Join us

नाशिकच्या मातीत लाल रंगाचे आरा द्राक्ष वाण कसे रुजले? शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 10:58 PM

नाशिकच्या मातीत आरा नावाच्या नव्या द्राक्ष वाणांची लागवड यशस्वी करण्यात कांबळे बंधूंना यश आले आहे.

एकीकडे निसर्गाचा लहरीपणा दुसरीकडे रात्रंदिवस मेहनत करूनही निर्यातीत येत असलेला अडथळा यावर मात करीत पहिल्यांदाच नाशिकच्या मातीत आरा नावाच्या नव्या द्राक्ष वाणांची लागवड यशस्वी करण्यात कांबळे बंधूंना यश आले आहे. तब्बल सतरा वर्षांनंतर प्रथमच आरा रेड सिलेक्शन 5 आणि आरा रेड सिलेक्शन 6 अशा दोन द्राक्ष वाणांच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्र्यंबकेश्वर तालक्यातील कोणे गावातील कांबळे बंधूंच्या नव्या वाणांचा द्राक्षांच्या लागवडीचा निर्णय उत्पन्नाचा राजमार्ग ठरला आहे. 

नाशिक जिल्हा द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखला जातो. मात्र इथली द्राक्षशेती ही नेहमीच वेगवेगळ्या आव्हानांतून जात राहिली आहे. द्राक्ष उत्पादकांचा मागील अनेक वर्षांचा प्रवास हा सततच्या नैसर्गिक आपत्तींचा आणि विविध संकटांनी भरलेला राहिला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिद्दी द्राक्ष उत्पादक सतत प्रयत्नशील राहिले आहेत. त्यातुनच नाशिकमधील सह्याद्री फार्म्सने जगप्रसिद्ध ग्राफा या ब्रिडींग कंपनीशी सहकार्य करार करुन पेटंट असलेल्या आरा रेड सिलेक्शन 5 आणि आरा रेड सिलेक्शन 6 वाणांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा केला. आणि आता या वाणांची यशस्वी लागवड इथल्या मातीत झाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालक्यातील कोणे येथील भास्कर कांबळे आणि दिनकर कांबळे यांनी बंधूंची 26 एकर शेती असून गेल्या सतरा वर्षांपासून ते द्राक्ष शेती करत आले आहेत. या 26 एकर क्षेत्रातील 24 एकरमध्ये ते थॉमसन आणि उर्वरित दोन एकर क्षेत्रात फ्लेम जातीची द्राक्ष लागवड करत होते. या वाणातही अनुभव चांगला असल्याचे सांगितले. मात्र नंतर घडाला तडे जाण्याचे वाढत गेले. त्यानंतर सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीशी ते जोडले गेले. याच दरम्यान सहयाद्री फार्मच्या माध्यमातून 2022 मध्ये त्यांनी 2 एकरमध्ये आराच्या दोन्ही वाणांची लागवड केली. सप्टेंबर 2023 मध्ये छाटणी केली. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये पहिली हार्वेस्टिंग करण्यात आली. दरम्यानच्या काळात योग्य नियोजन करत बाग फुलवली. यासाठी त्यांना एकरी एक ते दीड लाखापर्यंत खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. शेताच्या बांधावर व्यापाऱ्यांकडून चांगला रुपये किलो प्रमाण दर मिळाल्यानं त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. कांबळे बंधूंना यामुळं लाखो रुपयांचं उत्पादन मिळणार असून दोन एकर क्षेत्रावरील शेतात त्यांना सात ते आठ टन उत्पन्नाची अपेक्षा आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकरी दिनकर कांबळे म्हणाले की, गेल्या सतरा वर्षापासून द्राक्ष शेती करत आहे. मात्र आरा रंगीत वाणांच्या लागवडीमुळे सकारात्मक विश्वास निर्माण झाला आहे. योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर चांगलं उत्पादन घेता आले आहे. आम्हाला अपेक्षित दरापेक्षा चांगला मिळाला असून यानंतर उर्वरित जमिनीत देखील या दोन वाणांची लागवड करण्याचा मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखवलं.

असा पार पडला लिलाव...

दरम्यान या दोन्ही वाणांचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव पार पडला असून  आरा रंगीत २ वाणांपैकी एकाला प्रति किलोला २२० तर दुसऱ्या वाणाला २६० रुपयांचा दर मिळाला. यावेळी झालेल्या ऑनलाईन लिलावात आरा रेड सिलेक्शन- ५ द्राक्षांच्या ४ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या पेटीला १२५० रुपये म्हणजे प्रति किलोला २६० रुपये दर मिळाला. तर त्यांच्या आरा रेड सिलेक्शन-६ या दुसऱ्या वाणाच्या द्राक्षांच्या पेटीला १०६० रुपये म्हणजेच प्रति किलोला २२० रुपये दर मिळाला. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकद्राक्षेशेती