बोर उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने बोर प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी शेतकऱ्यांसह उद्योग योजना प्रवृत्त करणे गरजेचे आहे. यावर वरिष्ठ स्तरावरून विचार होणे गरजेचे आहे. कुसळंबमध्ये अलीकडच्या काळात पेरू आणि सीताफळ या पिकांचे क्षेत्र वाढत आहे.
अधिक वाचा: भारतातील पहिला शेतकरी मालकीचा साखर कारखाना कुठे सुरु झाला? अन् कशी झाली साखर क्रांती? वाचा सविस्तर