शेतीबरोबर एखादा जोडव्यवसाय सुरू केला तर परिस्थिती बदलते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मूळच्या बीड जिल्ह्यातील वाकनाथपूरच्या शांताबाई दादासाहेब खाकरे.
शेतीबरोबरच छोटेखानी गृह उद्योग करत असताना यातूनही त्यांना मर्यादितच पैसा मिळत होता. घरची पाच एकर कोरडवाहू शेती पावसावरच अवलंबून होती. डाळ मिल चालू उभा करताना मोठा प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे भांडवलाचा.
एके दिवशी जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यक्रमांतर्गत त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबद्दल माहिती मिळाली. ती त्यांनी आपल्या पतीला सांगितली. योजना आशादायक वाटल्यावर योजनेसाठी लागणार्या कागदपत्रांची जमवा-जमव करून त्यांनी वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत बीड येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्जाचा प्रस्ताव दाखल केला. अगदी अल्पावधीतच त्यांना चार लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले.
या मिळालेल्या रकमेतून त्यांनी डाळ मिलसाठी लागणारी सामग्री व यंत्राची खरेदी केली. या यंत्राद्वारे आजूबाजूच्या शेतकरी बांधवांकडून आणि गावातून कच्चा माल घेऊन त्यापासून डाळ तयार करतात.
मूग डाळ, तूर डाळ अशा अनेक प्रकारच्या डाळी तयार करून शांताबाई आणि त्यांचे पती बाजारात विकतात. शेतीला मिळालेल्या जोड धंद्यामुळे शांताबाईंना आता खर्च वजा जाता महिन्याकाठी चांगला नफा मिळतो. यातून त्या आपल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि कौटुंबिक खर्च भागवतात.