- दत्ता लवांडे
Pune Young Farmer Success Story : माणूस कितीही शिकला आणि नोकरी करत असला तरी तो शेतीमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करून चांगला नफा कमावू शकतो हे भोर तालुक्यातील नेरे येथील महेश मैंद यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीसुद्धा घेतलेली आहे. ते सध्या पोस्टात नोकरी करत असून शेतीमध्ये त्यांनी नवनवे प्रयोग केले आहेत. नोकरी सांभाळत त्यांनी शिमला मिरचीमधून भरघोस उत्पादन काढले आहे. शेतीमध्ये अडचणी येतात पण योग्य व्यवस्थापनाने शेती यशस्वी करता येते हे त्यांच्या प्रवासातून दिसून येते.
पुण्यातील भोर तालुक्यातील नेरे गावचे महेश मैंद यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि MBA in agri finance management पूर्ण केलंय. त्यांच्या कुटुंबामध्ये आजी, आईवडील, चुलता, चुलती आणि भावंडे असा एकत्र परिवार आहे. कुटुंबातील सर्व तरूण नोकरीसाठी शहरात राहत असल्याने सर्वांचेच शेतीकडे दुर्लक्ष होत होते. वडील लष्करात नोकरीला होते. निवृत्तीनंतर ते मुंबईत भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरी करत असतानाही शेतीची आवड असल्याने त्यांनी ऊसाचे पीक घेतले होते. आठवड्यातून २ दिवस सुट्टी असल्याने ते गावाला येऊन शेतीचे काम करत.
तर भाऊ मयुर कॉलेजला असताना शेती करत होता पण नंतर तोही लष्करात भरती झाला. दरम्यान, महेश यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण मुंबई येथून पूर्ण झाल्यावर त्यांनी केळकर ऑटो पार्टस प्रायव्हेट लिमटेड कंपनी मध्ये अडीच वर्ष Quality Engineer या पदावर नोकरी केली. पण शेती करण्याचं वेड त्यांना काय स्वस्थ बसून देत नव्हतं. कारण पूर्वजापासूनच रक्तात शेतीची आवड असल्याने ते शेतीकडे वळाले आणि कंपनी मधील नोकरीला राजीनामा दिला. कंपनीत राजीनामा दिल्यानंतर ग्रामीण पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी लागली. पण पोस्टात नोकरी सुरू असताना शेती सोडली नाही. म्हणून आता खरी परीक्षा सुरू झाली होती. इंजिनिअरींग झालेल्या आणि पोस्ट ऑफिस नोकरी करत असलेल्या महेशने नोकरी सांभाळत शेतीची जबाबदारी लिलया पार पाडली.
शेतीची सुरूवात करताना अडचणी तर खूप आल्या. हायटेक, फायद्याची आणि व्यावसायिक पद्धतीने शेती करायचं हे महेश यांच्या डोक्यात होतं. आजकालच्या मॉडर्न ट्रेण्डप्रमाणे पारंपारिक शेतीला बगल देत सरी पद्धतीने ड्रिप, मल्चिंग वापरून पहिलं पीक मिरचीचं घेतलं. या पिकामध्ये प्रमुख अन्नद्रव्ये, सुक्ष्म अन्नद्रव्ये, फवारणीचे औषधे, कीटकनाशके, बुरशीनाशके, टॉनिक यांची माहिती भेटली. मग खरी हायटेक शेतीची सुरवात करण्यासाठी ग्रीनहाऊस, पॉलीहाऊस या बाबत माहिती घेण्यास सुरूवात केली.
गावातीलच एका पॉलीहाऊसवर वेळ काढून प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथे एका वर्षभरामध्ये पिके, खते, औषधे त्यांचे नियोजनाचे बारकाईने निरीक्षण केले व त्या बाबतीतील संपूर्ण माहिती घेतली. यासाठी प्रगतशील शेतकरी संभाजी (नाना) बढे यांच्या कडून महेश यांना चांगले मार्गदर्शन लाभले . त्यानंतर NIPHT's Horticulture Training Centre, तळेगांव या ठिकाणी आत्माचे कृषी अधिकारी लक्ष्मीकांत कणसे सर यांच्या मार्गदर्शनाने ५ दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण केले आणि ग्रीनहाऊस उभं करण्याचं निर्णय घेतला.
आर्थिक गणिते जुळवण्यासाठी जुने शेडनेट विकत घेतले आणि ५ मीटर उंची असलेले मॉडर्न डिझाईनचे शेडनेट उभे केले. यामध्ये सुरूवातीला काकडीचे पीक घेतले. पण सुरूवातीला अनुभव नसल्याने म्हणावे असे उत्पन्न मिळाले नाही. त्यात बाजारभाव कमी मिळाल्यामुळे अर्थिक गणिते जुळली नाहीत. दुसरं पिक पावसाळ्यामुळे झेंडूचे घेतले. यामध्ये प्रयोग म्हणून थोड्या जागेत काकडी घेतली होती. झेंडूलाही बाजारभाव नव्हता पण महेश यांनी मार्केटिंग करून झेंडू विकला व फायदा मिळवला. झेंडू या पिकामुळे दोन फायदे झाले, एक निम्याटोड कंट्रोलमध्ये आला आणि तो रोटरने मातीत गाडल्याने त्यांचे खतही झाले.सध्या हिरवी शिमला मिरची हे पिक घेतले आहे ह्या साठी नियोजपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या .
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातून त्यांनी रोपे आणली होती. मशागत, बेसल डोस खते, मल्चिंग , रोपांचा, खताचा , औषधांचा असा ५० ते ६० हजार खर्च झाला. ४५ ते ५० दिवसात मिरची तोडणी चालू झाली आतापर्यंत २ टन उत्पन्न निघाले आहे आणि बाजारभाव ४५ ते ५० रूपये असल्याने ९० हजार रूपयांचे उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता ३० हजार नफा झाला आहे व अजून ३ ते ४ टन उत्पादन निघेल व बाजारभाव असाच राहिला तर २ लाखापर्यंत कमीत कमी नफा होईल ही अपेक्षा महेश यांना आहे.
जॉब करत असताना शेती करायची म्हणजे सुरवातीला खूप तारेवरची कसरत होत होती पण मित्र किरण यादव हे SRT पद्धतीने शेती करतात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन महेश यांना लाभले. सकाळी ९ वाजल्यापासून २ वाजेपर्यंत ड्युटी करणे आणि सकाळी २ तास तर संध्याकाळी ३ तास काम करून शेतीमधील हे यश साध्य केल्याचं महेश सांगतात.
नैसर्गिक शेती अन् वेगवेगळे प्रयोगरासायनिक खताचा वाढता वापर, खर्च आणि त्यांचे दुष्परिणाम यापासून वाचण्यासाठी कमी खर्चाची विषमुक्त नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी वेळू येथील गुलाब घुले या शेतकऱ्याचे मोलाचे मार्गदर्शन महेश यांना लाभले. सुरूवातीला एक देशी खिल्लारी जातीची गाई घेतली. शेण आणि गोमुत्रापासून जीवामृत आणि स्लरी बनवून शेतात सोडली जाते. १० ड्रम थेअरी आणि जिवाणू वापरून मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न महेश यांचा आहे. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी कृषी विभाग भोर यांच्या मार्गदर्शनाने बालसिध्देश्वर नैसर्गिक शेती बचत गट नेरे यामध्ये काम चालू आहे.
तसेच फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीमध्ये सहभागी होऊन काम चालू आहे. शेतीमध्ये पूरक जोडधंदा, वेगवेगळे प्रयोग करुन व्यावसायिक फायद्याची शेती करण्यासाठी महेश नेहमीच प्रयत्नशील असतात. इंजिनिअरिंग, शेतीतल शिक्षण आणि पोस्टात नोकरी करता करता शेतीमध्ये त्यांनी मिळवलेले यश आणि त्यांचे सातत्य नक्कीच इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरेल ही अपेक्षा.
Pune Bhor Young farmer Natural Organic Farming