सुर्यकांत किंद्रे/ संतोष ढवळे
भोर : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील आंबाडे येथील प्रगतिशील शेतकरी अशोक भिकोबा खोपडे यांनी भात शेतीत सुंगधी तेल मिळणारी जिरेनियमची शेती करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वीसगाव खो-यात प्रामुख्याने भात पिक घेतले जाते लॉकडाऊनचा वेळेचा सपयोग करून पारंपारिक शेतीतून उगवणाऱ्या पिकांना आता शाश्वत भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
पावसाची अनियमितता, हक्काच्या पाण्याचा अभाव, डोंगर उताराची जमीन, हवामानातील बदलाने भात पिक धोक्यात आले आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत जिरानयम (सुगंधी वनस्पती) शेती करण्यास सुरुवात करुन हुकमी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे. तसेच जिरेनियम तेल निर्मिती उद्योग सुरु केला आहे. २०२० मधील फेब्रुवारी महिन्यात सातारा येथील नर्सरी मधून जिरेनियमची १४ हजार रोपे विकत आणून २ एकरात लागवड केली.
शेणखत एकरी तीन ट्रॉली बेसल डोस युरीया, सिंगल सुपर फॉस्फेट, गंधक, झिंक, कंपोस्ट खत मिसळून ट्रॅक्टरने नांगरणी व रोटावेटर करून ४ फुटाचे बेड करून रोपांची फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच लागवड केली. पहिली कापणी लागवडीनंतर चौथ्या महिन्यात केली प्रत्येक कापणी तीन महिन्यांनी करण्यात आली. सुमारे १० महिन्यांत तीन कापण्या करण्यात आल्या. प्रति एकरी कापणीत ८ टन ते कमाल १० टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे.
सहा महिन्यानंतर पहिला हंगाम
सहा महिन्यानंतर जिरेनियमच्या पूर्ण वाढ झालेल्या पानांचा पहिला गळीत हंगाम केला. त्यातून पंचविस किलो तेल मिळाले. प्रतिकिलो बारा हजार रुपये दर मिळून तीन लाख रूपये मिळाले. त्याच वर्षातील सहा महिन्यानंतरच्या दुस-या हंगामातही तीन लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. दूस-या वर्षातील हंगामातही जवळपास तितकेच आर्थिक उत्पन्न मिळाले. त्यानंतर पूढे दर तीन महिन्यानंतर एक याप्रमाणे वर्षात चार हंगाम मिळू लागले. जोडीला रोप विक्रीतूनही उत्पन्न सुरू झाले.
जिरेनियमची लागवड
त्यानंतर कोरोनासंदर्भातील बंधने शिथिल होत असताना अडीच एकर क्षेत्रात जिरेनियमची लागवड करण्यासाठी सातारा येथून पाच रुपये प्रती रोप याप्रमाणे चौदा हजार रोपे खरेदी केली. मशागत केलेल्या क्षेत्रात दीड फूट अंतरावर एक याप्रमाणे जिरेनियमची लागवड केली. पूर्वतयारी ते जिरेनियमची लागवड होईपर्यंत सुमारे अठरा लाख रूपये खर्च आल्याचे खोपडे यांनी सांगितले.
पूर्वतयारी, मशागत व लागवड
पडीक शेतजमिनीपैकी सुरुवातीला अडीच एकर क्षेत्राची जिरेनियमच्या लागवडीसाठी निवड केली. द्र०क्टरच्या सहाय्याने नांगरणी शेत जमिन समतल करून घेतली. एकरी तीन ट्राली शेणखत टाकून खताची मिसळणी केली. उन्हाची चांगली ताप मिळाल्यानंतर पून्हा एक पोते यूरिया, दोन पोती सुपर फास्फेट, सात किलो झिंक, पाच किलो गंधक अशा मिश्रणाच्या खतांची एकरी मात्रा देऊन स-या पाहून जिरेनियम लागवडीसाठी पूर्वतयारी करून ठेवली. जोडीला सिंचन यंत्रणा कार्यान्वित केली. तसेच तेल काढण्यासाठी शेतात नऊ लाख रूपये खर्चाच्या डिस्टीलेशन यंत्रणेची उभारणी केली.
वडिलोपार्जित शेत जमीन गेले १० वर्षे वापरात नव्हती. शेतीतील झाडे झुडपे काढून ट्रक्टरने उभी आडवी नांगरट करून घेतली. जमीन लागवड योग्य करुन भात खाचरात जिरेनियमची लागवड करुन अभिनव असे सुगंधी वनस्पतीचे पीक घेतले. योग्य नियोजन, व्यवस्थापन, पिकाची निगा राखल्याने उत्पादन भरघोस मिळत आहे. वयाच्या ७० व्या वर्षात उद्योगाची उभारणी करण शक्य झाले याचे समाधान मोठे आहे. - अशोक खोपडे, प्रयोगशील शेतकरी, आंबाडे