दिलीप मोहिते
विटा : दुष्काळी समजल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्यात आता ताकारी, आरफळ, टेंभूचे पाणी आल्याने शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग हाती घेऊन ते यशस्वी करून दाखवीत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून कमळापूर (ता. खानापूर) येथील सोने-चांदी गलाई व्यावसायिक जयकर (शेठ) हणमंत साळुंखे यांनी त्यांच्या ओसाड माळरान असलेल्या अडीच एकर शेतात दर्जेदार सफरचंदाच्या फळाची बाग फुलली आहे.
सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त देशाच्या अनेक राज्यांत स्थायिक झालेला मराठी माणूस केवळ सोन्याला कस लावण्याचेच काम करीत नसून ओसाड माळरानावर विविध फळांची बागही फुलवू शकतो. तामिळनाडूच्या कोईम्बतूर शहरात सोने-चांदीचा व्यवसाय करणारे कमलापुर (ता. खानापूर) येथील जयकर (शेठ) साळुंखे यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे.
कमळापूर येथे त्यांनी पहिल्यांदा ड्रॅगनफ्रूटची दोन एकर लागवड केली होती. त्यात त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. आता ७ एकर क्षेत्रात त्यांनी जम्बो रेड, देशी रेड, सी व्हरायटी अशा विविध प्रकारच्या ड्रॅगनची लागवड करून दरवर्षी ते लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
गेल्या दीड वर्षापूर्वी साळुंखे यांनी ओसाड माळरानावर सफरचंद फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी व्हिएतनामहून कोलकाता येथे आणलेल्या हरमन ९९, एन्ना व गोल्डन डोरसेट या जातींची आणि उष्ण हवामानात टिकणारी सफरचंदाची रोपे आणली.
आपल्या भागातील उन्हाळाचा तडाखा, पाण्याची कमतरता, तसेच बदलत्या हवामानाचा धोका या सर्वांचे आव्हान स्वीकारून त्यांनी अडीच एकर शेतात सफरचंदाच्या एक हजार रोपांची लागवड केली. आता अवघे दीड वर्ष वय असलेली ही झाडे सफरचंद फळांनी बहरलेली आहेत.
या झाडांना पहिल्यांदाच फळे लागल्याने या फळांचा आकार कमी असला तरी पुढील हंगामात हीच फळे मोठ्या आकाराची होणार आहेत. पण सोने-चांदी गलाई बांधव जयकर (शेठ) साळुंखे यांनी कमळापूरच्या ओसाड माळरानावर हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. दुष्काळी भागातील आता पारंपारिक शेतीला बगल देत ते नवनवीन प्रयोग करत आहेत.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके घेण्यापेक्षा नवीन प्रयोग व विविध प्रकारच्या फळांची लागवड केली तर नक्कीच उत्पन्न चांगले मिळते. सध्या मी शेतात ड्रॅगनफ्रूटसह सफरचंद, संत्रा, मोसंबी, फणस, मेक्सिकोचे अॅव्हाकाडो, पांढरा जांभूळ आदी प्रकारच्या फळझाडांची लागण केली आहे. ही सर्व फळझाडे वर्षातून दोनवेळा उत्पन्न देणारी आहेत. तसेच या फळझाडांबरोबरच आंतरपीक म्हणून पपईची लागण केली आहे. त्यामुळे वर्षभरात मला शेतीत यातून चांगले उत्पन्न मिळेल. - जयकर (शेठ) साळुंखे, कमळापूर प्रगतिशील शेतकरी