रविंद्र शिऊरकर
पारंपरिक पिकांना फाटा देत फळबागेतुन शेतकऱ्याने साधले तुलनेत चांगले उत्पन्न व सोबतीस मजुरांच्या समस्येतून हि निघाला मार्ग. शेतीची पूर्वीपासून आवड मात्र नोकरी शिक्षण यांसाठी स्थलांतर झाले. शेती, माती पासून दूर जावं लागलं. मात्र आवड असल्याने आपली शेती असावी हि खंत वेळोवेळी वाटायची.
यातून नोकरीच्या जोरावर श्री. बळवंत शंकरराव कुलकर्णी यांनी छ्त्रपती संभाजीनगर शहरापासून दक्षिणेस २० किमी अंतरावरील घारदोन ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथे साडे सात एकर शेती घेतली. सोयाबीन, कपाशी, ज्वारी, मका असे पारंपरिक पीक घेण्यास सुरुवात केली. मात्र मजुरांची वारंवार समस्या निर्माण व्हायची.
परिसरात हाकेच्या अंतरावर कृषी विज्ञान केंद्र गांधेली असल्याने तिथल्या संशोधकांशी चर्चा झाली. ज्यातून फळ बाग मार्ग मिळाला. पुढे २०२१ मध्ये दोन एकर एन एम के गोल्डन सिताफळची १४ बाय ७ वर व दिड एकर तैवान पिंक व लखनऊ ४९ पेरू ची १२ बाय ६ वर लागवड केली.
अधिक वाचा: शेतकऱ्याचा नाद करायचा नाय; आफ्रिकन बोअर शेळीपालनातून वर्षाला सहा लाखाचे उत्पन्न
कमी पाण्याचा परिसर असल्याने बागेसाठी व शेतीसाठी जवळपास एकर क्षेत्रात शेततळे उभारले. बागेसाठी ठिबक सिंचन केले. सोबत परिसरातून काही गीर गाईंची सेंद्रिय खतासाठी खरेदी केली. त्यांच्या चाऱ्यासाठी एक एकर क्षेत्रात नेपियर व इतर चारा पिके घेतली जातात. तर उर्वरित क्षेत्रात सोयाबीन पिकं घेतले जाते.
बागेचे व्यवस्थापन व विक्री मूल्य
- काही अंशी रासायनिक खतांचा वापर होत असलेल्या या बागेसाठी वार्षिक २ ट्रॉली एकरी शेणखत टाकले जाते. त्याचबरोबर छाटणी, फुल व फळ धारणा अशा वेळी जिवामृत दिले जाते. तर फळांच्या वाढीच्या अवस्थेत सुक्ष्म अन्नद्रवांची फवारणी केली जाते.
- सिताफळाचा विक्री योग्य तोड गेल्या वर्षी २०२३ मध्ये मिळाली. ज्यात ३.५ टन उत्पादन झाले ज्यास ४०-४५ रुपये जागेवर दर मिळाला. तर पेरू मधून २०२३ साली २-२.५ टन उत्पादन मिळाले ज्यास १७ ते १८ रुपये दर मिळाला.
पेरू ला सिताफळ भारी
कुलकर्णी यांच्या मते व्यवस्थापन, खर्च, बाजारभाव, या सर्वांच्या तुलनेत पेरू ला सिताफळ भारी असून भविष्यात पेरूची जागा सिताफळ मध्ये रुपांतरीत करण्याचा त्यांचा मानस आहे.
गीर गाईंचे संगोपन
परिसरातून घेतलेल्या एक दोन गाईंपासून सध्या कुलकर्णी यांच्याकडे ६ गाई व ६ वासर आहे. गाईपासून दिवसाला सरासरी २० लिटर दुधाची शहरात ९० रुपये लिटर ने विक्री होते. तर शेणखत घरच्या शेती करिता वापरत गोमूत्रापासून जिवामृत निर्मिती केली जाते. गाईच्या दुधावर पहिला हक्क तिच्या वासरांचा नंतर आपला असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले ज्यामुळे नर वासरांना देखील ते मोठ्या आनंदाने सांभाळत आहे.