Join us

केशर आंब्याने दिली हमी; फळबाग येतेय शेतकर्‍यांच्या कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 16:12 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील महिला शेतकरी सिंधू शेळके यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय खताचा करून वापर केसर आंब्याची बाग फुलविली असून यातून त्यांना वर्षाला ७ लाख रुपयांचे हमखास उत्पन्न मिळत आहे.

रऊफ शेख

फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील महिला शेतकरी सिंधू शेळके यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय खताचा करून वापर केसर आंब्याची बाग फुलविली असून यातून त्यांना वर्षाला ७ लाख रुपयांचे हमखास उत्पन्न मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिंधू शेळके यांचे पती सर्जेराव शेळके हे शासकीय नोकरीत असल्याने त्यांनी शेतीचा कारभार आपल्या हाती घेतला. २००१ पासून त्यांनी आपली शेती आधुनिक पद्धतीने करण्याचा मानस करून जमिनीचा पोत समजून घेतला. शास्त्रीय पद्धतीने जमिनीतील मातीचे परीक्षण केले. पाण्याची उपलब्धता असल्याने त्यांनी १२ एकर शेतात केसर आंब्याची लागवड केली.

रासायनिक खतांला फाटा देत सेंद्रिय खताचा वापर केला. काही वर्षानंतर त्यांच्या बागेतील आंब्यांना फळे लागण्यास सुरुवात झाली. हे केशर आंबे त्यांनी प्रारंभी आपल्या शेतीसमोर जळगाव महामार्गावर स्टॉल लावून विकण्यास सुरुवात केली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. आंब्याचे उत्पादन दरवर्षी वाढत गेले, त्यानुसार उत्पन्नात भर पडत गेली. गेल्या वर्षी त्यांना केशर आंब्याच्या विक्रीतून ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तसेच त्यांनी शेतात चिंच, सीताफळ, बांबू, सागवान आदींचीही लागवड केली आहे.

फळबाग शेतीत नियोजनाला फार महत्त्व आहे. यात अनेक जोखिमादेखील असतात. उत्पादन वाढले तर भाव कमी होतात. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी-कधी पीक हातचे जाते. त्यामुळे यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असून एकच पीक पद्धतीचा वापर न करता बहुविध पीक पद्धतीचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

-सिंधू सर्जेराव शेळके

टॅग्स :आंबाशेतीमराठवाडाजागतिक महिला दिन