Join us

Floriculture ​​​​​​​Success Story : ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलशेतीतून 'प्रकाशमय' आर्थिक सुबत्तेचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 4:30 PM

ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर भोकरदन तालुक्यातील शेतकरी प्रकाश यांनी झेंडू फुलांची लागवड करत आर्थिक सुबत्तेचा मार्ग निवडला आहे. त्यांची यशकथा वाचा सविस्तर (Floriculture Success Story)

Floriculture Success Story : 

भोकरदन :ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर भोकरदन तालुक्यातील शेतकरी प्रकाश यांनी झेंडू फुलांची लागवड करत आर्थिक सुबत्तेचा मार्ग निवडला आहे. तालुक्यातील पळसखेडा मुर्तड येथील शेतकऱ्याने झेंडूच्या फुलांची लागवड करून फुलशेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. 

तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, पळसखेडा मुर्तड, वालसांवगी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फुलशेती आणि भाजीपाला लागवडीकडे वळला आहे.या परिसरातील शेतकरी वर्षभरात शेतातून तीन पिके घेतात.

पळसखेडा मुर्तड येथील शेतकरी प्रकाश कडुबा सोनुने यांनी भडारगडजवळ अर्धा एकर क्षेत्रावर चार बाय सव्वा या अंतरावर निशिगंध, पिवळा झेंडूच्या ४ हजार १०० रोपांची जुलैमध्ये लागवड केली होती.  एका रोपासाठी ४ रुपये ३० पैसे दिले होते. त्यानंतर ठिंबकद्वारे पाणी व खत देण्यात आले.

यासाठी त्यांनी  एकूण ५० ते ६० हजार खर्च केला असून, आता ही झेंडूची फुले चांगलीच बहरली आहेत.  ही फुले विजयादशमी व दिवाळी सणाला विक्री करण्यासाठी तयार होणार आहेत. त्यापूर्वीही फुले विक्रीसाठी निघणार आहेत. 

अर्ध्या एकरात ५० ते ६० क्विंटल फुले निघतील.  सध्या फुलला ४० रुपये किलोचा भाव आहे. त्यामुळे १ लाख ५० हजारांचे उत्पन्न होईल. जर भाव वाढला तर आणखी पैसे मिळतील, गणेशोत्सव, महालक्ष्मी सणाच्या वेळी १५० रुपये किलोपर्यंत भाव होता.  मात्र, आजचे भाव टिकले तरी नफा मिळणार असल्याचे सोनुने यांनी सांगितले.

आम्ही पाच - सहा शेतकरी एकत्र येऊन तीन वर्षांपासून झेंडूच्या लागवड करीत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला मेथीचे उत्पादन घेतो. त्यानंतर झेंडूची लागवड करतो. हे झेंडू निघाल्यानंतर दिवाळीला याच शेतात हरभरा लागवड करून उत्पादन घेतो. त्यामुळे एकाच शेतात तीन पिकांचे उत्पादन घेऊन चांगला नफा मिळतो. - प्रकाश सोनुने, शेतकरी

टॅग्स :शेती क्षेत्रफुलशेतीशेतकरीशेती