विजेंद्र मेश्राम
ग्रामीण भागातील शेतकरीमहिला बचत गटाच्या मदतीने आत्मनिर्भर होत असल्याचे चित्र आहे. त्यालाच आता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेची (पीएमएफएमई) जोड मिळाल्याने महिलांना रोजगार मिळण्यास मदत होत आहे. तर यातून महिला स्वावलंबी होत आहे. आम्ही झालो स्वावलंबी तुम्हीही व्हा, असा सल्ला सुद्धा ते आता इतर महिलांना देऊ लागल्या आहेत.
कोणाला रोजगार उपलब्ध करून देणे अलीकडे अवघड झाले आहे. परंतु, काही महिला बचत गट व शासनाच्या योजनांच्या मदतीने आत्मनिर्भर होऊ दुधापासून विविध पदार्थांची केली निर्मिती लागल्या आहेत.
असे एक उदाहरण गोंदियातील आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथील बचत गटाच्या महिलांनी दिले आहे. आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथील आभा महिला बचत गटाने सन २००४ मध्ये बचत गट तयार केला. बचत गट सुरळीतपणे चालवून शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेंतर्गत २ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाच्या रकमेतून खोवा मशीन, मिल्क बायलर, पनीर तयार करण्याची मशीन, क्रिम वेगळी करणारी मशीन खरेदी केली.
ऑक्टोबर २०२२ मध्ये उद्योग सुरू केला. याला आता दीड वर्ष पूर्ण झाले. या उद्योगातून बचत गटाच्या पाच महिलांना निरंतर रोजगार तर मिळाला. शिवाय इतर महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली. विशेष म्हणजे या बचत गटाने स्वयं उद्योग सुरू केलाच, तसेच बोरकन्हार येथील
३२ महिला बचत गटांना गायी पालन करण्यास सांगितले. बचत गटाच्या जवळपास १०० महिला गायींचे पालन करीत आहे. शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत ३५ टक्के अनुदानावर मिळालेल्या कर्जामुळे त्यांनी या उद्योगाला सुरुवात करण्यास मदत झाली.
दुधापासून विविध पदार्थांची केली निर्मिती
दुधाच्या विक्रीपासून ते खवा, पनीर, तूप आदी पदार्थ तयार करून विक्री करण्यापर्यंतचे काम आभा महिला बचत गटाच्या मदतीने करीत आहे. यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव व कृषी प्रदर्शनीत दुधापासून तयार केलेल्या पदार्थाची विक्री केली.
गावातील महिलांना करताहेत मार्गदर्शन
बोरकन्हार येथील आभा महिला बचत गटाच्या महिला गावातील महिलांना बचत गटाच्या मदतीने रोजगार निर्मिती कशी करता येईल. आत्मनिर्भर होण्यासाठी कुठल्या गोष्टी करायच्या यावर मार्गदर्शन करीत आहे. त्यामुळे गावातील दीडशेवर महिला स्वतःचा व्यवसाय उभारुन आत्मनिर्भर झाल्या आहे. यातून इतर महिलांना सुध्दा प्रेरणा मिळत आहे.
आभा महिला बचत गटाच्या माध्यमातून हरिओम डेअरी उद्योग सुरु केला. यातून महिलांना रोजगार उपलब्ध करून आत्मनिर्भर करण्यास मदत झाली.
- ममता पवन ब्राम्हणकर, अध्यक्ष आभा महिला बचत गट बोरकन्हार
शासनाच्या पीएमएफएमई योजनेंतर्गत आभा महिला बचत गटाने कर्ज घेऊन हा उद्योग उभारला. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ, नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र आमगावचे मार्गदर्शन मिळाले.
- पुस्तकला खैरे, बचत गट मार्गदर्शक आमगाव
कोणास मिळेल लाभ
या योजने अंतर्गत 18 वर्षावरील वैयक्तिक मालकी / भागीदारी, शेतकरी उत्पादक गट संस्था/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतशील शेतकरी यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाखपर्यंत क्रेडीट लिंक सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ देय आहे.
सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन / शासकीय संस्था भाग धेवु शकतात. सदर घटकासाठी ३.०० कोटी कमाल मर्यादेसह पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के क्रेडीट लिंक कॅपिटल सबसिडी देय आहे.
इन्क्युबेशन सेंटर साठी शासकीय संस्था- १००%, खाजगी संस्था- ५० % तर आदिवासी क्षेत्रातील खाजगी संस्था, उत्तर पूर्व राज्ये व मागास जाती जमाती प्रवर्गासाठी ६०% अनुदान देय आहे. तर ब्रँडिंग व पॅकेजिंगसाठी एकूण खर्चाच्या ५०% रक्कम अनुदान देय असून यासाठीची कमाल निधी मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल.
बचत गटातील सदस्यांना बीज भांडवल अंतर्गत खेळते भांडवल किंवा गुंतवणीकरीता रक्कम रु.४००००/- प्रति सदस्य (प्रति बचत गटास रु.४.०० लाख) देय आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | आधार कार्ड पॅन कार्ड आठवी पास शैक्षणिक अहर्ता जागेचा करार इलेक्ट्रिक बिल ना हरकत प्रमाणपत्र कोटेशन सहा महिन्याच्या बँक स्टेटमेंट उद्योग आधार प्रकल्प अहवाल FSSAI प्रमाणपत्र बँक पासबुक |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | प्रकल्प अहवाल जागेची पाहणी वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे जिल्हा संशोधन व्यक्ती तसेच बँकेद्वारे प्रकल्पाशी निगडित बाबींची पूर्ण तपासणी करण्यात येते त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय समितीच्या वतीने जिल्हा नोडल अधिकारी सर्व तपासणी करतात |
ऑनलाईन संपर्क | www.pmfme.mofpi.gov.in
|
निर्णय घेणारे अधिकारी – | तालुका कृषि अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | कालावधी निश्चित केलेला नाही |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/
|