सुरेंद्र शिराळकरआष्टा: पारंपरिक ऊस शेतीला बाजूला ठेवून आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी प्रशांत नारायण शिंदे यांनी व्हीएनआर जातीच्या पेरूचे एक एकरातून वर्षात सुमारे सात लाखापर्यंत विक्रमी उत्पादन घेतले आहे.
विक्रीसाठी मुंबई, पुण्याला पाठविण्यापेक्षा शिंदे यांनी स्वतःच पेरुची विक्री केल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन चांगले उत्पादन मिळाले आहे. शिंदे यांची शेती आणि त्यांचे कौशल्य अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श असेच आहे.
प्रशांत शिंदे यांची आष्टा ते इस्लामपूर रस्त्याशेजारी १० एकर शेती आहे. त्यांनी दहा एकर ऊस लागवड करून बांधवरची शेती करण्यापेक्षा त्यामध्ये त्यांनी विविधता आणली. १० एकर जमिनीपैकी दोन एकर ऊस, साडेचार एकर केळी आणि एक एकर क्षेत्रात पेरुची लागवड केली आहे.
प्रशांत शिंदे यांनी जून २०१८ मध्ये शेतीची उभी आडवी नांगरट करून शेणखत घालून पेरू लागणीसाठी जमीन तयार केली. त्यानंतर छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून व्हीएनआर जातीची रोपे आणली. १८० रुपयाला एक याप्रमाणे १२ बाय ८ फुटावर सुमारे ४५० रोपांची लागवड केली.
या झाडांची उंची सुमारे तीन फूट झाल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बागेची तीन टप्प्यात छाटणी केली. छाटणीनंतर सात महिन्यांनी पेरूचे उत्पादन सुरू झाले. पहिल्या वर्षी सुमारे एक लाख लाखाचे उत्पादन मिळाले.
दररोज सुमारे ६० ते ७० किलो पेरू प्रशांत शिंदे व त्यांचे कुटुंबीय स्वतः विक्री करत असल्याने त्यांना वर्षाला सात लाख रुपये उत्पादन मिळते. यातील दोन लाख रुपये कामगार, खते व इतर खर्च वजा करता सुमारे पाच लाखापर्यंत नफा मिळाला. प्रशांत शिंदे यांना कासेगाव येथील शिवाजी पाटील व कुणाल काळोखे यांच्याकडून कृषीविषयक योग्य मार्गदर्शन मिळाले.
पेरूवरती मिलीबग्ज, फुल किडे आणि मावा व बुरशीजन्य रोगासाठी कीटकनाशके व बुरशीनाशके फवारण्यात येत आहेत. पेरु लिंबाच्या आकाराएवढा झाल्यानंतर त्याला फोम, प्लास्टिक कागद व वर्तमानपत्राचा कागद लावल्याने अळीपासून संरक्षण मिळते. पेरू चवीला गोड असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. स्वतः विक्री केल्याने नफा मिळतोय. - प्रशांत शिंदे, पेरू उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: विजेच्या बेभरवश्याला दिली आधुनिकतेची जोड; भाऊसाहेबांच्या कांदा उत्पादनाला नाही तोड