अनंत जाधवसावंतवाडी : गडगंज पगाराच्या विदेशी बँकेतील नोकरीला लाथाडून चक्क मालवण तालुक्यातील पराड गावातील मनोज पराडकर या तरुणाने माडखोल नमसवाडी येथील माळरानावर भाजीचा मळा फुलवला आहे. त्यातून त्याने अनेकांना रोजगार दिलाच, त्याशिवाय येथील देशी-विदेशी भाजीपाल्याला सिंधुदुर्ग व गोव्यातील बाजारपेठही मिळवून दिली आहे.
पराडकर यांच्या या प्रयत्नाचे सर्वस्तरातून विशेष कौतुक होत आहे. यातून अनेकांनी बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पराड गावातील मनोज पराडकर हे उच्चशिक्षित असून, मुंबई येथील विदेशी बँकेत उच्चपदस्थ अधिकारी होते.
मात्र, त्यांचे नोकरीत काही मन रमत नव्हते. तेव्हा त्यांच्यापुढे एक तर विदेशात जाऊन नोकरी करायची अन्यथा गावाकडे जाऊन शेती करायची, अशा दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचे आव्हान होते. यातूनच आपण गावाकडे जाऊन शेती करायची, असे स्वप्न उराशी बाळगून पराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले.
अनेक दिवस जागा शोधल्या आणि नंतर त्यांनी माडखोल नमसवाडी येथे साडेबारा एकर जमीन खरेदी केली. ही जमीन पूर्णतः नापीक आणि खडकाळ होती. जमिनीत जाण्यासाठी रस्ताही नव्हता. अशातच या जमिनीत काय फुलणार ? हे त्यांना कळत नव्हते.
सुरुवातीच्या काळात कुटुंबातील सदस्यही 'नोकरी सोडून तू काय करतोस' म्हणून पराडकर यांची चेष्टा करायचे. पण ते जराही मागे हटले नाहीत. त्यांनी माडखोल नमसवाडी येथील डोंगराळ, दुर्गम अशा भागात जवळपास १२ एकर जागेत पॉलीहाऊस फुलवले असून, यात भव्य- दिव्य असा मशरूम आणि विदेशी भाजीपाला यांच्या व्हर्टिकल्चर शेतीचा मळा फुलवला आहे.
पडिक डोंगराळ जमिनीत भाजीपाला आणि मशरूम असा एकत्रित कृषी प्रयोग करणारे हे सह्याद्री पट्टयात पहिलेच आहेत. सुरुवातीच्या काळात हे सर्व करताना पराडकर यांना अनेक समस्या जाणवल्या, पण आज ते प्रगतशील शेतकरी म्हणून पुढे येत आहेत. माडखोलसारख्या दुर्गम डोंगराळ गावात एक नवी जीवनशैली त्यांनी सुरू केली आहे.
भाजीपाला विकसित केंद्रसिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू गरजू तरुणांना या पॉलिहाऊसचा नवा पॅटर्न आखून दिला आहे. या डोंगरावर आज हिरवागार भाजीपाला विकसित केंद्र बनत आहे. 'एक्झोबाइट' या ब्रँडच्या माध्यमातून चेरी, टोमॅटो, ब्रोकली, ऑईस्टर मशरूम, झुकिनी, हॅलेपिनो यासारख्या ऑरगॅनिक भाज्यांची उत्पादने ते घेत आहेत. 'एक्झोबाइट' या आपल्या बँडने त्यांनी सावंतवाडी बाजारपेठेत नवी ओळख निर्माण केली आहे.
मशरुम प्रकल्पसावंतवाडी बाजारपेठेबरोबरच गोवा बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीनेहीं त्यांनी पाऊल टाकले आहे. त्यानी दोन वर्षात पॉलिहाऊस उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली. मशरूम आणि विदेशी भाजी, मिरची असा प्रकल्प पराडकर यांनी उभारला आहे. आज सावंतवाडी बाजारपेठेत मशरूम आणि मिरची आदी भाज्यांना मागणी आहे. सावंतवाडी बाजारपेठेतील अनेक विक्रेते एक्झोबाइट बँडच्या भाज्या, मशरूम विकत आहेत.
एक्झोबाइट लोकसेवेत रविवार, १४ एप्रिल रोजी 'एक्झोचाइट' हा ग्रँड व पॉलिहाऊस तसेच मशरूम प्रकल्प खऱ्या अर्थाने नव्या धर्तीवर कार्यान्वित केला जाणार आहे. - मनोज पराडकर
अधिक वाचा: उन्हाळी काकडीने निमसाखरच्या शेतकऱ्याला दिला आर्थिक गारवा