रेशीम उत्पादनात बीडचेशेतकरी लय भारी ठरले आहेत. मागील नऊ वर्षांचा उच्चांक मोडत बीड जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. २०२२-२३ मध्ये ३५८३ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली. यामध्ये ११४२ मेट्रिक टन कोष उत्पादनातून जिल्ह्याला ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या कोषाला ५५० ते ६०० रुपये किलो भाव आहे.
रेशीम विकास योजनेस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत अनुदान दिले जाते. तीन वर्षांत एक एकर तुती लागवडीसाठी बाग व्यवस्थापन, रेशीम कीटक संगोपन व गृह उभारणीकरिता ३ लाख ५८ हजार ११५ रुपये अनुदान मिळते. कमी पाण्यावर लागवड होऊन एकरी ५० हजार ते १ लाख रुपये उत्पन्न होत असल्याने शेतकरी रेशीम उत्पादनावर भर देत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात नवीन १००० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नऊ वर्षांत अशी वाढत गेली शेतकऱ्यांची संख्या
वर्ष | शेतकरी | क्षेत्र | कोष उत्पादन (मे.टन) | सरासरी उत्पादन (लक्ष) |
२०१४-१५ | ४५८ | ६७० | १६३.७२ | ४९८.४७ |
२०१५-१६ | ६४८ | ९९२ | १६६.०५ | ४४४.२९ |
२०१६-१७ | ६२६ | ८९५ | १५५.०० | ४९८.०४ |
२०१७-१८ | १०५४ | ११५८ | ३४४.५५ | ७५९.०८ |
२०१८-१९ | १८०२ | २०९४ | ३६८.०४ | ११९७.०३ |
२०१९-२० | २३५२ | २६०३ | ५३२.९६ | १५९८.९० |
२०२०-२१ | २७४५ | २९३८ | ६५०.२९७ | १.९५०.८९ |
२०२१-२२ | ३५९३ | ३७८६ | ९१४.९२८ | २८११.०२ |
२०२२-२३ | ३५८३ | ३७४३ | ११४२.१६३ | ३५१२.२१ |
या शेतीसाठी ऊस पिकांच्या तुलनेत चार पट पाणी कमी लागते. यामुळे जिल्ह्याला पारंपरिक पिकांपेक्षा ही शेती अधिक लाभदायक आहे. रेशीम खरेदी केंद्र अजून वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात बीड अव्वल असून, त्यापाठोपाठ धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक रेशीम उत्पादन निघते. - अमोल सोनटक्के, क्षेत्र सहायक, जिल्हा रेशीम कार्यालय, बीड