बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशच्या काही भागात पिकणारे बडीशेपचे पीकश्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील अजय काळे, गणेश काळे, देऊळगाव येथील शेतकरी दत्ता दांगडे यांनी प्रायोगिक तत्त्वावर घेतले.
दहा गुंठे क्षेत्रात तीन महिन्यांत प्रत्येकी ५० ते ६० हजारांचे उत्पन्नही मिळाले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने सुरू केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याने तालुक्यात बडीशेप लागवड वाढू शकते.
गेल्या काही वर्षांत हवामान, पाण्याची परिस्थिती कमालीची बदलत आहे. त्यानुसार कृषी विद्यापीठ आणि शेतकरी पिकाचा पॅटर्न बदलू लागले आहेत. यामधूनच मंगलम शरयू सीड्सच्या वोलिना वाणाचे बडीशेप पीक राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार आढळगाव येथील अजय काळे, गणेश काळे, देऊळगाव येथील शेतकरी दत्ता दांगडे यांनी प्रायोगिक तत्त्वावर हे पीक घेतले. हा प्रयोग यशस्वी झाला. पेरणीसाठी एकरी आठशे ग्रॅम बडीशेप लागते. त्यातून ७ ते ८ क्विंटल उत्पन्न निघते. सरासरी प्रतिक्विंटल भाव ३० ते ५५ हजार रुपयांप्रमाणे मिळतो.
लागवड, खते, रोगराई..
■ लागवड पद्धत : ३ फूट बाय १ फूट सरीवर टोकन करणे किंवा ३ फुटांवर बेड काढून त्यावर झिंकॉक पद्धतीने लागवड करता येते.
■ खते : नत्र २५, स्फुरद २०, पालाश २० असे खत आवश्यक असते.
■ रोग : बडीशेप पिकावर मावा आणि भुरी पडते. त्यासाठी नीम तेल व एम ४५ बुरशीनाशक फवारणी पुरेशी ठरते.
उत्तम व कमी खर्चिक पीक. नावीन्यपूर्ण उपक्रम. शेतकऱ्यांना पुढील काळात 'आत्मा' अंतर्गत मदत देऊन, शेकरी गट करून हे पीक वाढविणे आवश्यक आहे. - दीपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा
भविष्यात बडीशेप, जिरे पिकांमध्ये वाढ करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या पिकासाठी मदत करणार आहे. अडचणी आल्यास स्वतः प्लॉटवर जाऊन त्या दूर करणार आहे. - राहुल पोळ, कृषी मार्गदर्शक, श्रीगोंदा
श्रीगोंदा येथील राहुल पोळ यांनी आम्हाला बडीशेप पीक घेण्यास प्रोत्साहन दिले. मार्गदर्शन करून पीक यशस्वी करून दिले. हे पीक काढून वेगळा प्रयोग केल्याचे समाधान आहे. - दत्ता दांगडे, शेतकरी, देऊळगाव
तालुक्यातील शेतकऱ्यांना या पिकातील लागणारी मदत शासनाकडून उपलब्ध करून देणे. हार्वेस्टिंगसाठीचे थ्रेशर. उत्पादनानंतर विक्री व्यवस्थेसाठी प्रयत्न करणार आहे. - राम जगताप, कृषी अधिकारी, पंचायत समिती, श्रीगोंदा
अधिक वाचा : कांदा पिकातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बाळासाहेबांनी केली अशी शेती