रविंद्र शिऊरकर
रस्त्याच्या कडेला जेमतेम भांडवलात गुऱ्हाळ उभारत छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील शेतकरी गुळाची हातोहात विक्री करत लाखोंची उलाढाल करत आहे.
राजाराय टाकळी गावातील रशिद शेख हे वयाच्या १६ - १७ व्या वर्षांपासून एका स्थानिक गुऱ्हाळात काम करत. तब्बल वीस वर्षे त्यांनी तिथे काम केले. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करूनही पैशांची चणचण कायम होती. त्यामुळे त्यांनी तेथून काढता पाय काढला खरा. घरची दोन एकर शेती ज्यात पाण्याचा अंदाज घेत ऊस, मका कपाशी पिके ते घेतात. पारंपरिक शेतीसह आपल्या घरचा ऊस असल्यानं त्याद्वारे गुळ तयार करून विकला जाऊ शकतो अशी कल्पना त्यांना सुचली आणि सुरु झाला त्यांचा स्वतंत्र प्रवास.
जमापुंजी लावत आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन त्यांनी आपल्या राजाराय टाकळी गावात छोटेसे गुऱ्हाळ सुरु केले. प्रतिसाद उत्तम मिळाला. मात्र, आडवळणी गाव असल्याने बाजारपेठ हवी तशी मिळेना. पुढे जागा बदलण्याचे निश्चित केले. शोधाशोध केली. परिसरातील काटशेवरी फाटा तालुका खुलताबाद जवळ वीस गुंठे जागा वार्षिक पंचवीस हजार रुपये भाड्याने मिळाली आणि सुरु झाले सुमारे पाच क्विंटल दैनंदिन गुळ उत्पादन करणारे गुऱ्हाळ. नोव्हेंबर ते मे असे सहा महिने शेख गुऱ्हाळ चालवितात. आता त्यांच्या गुऱ्हाळाला पाच वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा जम बसला आहे.
समोर सतत वाहतूक असणारा वर्दळीचा रस्ता असल्याने जाता येता नागरिक गुऱ्हाळाला बघून थांबतात व गुळाची खरेदी करतात. ज्यातून तयार होणाऱ्या संपूर्ण गुळाची जागेवर हातोहात विक्री होती.
ऊस ते गुळ प्रक्रिया
परिसरातील शेतकऱ्यांकडून २८०० ते ३००० रुपये टन याप्रमाणे ऊस खरेदी केला जातो. ज्यात कापणी, वाहतूक, हे खर्च शेख यांचेच असतात. ऊसाचा रस काढला जातो. त्यात भेंडीच्या झाडांचा रस मिसळला जातो. ज्यामुळे ऊसाच्या रसाला उकळी येताना बाजूला आलेली काजळी दूर करणं सोपं होतं. काजळी काढत काढत तब्बल तीन तास मोठ्या कढईमध्ये ऊसाचा रस उकळला जातो.
त्यानंतर यात एक टक्का एरंडाचं तेल मिसळलं जातं. पुढे हे सर्व मिश्रण एका हौदासारख्या जागी पसरून त्याला थंड करतात आणि विविध किलोंच्या साचामध्ये या मिश्रणाचा गाळा करत गुळ तयार होतो.
खर्च व उत्पन्न
दररोज ४.५ टन ऊसाचे गाळप होत असलेल्या शेख यांच्या गुऱ्हाळाच्या खर्चात वार्षिक २५ हजार रुपये जागेचा किराया आहे. तसेच गुऱ्हाळ असलेल्या ठिकाणी रशिद शेख यांच्यासमवेत आणखी चार जण मिळून हे काम करतात.
ऊस संकलित करणे, भेंडीची झाडे जमा करणे व वाहतूक करून गुऱ्हाळ पर्यंत पोहचविणे आदी काम पाच मजूर बघतात. या सर्वांना दैनंदिन रोजनदारी वर ठेवण्यात आले आहे.
गुऱ्हाळात तयार होणारा गुळ विक्रीसाठी १,५,१०,२६ या मापाच्या वजनात उपलब्ध असतो. ५० रुपये किलोने त्याची विक्री होते. तर द्रावण स्वरूपातील गुळाची काखी १०० रुपये लिटर प्रमाणे विकली जाते.