Gavran Poultry Farm Pune Success Story : पुण्यातील इमारतीच्या जंगलात गावरान मुक्तसंचार कोंबड्यांचं फार्म उभारून मांजरी येथील खवले कुटुंबियांनी आर्थिक उन्नती साधलीये. खवले यांच्याकडून ग्राहकांना थेट चिकनची विक्री होत असल्यामुळे आणि गावरान चिकन सहज उपलब्ध होत नसल्यामुळे चांगलाच फायदा होतोय.
पुणे शहरालगत असलेले सोलापूर हायवेवरील मांजरी हे गाव मागच्या काही वर्षांत चांगले विकसीत झाले आहे. सोलापूर हायवेटच संदीप खवले यांची शेतजमीन असून या जमिनीवर कोणत्याही प्रकारच्या इमारती किंवा बांधकाम न करता त्यांनी आपल्या शेतात पारंपारिक पद्धतीने गावरान कुक्कुटपालनाला सुरूवात केली आहे.
पुणे शहरात गावरान चिकनची मागणी जास्त असल्याने खवले यांनी दोन वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांच्याकडे गावरान कोंबड्यांसाठी चार शेड असून पाच पारंपारिक पद्धतीच्या झोपड्या आहेत. यामध्ये त्यांनी लोखंडी जाळ्याचे कंपाऊंड केले असून कोंबड्यांचे नैसर्गिक पद्धतीने म्हणजे मुक्तसंचार पद्धतीने संगोपन केले जाते.
योग्य नियोजन
कोंबड्यांसाठी योग्य व्यवस्थापन खवले फार्मवर केले जाते. कोंबड्यांच्या निवाऱ्यासाठी आणि मुक्तसंचारासाठी वेगळी जागा शेड उभारताना सोडली आहे. यामुळे कोंबड्यांची चांगल्या पद्धतीने शारिरीक वाढ होते. कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मुक्तसंचार गोठा फायद्याचा ठरतो. तर वेळेवर कीडनाशकांची फवारणी, शेडची स्वच्छता केली जाते.
कोंबड्यांचे खाद्य
गावरान कोंबड्यांसाठी खाद्याचा खर्च कमी येतो असे खवले सांगतात. कीडे, मुंग्या खाऊन गावरान कोंबडी आपले गुजराण करते त्यामुळे त्यांना कोंबडी खाद्य कमी लागते. त्याचबरोबर शेवग्याचा पाला, बागेतील इतर झाडपाला आणि हॉटेल वेस्ट टाकल्यामुळे कोंबड्यांना वेगवेगळ्या अन्नद्रव्याची पूर्तता होते.
विक्री व्यवस्था
खवले यांनी ग्राहकांना थेट फार्मवर येण्याची सुविधा केली असून ग्राहकांना जी कोंबडी आवडेल ती कोंबडी ग्राहकांना विक्री केली जाते. त्याचबरोबर व्हाट्सअप आणि कॉल करूनही चिकनच्या ऑर्डर स्विकारल्या जातात. लांब राहणाऱ्या ग्राहकांकडून डिलीव्हरीसाठी पैसे आकारले जातात. येणाऱ्या काळात पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना गावरान चिकन पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.
उत्पन्न
खवले यांच्या फार्ममध्ये नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले गावरान चिकन ८०० ते ९०० रूपये किलोप्रमाणे विक्री केले जाते. त्याचबरोबर १५ रूपयांप्रमाणे एका अंड्याची विक्री केली जाते. महिन्याकाठी साधारण ८०० ते ९०० जिवंत कोंबड्यांची तर जवळपास १५ हजार गावरान अंड्यांची विक्री केली जाते.