Guava Cultivation Success Story :
लक्ष्मण कच्छवे : परभणी जिल्ह्यातील दैठणा या गावातील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी अनंत कच्छवे यांनी पेरू लागवडीतून लाखोंचे उत्पन्न घेत आर्थिक प्रगतीचा मार्ग निवडला आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग केंद्रित शेतीचा ध्यास अन् तंत्रज्ञानाची कास धरत दैठणा येथील एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाने आर्थिक प्रगती साधली आहे.
योग्य नियोजन, आंतरपिकांच्या माध्यमातून केवळ पाच एकर मधून घेतलेले पेरू, झेंडूच्या अंतर पिकातून उल्लेखनीय उत्पन्न कच्छवे यांनी घेतले आहे. शेती म्हटली की, आज उत्पन्न कमी अन् खर्च अधिक अशी परिस्थिती शेती व्यवसायाची झाली आहे. अतिवृष्टी, पावसाचा खंड, गारपीट आदींसह पिकांवरील कीड रोगांचा प्रादुर्भाव अशा संकटांचा सामना शेतकरी करीत आला आहे.
परिणामी यातूनही हाती आलेल्या पिकाला बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी नेहमीच निराशा पडते. या पारंपरिक शेतीला फाटा देत परभणी तालुक्यातील दैठणा येथील अनंतराव ज्ञानोबा कच्छवे यांनी पाच एकर क्षेत्रावर फळबागेची लागवड केली. योग्य नियोजन आणि परिश्रमामुळे लागवड केलेली पेरूंचीबाग बहरून गेली.
खानावळीच्या व्यवसायातून आनंतराव कच्छवे यांनी दैठणा शिवारात सहा एकर जमीन खरेदी केली. यातील पाच एकर क्षेत्रावर पारंपरिक पिके घेण्याऐवजी पेरू लागवडीवर भर दिला.
मागील तीन वर्षांपासून फळधारणा होत असून यातून दरवर्षी ५ ते ७ लाखांचे उत्पन्न मिळवत आहे. यासाठी संपूर्ण कुटुंब काम करत असून इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरत आहे.
पाच एकर मधून सात लाखांचे उत्पन्न
कच्छवे यांचे संपूर्ण कुटुंब हे शेती व्यवसायात काम करतात. पाच एकरमधील पेरूच्या बागेत आंतरपिके घेऊन त्यांनी चांगले उत्पन्न मिळवत आहे. मागील तीन वर्षांपासून पेरूची थेट विक्री करीत असल्याने दरही चांगला मिळत आहे. प्रतिकिलो ५० रुपये दराने पेरू तसेच आंतरपिकातून ते दरवर्षी ५ ते ७ लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत.
उत्पादक ते ग्राहक संकल्पना
परभणी- गंगाखेड मार्गावर कच्छवे यांची शेती असून या मार्गाचा त्यांनी चांगला उपयोग करून घेत आहेत. शेतातील पेरू मार्गाच्या कडेला स्टॉल उभारून स्वतः विक्री करतात.
त्यामुळे उत्पादक ते ग्राहक अशी एक साखळी त्यांनी निर्माण केली असून पेरू खरेदीसाठी परिसरासह वाहनधारक आवर्जून खरेदी करतात.
शेतीत योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर बाजारपेठेतील भावाचा अंदाज याचा योग्य ताळमेळ साधत आज प्रगती करीत आहोत. इतर शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीच्या माध्यमातून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. - अनंत कच्छवे, शेतकरी