Join us

पडिक ११ एकरवर घाम गाळला; पिकविल्या फळबागा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:48 AM

अन्य तरुणांप्रमाणे शिक्षण घेऊन नोकरीसाठी मुंबई किंवा अन्य शहरांकडे जाण्याऐवजी गावातच राहून शेती करण्याचा निर्णय भडे येथील महेश रामचंद्र तेंडुलकर या तरुणाने घेतला आणि काजु आंबा, सुपारी, नारळ लागवड करून बागायती विकसित केली.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : अन्य तरुणांप्रमाणे शिक्षण घेऊन नोकरीसाठी मुंबई किंवा अन्य शहरांकडे जाण्याऐवजी गावातच राहून शेती करण्याचा निर्णय भडे येथील महेश रामचंद्र तेंडुलकर या तरुणाने घेतला आणि काजु आंबा, सुपारी, नारळ लागवड करून बागायती विकसित केली. पावसाळी चार महिने बागायतीला पाण्याची आवश्यकता पडत नाही. मात्र, अन्य आठ महिने पाणी आवश्यक आहे. विजेच्या पंपाचे बिल शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे महेश यांनी सोलार पंप बसविला असून, त्यामुळे विजेच्या बिलाचा खर्च वाचला आहे. महेश याचे वडील रामचंद्र पूर्वी केटरिंग व्यवसाय करत असत. आई बालवाडी शिक्षिका आहे. महेशने गावात राहून शेतीचा निर्णय घेतला, त्यासाठी त्याला आई-वडिलांचेही प्रोत्साहन मिळाले.

लागवडीपूर्वी जागेची साफसफाई करून एक हजार काजू, ७५ हापूस आंबा, ७०० सुपारी, ६० नारळाची लागवड केली आहे. अकरा एकर क्षेत्रावर योग्य नियोजन करून बागायती विकसित केली आहे. उत्पादन सुरू झाले असून स्वतःच विक्री करत आहेत. महेश यांनी बागायती लागवड केल्यानंतर झाडांना पाणी देण्यासाठी पंप बसविण्याचा निर्णय घेतला, मात्र विजेच्या पंपाचे बिल भरणे अशक्य होते. त्यामुळे विजेऐवजी सोलार पंप बसविण्याचा निर्णय घेतला. नैसर्गिक स्रोतावर पाण्याचे पंप चालत असून, झाडांना मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होत आहे. वीज बिलाचे पैसे यामुळे वाचले आहेत. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महेश तेंडुलकर करत आहेत.

ओल्या काजूगराची विक्री हवामानाचा परिणाम पिकावर होतो, त्यामुळे उत्पादन खालावत आहे. अन्य पिकांच्या तुलनेत काजू, नारळ, सुपारी ही पिके खर्चिक तर नाहीच, शिवाय नाशवंतही नाहीत. दर चांगला मिळाला तर शेतकऱ्यांना आर्थिक प्राप्ती करून देणारी पिके आहेत. महेशने आंचा लागवडही केली आहे. मात्र, काजू, सुपारीची लागवड सर्वाधिक आहे. ओल्या काजूगरासह वाळलेल्या बीलाही चांगली मागणी आहे. त्यामुळे ओल्या काजूगराची विक्री अधिक करत आहेत. शिवाय वाळलेली बी सुद्धा विक्री करत आहेत. सुपारीसुद्धा खर्चिक पीक नाही. शिवाय दर चांगला मिळाला की, विक्री करता येते. सध्या नारळाला मागणी अधिक असून, दरही चांगला मिळत आहे. गावातल्या गावातच नारळ विक्री होत आहे. आंब्याची खासगी विक्री करत आहेत.

अधिक वाचा: कुंडलच्या शेतकऱ्यांकडून उच्चांकी १३१ टन उसाचे उत्पादन

सेंद्रिय खतांचा वापरबागेतील पालापाचोळा, कुजलेले शेण एकत्रित करून त्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत बागायतीसाठी महेश वापरत आहेत. रासायनिक खतांचा वापर मात्र मर्यादितच करत आहेत. सेंद्रिय खतांमुळे झाडांची वाढ चांगली झाली आहे. चांगल्या दर्जाची उत्पादने मिळत आहेत. योग्य नियोजनाने लागवड केली असून, झाडापासून आता उत्पादनही सुरु झाले आहे. महेशला कृषीतज्ज्ञ संदीप डोंगरे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे.

सोलार पंपामुळे पैशाची बचतझाडे जगविण्यासाठी मुबलक पाणीपुरवठा करावा लागतो, विजेच्या पंपाचे येणारे वीज चिल परवडत नाही, त्यावर महेश याने मार्ग काढत सोलार पंप बसविला आहे. यामुळे दरमहा वीज बिलाच्या पेंशात बसत झाली आहे. सोलार पंप बसविणे खर्चिक बाब आहे. मात्र, त्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध होते. पंप/युनिट बसविण्यासाठी खर्च दामदुप्पट येत असला तरी 'लाइफ टाइम' ही योजना फायदेशीर असून, महेशने भविष्याचा विचार करत सोलार पंप बसविला आहे. सोलार पंपामुळे पाण्यासाठी चांगला फायदा होत असल्याचे सांगितले.

अधिक वाचा: अबिदअली काझी यांनी नोकरीच्या मागे न धावता फळशेतीला दिली पसंती

आई-वडिलांची शेतीच्या कामासाठी मदत रामचंद तेंडुलकर यांची स्वतःची अकरा एकर जमीन पडीक होती. या पडीक जमिनीचर महेशने बागायती विकसित करण्याचा निर्णय घेतला असता आईवडिलांनी संमत्ती तर दिली शिवाय शेतीच्या कामासाठी मदतही करत आहेत. कोणत्या पिकाची किती लागवड करावी, कलमे कुठून आणावी याबाबतही लेकाला मदत केली, काजू व सुपारीची लागवड सर्वाधिक केली आहे. तुलनेने नारळ व आंब्याची लागवड कमी आहे. सोलार सिस्टममुळे मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होत असून, खत, पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे आहे चांगली तरारली आहेत.

टॅग्स :शेतकरीआंबाकोकणशेतीफलोत्पादनपीकसेंद्रिय खत