घरची पारंपारिक द्राक्ष शेती. पण मागच्या काही वर्षांमध्ये द्राक्ष शेती तोट्याची झाली. याला पर्याय म्हणून जोडव्यवसाय करावा अशी कल्पना सुचली अन् थेट दीड एकर द्राक्ष शेती कमी करून त्याच शेतीत गावरान कोंबडीपालन सुरू केलं. या व्यवसायातून आज महिन्याकाठी ७ लाखांचा निव्वळ नफा कमावला जातोय. ही कथा आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गाजरवाडीच्या गणेश गाजरे यांची.
नाशकातील गाजरवाडी येथे गाजरे यांची ३५ एकर पारंपारिक द्राक्ष शेती होती. पण मागच्या काही वर्षामध्ये द्राक्ष शेतीमधील संकटे वाढू लागली. नैसर्गिक आपत्ती, दरांची अशाश्वतता यामुळे द्राक्ष शेती तोट्याची होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर द्राक्ष शेतीला काहीतरी जोडव्यवसाय असावा यासाठी वेगवेगळ्या जोडव्यवसायाचा अभ्यास केला. त्यामध्ये पोल्ट्री, दुग्धव्यवसाय, शेळीपालन या व्यवसायांचा सामावेश होता. पण त्यातून सोयीस्कर, सोपा आणि चांगले पैसे कमावून देणारा व्यवसाय असलेल्या गावरान कोंबडीपालनाचा मार्ग स्विकारला.
सुरूवातील त्यांनी दीड एकर द्राक्षबाग कमी केली आणि त्या क्षेत्राला वॉल कंपाउंड केले. त्या शेतात शेवग्याची लागवड केली आणि पुण्यातील 'नेचर्स बेस्ट' कंपनीकडून गावरान कोंबडीपालनाचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांच्याकडूनच पिल्ले घेतली आणि व्यवसायाला सुरूवात केली. सध्या त्यांच्या फार्मवर १० हजार गावरान कोंबड्या असून त्यापासून अंडी, पिल्ले आणि मांस उत्पादनासाठी कोंबड्या तयार करतात.
नियोजन आणि व्यवस्थापन
गावरान कोंबडी ही उकिरड्यावरील जात असल्यामुळे तिला जास्त खर्चाची आवश्यकता नसते. दोन वेळा लसीकरण केले आणि त्यांच्या खाद्याकडे नीट लक्ष दिले तर कोंबडीला आजार येत नाहीत. तर दीड एकरात शेवगा लागवड केली असल्याने कोंबड्यांना कॅल्शिअमची पुर्तता होते. दीड एकरामध्ये गावरान कोंबडीचा फार्म असल्याने त्यासाठी २ लोकं काम करतात. तर घरचे २ असे एकूण ४ लोकं काम करतात. ते खाद्य टाकणे, अंडी गोळा करणे, कोंबड्यांना पाणी देणे, खुडूक कोंबड्या अंड्यावर बसवणे, पिल्लांची निगा राखणे अशी कामे करतात. तर प्रत्येक तीन दिवसानंतर अंडी पुण्यात विक्रीला पाठवली जातात.
उत्पादन
गाजरे यांच्या एकूण १० हजार कोंबड्यातून दररोज किमान १ हजार ६०० ते १ हजार ७०० अंडी मिळतात. त्याचबरोबर खुडूक कोंबड्यांना अंड्यावर बसवून त्यामधून ते ६ ते ७ हजार पिल्ले महिन्याकाठी तयार केले जातात. लोकांच्या मागणीनुसार पिल्ले कमीजास्त तयार करण्यात येतात. नर कोंबड्यांची मांसासाठी विक्री केली जाते. महिन्याकाठी १ हजार नरांची विक्री केली जाते तर १ हजार पिल्ले वाढवली जातात.
'नेचर्स बेस्ट'ची व्यवसायात साथ
पुण्यातील 'नेचर्स बेस्ट' ही कंपनी गावरान अंडी १० रूपयांप्रमाणे शेतकऱ्यांकडून खरेदी करते. त्याचबरोबर प्रशिक्षणापासून, लसीकरण, व्यवस्थापन, विक्री व्यवस्था उभी करण्यास 'नेचर्स बेस्ट'ने मदत केल्याचं गणेश गाजरे सांगतात. अंड्यांबरोबरच पिल्ले आणि मांसासाठी उपयोगी असणाऱ्या नर कोंबड्याचीसु्द्धा 'नेचर्स बेस्ट' खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी वेगळी व्यवस्था उभारण्याची धडपड करावी लागत नाही.
उत्पन्न
पुण्यातील 'नेचर्स बेस्ट' कंपनीकडून आपण पिल्ले विकत घेतले होते. त्यांनाच १० रूपये प्रती नग याप्रमाणे ते अंड्याची विक्री करतात. महिन्याला ४५ ते ५० हजार अंड्यांची विक्री होते. तर ५ दिवसांचे एक पिल्लू ६० रूपयांना, १५ दिवसांचे पिल्लू १०० रूपयांना आणि एका महिन्याचे गावरान कोंबडीचे पिल्लू १५० रूपयांना विक्री केले जाते. तर एका महिन्याला १ हजार पक्षांची मांसासाठी विक्री केली जाते. जिवंत पक्ष्यांची नेचर्स बेस्टकडून ३०० रूपये प्रतिकिलो प्रमाणे खरेदी केली जाते. यातून जवळपास ८ लाखांचे उत्पन्न होते. त्यातून कोंबड्यांचे खाद्य आणि इतर खर्च १ लाख पकडला तर महिन्याकाठी ७ लाखांचा निव्वळ नफा गाजरे यांना मिळतो.
दरम्यान, दुष्काळी भागात किंवा ज्या ठिकाणच्या शेतमालाला चांगला दर मिळत नाही किंवा शेती तोट्यात जाते अशा भागांतील शेतकऱ्यांना जोडव्यवसाय नक्कीच फायद्याचा ठरतो. गावरान कोंबडीपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग अशा जोडव्यवसायाचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा नक्कीच होतो.