Join us

अजिंठ्याच्या पायथ्याचा एक धडपडा तरुण, ज्याने देशातील लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 10:57 PM

ठिबकसारख्या उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील शेतीत क्रांती घडवून लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य समृद्ध करणारे द्रष्टा व्यक्तिमत्व अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी घडले, फुलले. त्यांचे नाव पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन. शेतकरी त्यांना आदराने मोठे भाऊ संबोधतात. २५ फेब्रुवारी हा त्यांचा पुण्य स्मरण दिवस. त्यानिमित्ताने…

सन १९६३ साली, अगदी सुरवातीपासूनच श्रद्वेय श्री भवरलालजी जैन यांनी शेती हाच आपला व्यवसाय मानला. १९६३ ते १९७८ या दरम्यानचे काळात त्यांनी खते, बी-बियाणे, जंतुनाशके, ट्रॅक्टर्स आणि सिंचनासाठी लागणा-या पंपांसाठी लागणारं हलकं डिझेल तेल अशा प्रकारच्या शेतीत योगदान देणा-या जिनसांच्या वितरणाचे काम केले, १९७८ साली एका शेती उत्पादनात्चे सहाय्यानेच त्यांनी आपल्या औद्योगिक कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. शेतांमध्ये पपांची लागवड करण्यास त्यांनी शेतक-यांना प्रोत्साहित केले व त्यांपासून मिळणा-या 'पपई-दुधास' त्यांनी हमी भावाची खात्रीही दिली. 

पपेनचे दिवस अशा वापरानं, खरवडलेल्या विद्रूप पपयाही त्यांनी कैंडी- टूटी-फूटी बनविण्यासाठी खरेदी करण्यास सुरवात केली. त्यांनी पपई दुधाची खरेदी सुरू केल्यानं शेतक-यांना एक अधिक उत्पन्नाचा मार्ग तर मोकळा झालाच वर त्यांचा नफाही वधारला. खरोखरच, त्यांनी महाराष्ट्रात आणि गुजरात, मध्यप्रदेश अशा लगतच्या राज्यांमधील सुमारे २५०० च्या वर शेतक-यांना करार तत्वावर पपईची शेती करण्यास प्रवृत्त केले. पपईच्या दुधापासून प्रक्रीयेनं पपेन नांवाचं एन्झाइम तयार केलं गेलं आणि १९७८ पासून ते २००२ पर्यंत त्याची सातत्याने १०० टक्के निर्यात केली गेली. अशुध्द पपेनला प्रति किलो सुमारे रु.२०/- असा भाव मिळत होता. सरतेशेवटी, अतिशुध्द स्वरूपाचे पपेन रु.३००० प्रति किलो या भावाने निर्यात केले गेले. अशा प्रकारे 'पपेन' हेच त्यांचे पहिले-वहिले शेती आधारित १०० टक्के निर्यातीभीमुख असे औद्योगिक साहस ठरले. 

 शेतीसाठी पीव्हीसी पाईप आगमनाचा काळ १९८० साली मुख्यत्वे करून शेतीमधील सिंचनासाठी त्यांनी पीव्हीसीचे पाईप्स बनविण्यास सुरवात केली. त्यांनी यात पदार्पण करण्याआधी मोठ्या शहरांत त्यांच्या उत्पादनांचे बस्तान बसविलेले तीन उत्पादक आधीच हजर होते. तथापी, या उत्पादकांचा चेहरा मोहरा शेतीशी जुळणारा असा नव्हता. शहरात बस्तान बसविलेल्या उत्पादकांपेक्षाही अगदी आगळी वेगळी अशी आपली स्वतःची विपणन शैली श्री. भवरलालर्जीनी अवलंबिली. महाराष्ट्राच्या अगदी तळागाळापर्यंत आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये जिल्हास्तरावर त्यांनी वितरक नेमले. शेती-सिंचनासाठी पीव्हीसी पाईप लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी एक विस्तृत असा विस्तार कार्यक्रम हाती घेतला. यामुळे ग्रामीण विपणनाचे विषयात एक प्रकारची क्रांतीच घडून आली म्हणा ना!

 पीव्हीसी पाईपांच्या वापरानं, गळतीमुळे वाया जाणा-या पाण्याची तसंच बाष्पीभवनानं उडून जाणा-या पाण्याची बचत झाली. तसंच शेतक-यांना त्यांच्या पिकांसाठी द्याव्या लागणा-या पाण्याच्या मात्रा व गुणवत्तेवरही एकप्रकारे नियंत्रण ठेवण्याची क्षमता प्राप्त झाली.

पीव्हीसी पाईप्स इतके लोकप्रिय झाले की १९८० साली जेमतेम ५०० मे.टन इतके सालीना उत्पन्न असणारे हे पाईप्स २००८ साली चक्क साली १,२०,००० मे.टन इतके चिकू लागले. श्री. भवरलालजींनी पहिल्या दिवसापासुनच कमितकमी नफा व जास्तीत जास्त उलाढाल हे तत्व उरी बाळगले होते. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ होऊनही जवळ जवळ पांच वर्ष या कालावधित त्यांनी पीव्हीसी पाईपांच्या किंमती एकाच पातळीवर राखून त्यांमध्ये एकप्रकारे स्थैर्य आणले. अशा प्रकारे त्यांचे पीव्हीसी पाईपांच्या बाजारातील पदार्पण हे एक प्रकारे ऐतिहासिक असेच झाले. म्हणून अगदी कमी कालावधितच संपूर्ण देशभरात मिळून अशा प्रकारची सुमारे १५० आस्थापने अस्तित्वात आली. श्री. भवरलालजींच्या दैदिप्यमान यशानं लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळावं हे ही नैसर्गिकच म्हणावं लागेल. पीव्हीसी पाईपांच्या सर्वदूर वापरामुळे पाणी वाहून नेताना होणा-या नुकसानीत झालेल्या बचतीनं तसंच शेतीत निघणा-या पिकात वाढ झाल्यानं साहजिकच शेतक-याचे सुबत्तेत निश्चितच वाढ झाली. 

आणि देशात घडली ठिबकची क्रांती शेतीशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीचाच एक नैसर्गिक अविष्कार म्हणजे त्यांनी घेतलेला पाणी वाचविण्याचा तसेच शेतीतील उत्पादन क्षमता वाढविण्याचा शोध व त्यासाठी असलेल्या सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केलेला पाठपुरावा. अगदी सन १९८२-८३ इतक्या फार आधीपासूनच भारत सरकारने ठिबक व तुषार सिंचनास उत्तेजन देण्याचे हेतूने एक अनुदान योजना प्रायोजित केलेली होती. सन १९८६ च्या अखेरी अखेरीस महाराष्ट्र शासनाने देखील अशाच प्रकारची एक योजना राबविली होती.

तथापि, अशा प्रकारच्या अनुदान योजना अस्तित्वात असून देखील सन १९७७-७९ सालापर्यंत महाराष्ट्रात केवळ ४०० हेक्टर्स तर संपूर्ण भारतात जेमतेम ६०० हेक्टर्स एवढचाच जमिनीवर ठिबक संच लागले होते. त्यातही आयात केलेले माल सामान वाटप झाले होते आणि कोणत्याही प्रकारच्या सेवा पुरवल्या जात नव्हत्या. या पध्दतीमुळे त्याच्या प्रसारावर अर्थातच मर्यादा पडत होत्या. ह्या चित्रात १९८८ साली जैन इरिगेशनने पदार्पण करताक्षणीच जमीन-अस्मानाचा फरक पडला.अगदी सुरवातीपासूनच श्री. भवरलालजींनी एकसंघ असा दृष्टीकोन ठेवला. केवळ नळ्या आणि गाळण यंत्रणांचे उत्पादन गुणवत्तापूर्णरित्या करणे आणि त्यांची विक्री करणे एवढबावरच भागणार नव्हते तर त्याचबरोबर शेतक-यांना विक्रीपूर्व तसेच विक्रीपश्चात सेवाही पुरविण्याचा त्यांनी विडा उचलला. अशा सेवांमध्ये शेतांना शेतीतज्ज्ञांच्या तसेच अभियंत्यांच्या ठराविक काळानंतर होणा-या हमखास निरीक्षण भेटी, प्रशिक्षित हुषार चालकांची तरतूद, जमविलेल्या माहितीच्या आधारे, यशोगाथांद्वारे, पत्रकांमधून, चर्चासत्रांद्वारे, प्रदर्शनांच्या माध्यमांतून, फलकांचेद्वारे आणि प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण देण्याचा अंतर्भाव होता. शेतातील माती, पाणी आणि शेती-हवामानाच्या परस्पर संबंधांचा तौलनिक अभ्यास करून मगच बसविल्या जाणा-या सिंचन संचाची सखोल माहितीची संगणकीय योजना तयार करण्यासाठी लागणा-या सेवांसह मूलभूत सेवा म्हणजे शेतीचा सव्हें नकाशा, माती पाणी परीक्षण याही सेवा दिल्या जात होत्या.

याचेच जोडीला शेतक-यांमध्ये, नोकरशाहीमध्ये, समाज सेवकांमध्ये तसेच मत बांधणी करणा-यांमध्यें एक प्रकारची जागरूकता निर्माण व्हावी म्हणून एक जबरदस्त कार्यक्रम हाती घेण्यात आला. कर्तव्यभावनेनं झपाटूनच शेतक-यांचे मेळावे, प्रशिक्षण वर्ग, भेटीगाठींची मोहीमच चालवली गेली. त्यापाठोपाठ अशा प्रकारांसाठी एक कायम कार्यकर्ती संस्थाच उभारली गेली. सिंचनाचे वेळापत्रक आणि विविध पिका बरहुकूम पाणी गरजा यांचे तक्तेच एक कायमस्वरूपी संदर्भ म्हणून देण्यात आले. ही सर्व यंत्रणा शेतक-याचे दारी नेऊन पोहचविण्यात आली. सुरवाती सुरवातीला, कंपनीच्या प्रशिक्षित माणसांनीच नळ्या पसरवणे, जोडणे, तपासणे - चांचण्या घेणे, बसविणे आणि चालू करणे ही कामे केली. चालविण्याचे शिक्षण देणारी पुस्तिकाही दिली गेली. अगदी संकल्पने पासून ते थेट चालू करण्यापर्यंत एक बेतून घडवलेली यंत्रणा अशी जाग्यावर सुरू करण्यापर्यंत राबवली. अशाप्रकारे, एक पूर्णपणे शास्त्रशुद्ध आणि या भारत देशात ठिबक यंत्रणा राबविण्यात बिनीचे काम त्यांनी प्रस्थापित केले. 

शेतकऱ्यांचे ज्ञानाचे हक्काचे ठिकाण आत्तापर्यंत जवळजवळ भारतातील प्रत्येक राज्यातून आलेल्या हजारो शेतकरी समूहांनी इथे प्रत्यक्ष भेट दिलीय आणि लाखांवर शेतक-यांनी संपर्क साधलाय तरी किंवा अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग तरी घेतलाय. संशोधन व विकास शेतीला १६५०० विद्याथ्यांनी भेटी दिल्यात तर बीडीओ, एडीओ, ग्राम सेवक अशा शासकीय अधिका-यांची संख्या भेट देणा-यांमध्ये, प्रशिक्षित केलेल्यांमध्ये आहे. महाराष्ट्राच्या लगत असणा-या अनेक राज्यांच्या शेती मंत्र्यांनीही इथल्या आस्थापनांना भेटी दिल्या आहेत. परदेशी मंत्री देखील जैन हायटेक अॅग्री इन्स्टीट्युटला भेट देऊन गेले त्यात आफ्रिका, अफगाणिस्तान, श्रीलंका, मॉरीशस यांचा समावेश आहे. या राज्यातील शेतकरी देखील प्रशिक्षणास येऊन गेले. इथे येऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचे इच्छेन आलेल्या नामवंतांमध्ये उपराष्ट्रपती श्री. भैरोसिन शेखावत, माजी पंतप्रधान श्री. चंद्रशेखर, उपपंतप्रधान श्री. देवीलाल, तसेच भूतपूर्व पंतप्रधान आणि विद्यमान केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री आणि अन्य मंत्रीगण विविध राज्यांच्या राज्यपाल यांचा समावेश होतो.

एवढे भीमकाय प्रयत्न केल्यामुळंच १९८८ साली जेमतेम ६०० हेक्टर्स असलेलं ठिबक सिंचना खालचं क्षेत्र २००८ साली ९ लाख हेक्टर्सवर पोचलंय. आजमितीस या उद्योगाची वाढ दरवर्षी सुमारे १ ते १.२ लाख हेक्टर्स या प्रमाणात होते आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यामध्ये जळगावात केळीसाठी, नाशिकमध्यें द्रांक्षांसाठी, सोलापूर जिल्ह्यात डाळिंबांसाठी सिंचन व्यवस्था जवळजवळ केवळ ठिबक मार्फतच होते आहे. याचे जोडीला विदर्भातले शेतकरी फलोद्यानासाठी तर मराठवाड्यातील कपाशीसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उसासाठी गुजरातेत व मध्यप्रदेशात मिरची व बटाट्यांसह देशातील ४५ पिकांवर प्रामुख्यानं याच ठिबक प्रणालीवर विसंबून राहतात.

याच मार्ग शोधक धडपडींनी श्री. भवरलाल जैन यांच्या आयुष्याचा आणि कर्तृत्वाचा बराचसा भाग व्यापलेला दिसतो. जिथं अशाप्रकारचे कोणतेच उद्योग मुळातच अस्तित्वात नव्हते त्या ठिकाणी त्यांना एका नव्या शेती उद्योगांची उभारणी करण्यात यश लाभले. क्रांती तर झालीच झाली. जगाच्या ठिबक नकाशावर भारताला क्र. २ चे स्थान मिळवून देण्यात सिंहाचा वाटा, निश्चितपणे शेतकऱ्यांचे मोठे भाऊ अर्थात श्री. भवरलालजींनाच द्यावा लागेल व त्यांच्या कंपनीलाही. जैन इरिगेशन म्हणजेच ठिबक सिंचन असं गणित पक्कं झालंय. म्हणूनच, ही आणि या सारख्या इतर यशांची पावती फक्त भारत सरकारनं आणि महाराष्ट्र राज्य शासनानंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय समुदायानंही राजरोसपणे दिली आहे.

जैव तंत्रज्ञानातही मोठे काम शेतीमधील जैव तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा आणि एकप्रकारे प्रगतीमधील मैलाचा दगड मानावा लागेल तो केळी मधील उती संवर्धनाला. अत्यंत उच्च प्रतीची गुणवत्ता हमीपूर्वक देण्यासाठी एक केळी उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी श्री. भवरलाल जैन यांनी असाधारण मेहनत घेतलीय. देशभरातील हजारो शेतक-यांनी यामुळे त्यांचे प्रत्येक घडाचे उत्पन्न सरासरी ११ किलोपासून थेट २३ किलोंवर नेलंय आणि पीक हाती येण्याचा कालावधी १८ महिन्यांवरून ११ महिन्यांवर आणलाय. उत्तर-पूर्वे कडील राज्ये वगळता हा संदेश सर्व राज्यांत वेगाने पोचतोय, आपापल्या गरजेच्या रोपांची आगाऊ नोंदणी करून राखीव करणं आणि आपली पाळी येण्याची वाट पाहणं हे आता शेतक-यांच्या अंगवळणी पडलंय.

ग्रँडनैन या नांवाची उती संवर्धित केळी रोपांची नवी जात व्यापारी तत्वावर वितरित करण्याचा पहिला मान श्री. भवरलालजी जैन यांचेकडे जातो. युरोपांमधील तसेंच अमेरिकेमधील बाजारपेठांमध्ये "ग्रेडनैन' जातीची ताजी पिकली केळी निर्यात करण्याचं त्यांचं स्वप्नंही साकार झालयं, स्वतःच्या गरजेपोटी आयात करणारी राष्ट्र भारतातून अन्य जातींबी फारशी केळी घेत नाहींत, अशा रितीने ताज्या पक्व केळ्यांची निर्यात साधून देशाच्या संपत्तीत मोलाची भर तर पडते आहेच शिवाय शेतक-यांच्या उत्पन्नात थेट भर पडली आहे आणि श्री. भवरलालजी जैन यांना आणखी एका पायाभूतबिनीचे काम केल्यात्चे श्रेय मिळाले. आतां सर्व लक्ष नवनव्या जाती आणण्यावरच केंद्रित आहे. श्री. भवरलालजींना आतां कांद्यामध्ये उती संवर्धन यशस्वी करण्यात यश आलंय. कांही औषधी वनस्पती आणि जैव इंधनदायी वनस्पतींवर आणि त्यांच्या सूक्ष्म गुणित पुनरुत्पादन पद्धतींविषयी संशोधन चालू आहेच.

शेती संस्कृतीला अत्यंत अनमोल ठरणारी आणखी एक संस्था श्री. भवरलाल जैन यांनी स्थापन केली आहे. जैन उच्च-तंत्र शेती संस्थान शेतमालावर संशोधन विकास व प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि विस्तार केंद्र. पडिक जमिनीचा विकास, नापिक जमीन लागवडीखाली आणणे, मृदसंधारण, डोंगराळ व खडकाळ जमिनीवर लागवड करणे, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, जलसंधारणाचे व्यवस्थापन, खतपाणी, हरितगृहे व त्याच बरोबर सेंद्रीय आणि जैव खते तसेच जैव-किटकनाशके हे सर्व एका छत्राखाली असलेलं पाहण्यासाठी दरवर्षी किमान २०,००० शेतकरी व इतर इच्छुक या शेतीला प्रत्यक्ष भेट देतात व या सर्व कामांत आणि शेतीतील उच्च तंत्र व त्यामधील अत्याधुनिक विकास पाहण्यास साक्षी राहतात, शेत मालामध्ये मुल्यवर्धन साधण्यासाठी आणि उत्पादन साखळीचा विस्तार साधण्यासाठी श्री. भवरलाल जैन यांनी भाज्यांचे निर्जलीकरण आणि फळ प्रक्रीया कारखानेहि सुमारे १५० कोटी रूपयांवर भलीमोठी गुंतवणूक करून उभे केले आहेत. एखादं पीक जर एखाद्या राज्यात भरपूर उपलब्ध होत असेल तर परप्रांतातूनही, ताज्या भाज्या आणि फळ मागवली जातात.या सर्व यशोगाथेची पाळंमुळं सामान्यतः शेतकरी वर्गाची प्रगती साधण्यासाठी असलेल्या सूत्रबद्ध अशा वैयक्तिक तसेंच संस्थापक बांधिलकीमध्येच असतात, जरी शेती आधारित गरीब अशा भारतीय समाजाशी व शेतक-यांशी व्यवसाय करणे हीच मुळी एक धोकेबाज संकल्पना मानली जाते तरीही श्री. भवरलालजींचे सर्वच व्यवसाय शेती व शेतक-यांशीच संबंधित आहेत याचं कारण त्यांना नफ्यापेक्षाही ध्येयवादाशी असलेलं घट्ट नातं अधिक भावतं. या सर्व शेती आधारित उद्योगांमध्ये आजतागायत सुमारे हजारो कोटींवर भांडवली गुंतवणूक झालेली आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळात कशाही प्रकारे विचार केला तरी हा आकडा निश्चितच कौतुकास्पद आहेच. पण त्याहीपेक्षा त्या माध्यमातून देशातील लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात नव तंत्रज्ञानाने जी काही समृद्धी आली, व त्या समृद्धीच्या संपत्तीचा हिशेब कसा ठेवावा?

टॅग्स :जैन पाइपठिबक सिंचनशेतकरीशेती क्षेत्र