Join us

Ginger Farming Success Story : किशोररावांच्या आले शेतीची चर्चा भारी; जैविक निविष्ठांची कमाल सारी

By रविंद्र जाधव | Published: October 18, 2024 12:42 PM

गेल्या ६ वर्षांपासून येथील किशोर आपल्या वडीलोपार्जित एक एकर शेतीत आले शेती (Ginger Farming) करत आहेत. यामध्ये या वर्षी पारंपरिक रासायनिक शेतीला फाटा देत जैविक निविष्ठांचा (Organic Farming) वापर केल्याने काकडे यांचा एकरी लाखांचा खर्च केवळ हजार रुपयांवर आला आहे.

जेमतेम १०००-१२०० लोकसंख्या असलेल्या वाघलगाव (ता. फुलंब्री) परिसरात अलीकडे काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात आले शेती केली जात आहे. याच प्रवाहात गेल्या ६ वर्षांपासून येथील किशोर आपल्या वडीलोपार्जित एक एकर शेतीत आले शेती करत आहेत. यामध्ये या वर्षी पारंपरिक रासायनिक शेतीला फाटा देत जैविक निविष्ठांचा वापर केल्याने काकडे यांचा एकरी लाखांचा खर्च केवळ हजार रुपयांवर आला आहे. तसेच यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या प्रवाही समस्येवर मार्ग निघाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाघलगाव (ता. फुलंब्री) येथील किशोर नाना काकडे यांची शेतजमीन तीन बाजूच्या शेतजमिनांच्या तुलनेत १.६ फुटांनी खाली आहे. त्यामुळे अल्प पाऊस झाला तरी शेतात पाणी साठते, ज्यामुळे पिकांवर खर्च करूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळवता येत नाही. जैविक निविष्ठांचा वापर केल्यास शेतातून पाण्याचा त्वरित निचरा होतो, हे लक्षात घेतल्याने यंदा त्यांनी पुरेपूर जैविक निविष्ठांचा वापर करून आले पीक घेतले आहे. गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून यंदाची अद्रक सरस आहे, तसेच वारंवार पाणी शेतातून गेले असतानाही पीक दमदार असल्याचे ते सांगतात.

काकडे यांनी ०८ जून रोजी चार फुटांची बेड सरी आखत टोकन पद्धतीने आले लागवड केली होती. पाण्याच्या उपलब्धतेसाठी २० एमएम ठिबकची व्यवस्था करून 'महाबीज'चे ट्रायकोडर्मा, केएमबी, पीएसबी आदी जैविक निविष्ठांचा लागवडीनंतर ३५ दिवसांपासून दर १५ दिवसांनी वापर करत व्यवस्थापन केले आहे. यामुळे यंदा कुठलीही सड पिकावर आली नसून अधिक फुटवे, सफेद मुळीची अधिक वाढ, अधिक काळ टिकलेला हिरवेपणा आदी बदल दिसून आल्याचे काकडे सांगतात. तर या आले पिकांतून एकरी १०० क्विंटलहून् अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे.

गुणवत्तेमुळे परिसरात मोठी चर्चा

जैविक निविष्ठांचा वापर केल्याने आले पिकांत अधिक काळ टिकणारा हिरवेपणा दिसून येत आहे. यामुळे परिसरातील अनेक शेतकरी काकडे यांच्या शेतावर येऊन आले पीक पाहून माहिती घेत आहेत. काकडे यांच्या जैविक पद्धतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले  असून सध्या काकडे अन् त्यांचे आले पीक चर्चेचा विषय ठरत आहे.

शेतकऱ्यांचा फायदा जैविकची हमी 

शेतकरी अद्रक पिकांत मोठ्या प्रमाणावर खर्च करून विविध खते, औषधी यांचा उपयोग करतात. मात्र बाजारात दर पडल्यास हाती काहीच येत नाही. परिणामी विविध कंपन्या दिवसेंदिवस आर्थिक संपन्न होत आहे. तर दुसरीकडे शेतकरी मात्र हवालदीन होतांना दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जेवढे अधिक शक्य तितक्या प्रमाणावर जैविक शेती करण्याकडे भर दिला पाहिजे. जेणेकरून आर्थिक हानी टळण्यासोबत शेतकऱ्यांचा त्या-त्या पिकांतून अधिकाधिक फायदा होईल. - किशोर नाना काकडे, वाघलगाव. 

हेही वाचा :  Women Farmer Success Story : कुटुंबाच्या मदतीने संगीताताईंची फळ प्रक्रिया उद्योगात भरारी

टॅग्स :शेतीछत्रपती संभाजीनगरशेती क्षेत्रमराठवाडामहाबीजसेंद्रिय शेती