बापू नवले
केडगाव : पारगाव (सामा) येथील उच्चशिक्षित शेतकरी प्रमोद दत्तात्रय ताकवणे यांनी आपल्या २० गुंठे शेतीत कारले पिक घेतले आहे.
जमिनीचे उत्कृष्ट मशागत, खत व पाणी यांचे सुयोग्य व्यवस्थापन, मल्चिंग व ठिबक सिंचन अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कारल्यात गोड चव निर्माण करण्याची किमया येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
ताकवणे यांनी नीतिका या जातीची निवड केली. शेतीची चांगली मशागत करून घेतली. ६x६ पद्धतीत पट्टा (सरी) काढून घेतली. पट्ट्यात शेणखत त्याचबरोबर रासायनिक भेसळ डोस भरला.
ठिबक सिंचन जोडून घेतले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरले. बियाणे टोपण करून कारल्याची लागवड केली. वातावरण व पाण्याची उपलब्धता असल्यामुळे कारल्याची चांगली उगवण झाली.
उगवण झाल्यानंतर दोनदा आळवणी केली. कारल्याचे वेल तयार झाल्यानंतर तार काठी जाळी इत्यादी साहित्य वापरून मंडप तयार केला त्यावर वेल पसरून दिले. नियमित वारंवार फवारणी करून ५० दिवसानंतर कारल्याचा पहिला तोडा झाला.
तोडणी व शेतीतील इतर कामे करताना घरातील आई मंदाकिनी व पत्नी अर्चना यांची ताकवणे यांना मोलाची साथ मिळत आहे. दर्जेदार पीक घेण्यासाठी समीर जेधे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन लाभले.
आजपर्यंत २ टन माल उत्पादित झाला. ताकवणे यांनी गुलटेकडी मार्केट पुणे व आठवडे बाजारात विक्री करत आहे. लहानपणी कौटुंबिक जबाबदारी पडल्याने शाळा लवकर सुटली. घरची शेती असल्याने शेती करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीस शेती बागायती केली. दूध व्यवसाय तसेच ऊस, वांगे, दोडका, काकडी, टोमॅटो आदी पिके घेण्यात आली, शेती आधुनिक करणे हे एक आव्हान आहे. कुटुंबाची साथ मिळाल्याने कारल्याची शेती यशस्वी करू शकलो असे प्रमोद ताकवणे यांनी सांगितले.
शेतीला जर व्यवसायिक स्वरूप दिले तर शेती व्यवसाय खूप चांगला आहे. निसर्गाने साथ दिली आणि नाविन्यपूर्ण प्रयोग केल्यानंतर भरघोस उत्पन्न मिळते. अशा पद्धतीचे उत्पन्न मला बऱ्याच वेळी मिळाले आहे. मागच्या वर्षी काकडीने मला भरघोस उत्पन्न दिले. यंदा कारले फक्त चार तोडे झाले आहेत. सुमारे दोन महिने अजून कारले उत्पन्न देण्याची शक्यता वाटते. यातून चांगला नगद नफा मिळेल. - प्रमोद ताकवणे, शेतकरी, पारगाव, दौंड
अधिक वाचा: राधानगरी तालुक्यातील या तीन जावांची चर्चा भारी; उसाच्या पट्ट्यात केली झेंडूची शेती