Join us

उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 8:21 AM

उच्च शिक्षणाचा उपयोग नोकरी पेक्षा स्वतःच्या शेतात केला तर शेतीचा शाश्वत विकास होतोच. त्याचबरोबर सामाजिक सेवाही पार पाडण्याचा आनंद मिळतो. या दृष्टीने पेठ वडगांव (ता. हातकणंगले) येथील मच्छिंद्र शिवराम कुंभार यांचे उच्च शिक्षित कुटुंब शेतात रमले आहे.

आयुब मुल्लाशेतीत करणे परवडत नाही. शेतीतील श्रम वाया जातात. आर्थिक तोटा होतो असा नकारात्मक सुर काढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शेती पेक्षा नोकरी बरी म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करीत नोकरीला प्राधान्य देत युवक शहराकडे जाताना दिसत आहेत.

अशा पार्श्वभूमीवर शेती करणे ही गरज निर्माण झाली आहे. ती नियोजन समोर ठेवून आधुनिक पद्धतीने केली. त्यामध्ये स्वतः राबल्यास हमखास नफा मिळतो आणि ती परवडते. उच्च शिक्षणाचा उपयोग नोकरी पेक्षा स्वतःच्या शेतात केला तर शेतीचा शाश्वत विकास होतोच.

त्याचबरोबर सामाजिक सेवाही पार पाडण्याचा आनंद मिळतो. या दृष्टीने पेठ वडगांव (ता. हातकणंगले) येथील मच्छिंद्र शिवराम कुंभार यांचे उच्च शिक्षित कुटुंब शेतात रमले आहे. श्रमातून शेती फुलवीत आर्थिक प्रगती साधली आहे.

मच्छिंद्र कुंभार यांना शालेय वयापासूनच शेतीची आवड लागली. बी. कॉम चे महाविद्यालयीन शिक्षण पुर केल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये झोकून देवून काम करण्यास सुरवात केली. भावाला सोबत घेत घरची शेती परंपरागत पद्धतीने करण्यापेक्षा आधुनिक शेती करण्याचा निर्धार केला. घरची तीन एकर शेती विविध पिकांनी फुलू लागली.

कमी खर्चात कमी मनुष्यबळात सर्वोत्तम शेतीची आयडिया त्यांना कृतिशील कामातून मिळाली. नव नवे प्रयोग करीत शेती फायदेशीर ठरू लागल्याने सर्व कुटुंबातील लोक एकत्रितपणे शेतीला व्यवसाय मानून काम करू लागले ते आजही तितक्याच ताकतीने नेटाने करीत आहेत. यामध्ये घरातील महिलांनी घेतलेला पुढाकार शेती प्रगती साठी कारणीभूत ठरला आहे.

विशेष म्हणजे मच्छिंद्र कुंभार यांना त्यांच्या शेतीतील उत्कृष्ठ कार्याची दखल घेवून नामवंत चौदा पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार मिळाला आहे. तर त्यांची पत्नी अनिता व त्यांच्या भावाची बायको सुशिला कुंभार यांनी सोयाबीन पीक स्पर्धेतील राज्य पातळीवरील द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

मच्छिंद्र कुंभार यांनी आता पर्यंत शेती प्रगतीवर ५०० व्याख्याने दिली आहेत. कृषी कॉलेज मध्ये तसेच राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या कार्यशाळेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले जाते. कृषी महाविद्यालयामध्ये गेस्ट लेक्चर साठी जातात. प्रत्यक्ष शेतीत काम करीत असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी होतो. त्यामुळे शेतीतील मार्गदर्शक अशी त्यांची कृषी क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे.

या कुटुंबाने तीन एकर असणारी शेती १५ एकर केली आहे. यामध्ये शेतीचा मोठा वाटा आहे. मच्छिंद्र कुंभार यांच्या मालकीची सात एकर शेती आहे. त्यांनी ही शेती नावीन्य पूर्ण प्रयोगशील बनविली आहे. त्यांच्या मुलांनी, दोन मुलींनीही शेतीच्या अनुषंगाने बीएसस्सी (कृषी) चे शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यांना नोकरीची संधी आली होती परंतु ती त्यांनी धुडकावून लावली. मुलांबरोबरच वडील मच्छिंद्र यांनीही बीएसस्सी हॉर्टीकल्चर व अॅग्रीकल्चर ची डिग्री घेतली आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. मुक्त विद्यापीठाची ही डिग्री त्यांच्याबरोबरच त्यांचा मुलगा, मुलगी यांना यांनाही एकाच  वेळी मिळाली.

मुळातच आधुनिक शेतीला तंत्रज्ञानाची सखोल अभ्यासाची जोड देत शेती करण्यासाठी कुटुंबातील या सदस्यांनी उच्च शिक्षण घेतले.त्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या अनुभवाची, मार्गदर्शनाची शक्यतो गरज भासत नाही. स्वतच्या अनुभवावर,अभ्यासावरच शेती केली जाते.

आंतरपीक घेत शेती करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आंतरपिकातून मुख्य पिकाच्या उत्पन्नाचा खर्च काढून त्यामध्येही नफा मिळविला जातो. त्यांचे उसाचे क्षेत्र जास्त आहे. या ऊस शेतीत १६ प्रकारची अंतर पिके घेतात. कांदा, लसूण, हिरवी मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, कोबी, मेथी, कोथंबिर, गवारी, पालक, पोकळा, वरणा, मका, तीळ, भुईमूग या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे.

साडेचार फुटी सरीवर ऊस लावून त्यामध्ये चारसरी नंतर उसाला पुरक असणारे वरील अंतर पिके लावली जातात.उसाच्या सुदृढ वाढ व्हावी व ही पिकेही चांगली निघावित अशी मशागत केली जाते तसेच खतांची मात्रा दिली जाते.या पिकांच्या उत्पन्नातून उसाच्या मशागतीसह खतांचा खर्च निश्चितपणे ते काढतात.

गांडूळ खत व मिश्रखतांचा वापर जास्त करतात. पाण्याची संपूर्ण व्यवस्था ठिबक सिंचन द्वारे केली आहे. दोन टन प्रमाणे उसाचे उत्पादन काढतात.फळ बाग तसेच फुलशेती करतात. झेंडू चे पीक चांगले घेतले जाते. विशेष म्हणजे सहा गुंठ्यांत त्यांनी हापूस आंबा, चिकू, पेरू, फणस, अननस, केळी यांची फळबाग लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने याचे उत्पादन चवदार स्वादिष्ट काढले जाते.

घरच्यांसाठी फळे मिळतातच त्याच बरोबरच याची बाजारात विक्री केली जाते. अनेकजण शेतावर येवून खरेदी करतात. उत्तम प्रतीची फळे मिळतात त्यामुळे याचे पैसेही अधिकचे होतात. उसाची रोपवाटिका ही सुरू केली आहे. व्हिएसआय, कोइमतूर ची रोपे तयार केली जातात. निरोगी रोपे देण्यात त्यांची प्रसिध्दी झाली आहे.

एकूणच शेतीवर प्रचंड निष्ठा प्रेम ठेवून हे कुटुंब शेतात परिश्रम करीत आर्थिक उन्नतीकडे झेपावले आहे. तरुण मुले, मुली यांनी शेतीकडे वळून कृषी परंपरेला आधुनिकतेची जोड देत ती जोपासली पाहिजे. शेतीला कमी लेखून चालणार नाही. शेती हाच अर्थव्यवस्थेचा आधार आहे. ती विकसित करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा असे आवाहन कुंभार कुटुंबीयांनी केले आहे.

अधिक वाचा: सोनं घडवणाऱ्या जयकर यांची कमाल; पारंपारिक पिकांना फाटा देत फुलवल्या देशी-विदेशी फळांचा बागा

टॅग्स :शेतकरीशेतीऊसफलोत्पादनभाज्यापीकनोकरीशिक्षणकोल्हापूर