Join us

नांदेडच्या शेतकऱ्यांच्या जमिनीतला सेंद्रिय कार्बन वाढला, त्याची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 12:26 PM

नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. कपाशीचे उत्पन्न घेतल्यानंतर राहिलेल्या पराट्या एकतर जाळून टाकल्या जातात, किंवा मजूर लावून त्याची काढणी केली जाते व इंधन म्हणून वापर केला जातो. ही दोन्हीही कामे खर्चिक तसेच मजूर व वेळ लागणारे आहे. दुसरीकडे जमिनीची धूप, पाण्याची धूप व जमिनीतील कमी होत असलेली अन्नद्रव्ये यावरही याचा परिणाम होतो. तसेच पिकाच्या वाढीवर तसेच जमिनीच्या भौतिक गुणधर्मावरही परिणाम होतो.

अमेरिकेमध्ये, पोषक अन्नद्रव्य साखळी आणि मातीच्या आरोग्यासाठी ७०% पर्यंत कापसाच्या पराट्या/ इतर पिकाचे अवशेष जमिनीला परत दिले जातात, तर भारतात १५% पिकाचे अवशेष इंधनासाठी वापरले जातात, तर उर्वरित शेतात जाळले जातात. त्यामुळे प्रदुषणही होते.

मात्र नांदेड जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पारंपरिक गोष्टीला फाटा देत वेगळेच प्रयोग केले आणि या पराट्या निर्मुलनाचा प्रश्न सकारात्मक पद्धतीनं सोडवला. संस्कृती संवर्धन मंडळ, अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील काटकळंबा येथे शेतकऱ्याच्या शेतावर “मोबाईल श्रेडरद्वारे केलेले कापसाच्या पराट्यांचे बारीक तुकडे करुन जमिनीची सुपीकता वाढविण्याचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात पराट्यांना बारीक करून त्यांना मातीत मिसळण्यात आले. त्यातून जमिनीची सुपीकता वाढवणे व जमिनीचा पोत सुधारणे हे उद्देश सफल झाले. या प्रयोगापूर्वी जमिनीतील ०.३ % होता, जो आता एक टक्क्यांपेक्षाही जास्त झालेला आहे.

या प्रयोगासाठी ट्रॅक्टर ऑपरेटेड मोबाईल श्रेडर चा वापर करण्यात आला. मोबाईल श्रेडर हे एक ट्रॅक्टरचलीत मशीन आहे जे कापसाच्या पराट्या कापून त्यांचे छोटे तुकडे करते व त्याची बुट्टी बनवून जमिनीवर फेकले जाते. यंत्राचा हाच उपयोग करून अनेक शेतांमध्ये पराट्यांचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले व हे तुकडे लगेचच शेतावर टाकण्यात आले. तसेच माती परीक्षण ही करण्यात आले. या यंत्राची क्षमता अर्ध्या तासाला ०.३४ हेक्टर इतकी आहे. त्यासाठी ताशी साडेचार लिटर इंधन लागते. एका तासात अडीच ते तीन टन पराट्यां बारीक होऊ शकतात. या यंत्राची रूंदी ८५ सेंमी. इतकी असते.

कापसाच्या देठात खालीलप्रमाणे वनस्पतींचे पोषक घटक असतात जे पराट्याचे तुकडे किवा भुकटी करून प्रति एकरला मिळतात.

  1. नायट्रोजन(N) 1.17% 35.10 kg/एकर

  2. फॉस्फरस (पी) 0.54% 16.20 किलो/एकर

  3. पोटॅशियम(के) 0.39% 11.70 किलो/एकर

  4. सल्फर (एस) 1.35% 40.50 किलो/एकर

  5. कॉपर(Cu) 1.10ppm 3.3 kg/एकर

  6. लोह (Fe) 18.37ppm 55.110 kg/एकर

  7. मॅंगनीज(Mn) 12.07ppm, 36.210 kg/एक

  8. झिंक (Zn) 9.48 मिमी, 28.440 किलो/एकर

  9. पराट्या पुन्हा शेतात टाकण्याचे फायदे

  10. जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते.

  11. जमिनीपासून घेतलेली मूलद्रव्ये जमिनीतच परत केली जातात.

  12. जमिनीचा पोत सुधारतो.

  13. जमिनीचा निचरा सुधारतो .

  14. मूलद्रव्यांचा निचरा कमी होतो .

हा प्रयोग मार्च महिन्यामध्ये करण्यात आलेला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यावर मशागत करून पेरण्या केल्या. चाळीस दिवस उलटल्यानंतर पिकांचे अवशेष ज्या शेतामध्ये टाकलेले आहेत तसेच न टाकलेल्या शेतामधील मातीचे नमुने घेण्यात आले व ते तपासण्यास आले. त्यामध्ये असे दिसून आले की जमिनीमधील जे काही अन्नद्रव्य आहेत यामध्ये वाढ झाली. तसेच जमिनीतील कार्बन कंटेंट म्हणजेच सेंद्रीय कार्बन एक टक्यापेक्षा जास्त दिसून आला.

जमिनीवर असलेल्या पराट्यांचा वापर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी व जमिनीचे अन्नद्रव्य परत करण्यासाठी तसेच सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी करण्यात आला आहे. हे काम मोबाईल श्रेडर या मशीन द्वारे करण्यात आले.

कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या FLD कार्यक्रमांतर्गत 22 Aug 2023 रोजी कटकलंबा येथे "मोबाईल श्रेडर द्वारे केलेले कापसाच्या पराट्यांचे अवशेष करुन वाढवली जमिनीची सुपीकता" या विषयी शेती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शेती दिनामध्ये एकूण ३०शेतकरी व शेतमजूर महिला सहभागी झाल्या होत्या. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य, पिकांना लागणारे मूलभूत घटक सध्या ॲग्रीकल्चर मध्ये असलेली चॅलेंजेस व त्यावर मात करणारे विकल्प सांगितले. त्याचबरोबर मोबाईल श्रेडर व त्यामुळे होणारे फायदे सांगण्यात आले कापसाच्या पराठ्यांचा सेंद्रिय पदार्थांमध्ये किती व कसे परिवर्तन होते याबद्दलही माहिती देण्यात आली. 

मोबाईल श्रेडरनं कापसाच्या पराट्याची बुट्टी करून ती शेतामध्ये टाकण्यात आली. त्यानंतर त्या जमिनीवर कृषी विज्ञान केंद्राने सांगितल्याप्रमाणे मशागत केली, व सोयाबीनचे पिक घेतले. ज्या जमिनीवर पराट्याची भुकटी टाकण्यात आली होती त्या जमिनीवर सोयाबीनचे पीक खूप चांगले आले आहे(त्यावर रोगराही चा प्रादुर्भाव ही कमी दिसून आला) खूप जास्त फुलं पान दिसून येत आहेत. पराट्यांच्या भुकटीमुळे खतांमध्येही बचत झाली. 

कपिल चावरे, रा काटकळंबा, ता कंधार, जि नांदेड

डॉ.प्रियंका राजकुमार खोले, विषय विशेषतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, नांदेड 

टॅग्स :सेंद्रिय शेतीशेतकरीलागवड, मशागत