‘‘माझ्या शेतात शेततळ्याची गरज होती. पण त्यासाठी माणसे आणि पैसा आणायचा कोठून? मग मला एक कल्पना सुचली, जवळच रस्त्याचं काम सुरू होतं. त्यासाठी माती आणि मुरूमाची गरज लागणार होती. मी त्या कंत्राटदाराला भेटलो आणि म्हणालो की माझ्या शेतातून तुम्ही माती घेऊ शकतात. त्यांनाही आवश्यकता होतीच, ते आले, मी आखणी करून दिली होती. त्या ठिकाणी त्यांनी माणसं लावली आणि खोदकाम केले. माती व मुरूमाचा त्यांना फायदा झाला, तर मला मात्र मोफत शेततळं खोदून मिळालं.... हे एवढ्यावरच थांबलं नाही, ही गोष्ट आमच्या भागातल्या मंत्र्यांना समजली, तेव्हा तेही शेततळे पाहायला आले. आता इथंच हे थांबत नाही, खरी गोष्ट पुढंच आहे. लवकरच मला शेतातल्या मातीचा चेकही सरकारकडून मिळाला. म्हणजे माझा दुहेरी फायदा झाला. मोफत शेततळं खोदलं, वर पैसेही मिळालेत.... ’’शहादा तालुक्यातील लोणखेड्याचे गणेशभाई पाटील आपले अनुभव सांगतात तेव्हा आपण त्यांच्या कौशल्यानं अवाक् होतो.
मुळात खांन्देशच्या मातीततली माणसं म्हणजे बोलण्यात अतिशय गोड, त्यांना आपुलकीही खूप असते आणि त्यांच्या डोक्यात अनेक सुपिक कल्पनाही खूप येतात. मालेगाव, धुळे, नंदुरबार या परिसरात जर आपण फिरलो, तर असे तल्लख बुद्धीचे कितीतरी लोक आपल्याला अवाक् करतात. हीच बुद्धिमत्ता व ज्ञान ते जेव्हा शेतीत वापरतात तेव्हा गणेशभाईंसारखा कृषी अवलिया तयार होतो.
गणेशभाई सध्या वयाच्या सत्तरीत आहेत. वडिलोपार्जित शेतीतली ३२ एकर शेती त्यांच्या वाट्याला आलेली आहे. साधारणत: २००० सालापासून मी सेंद्रीय शेती करतो आणि जरा वेगळा विचार करून शेती करतो, असे गणेशभाई कौतुकानं सांगतात. कमी खर्चात, केलेल्या श्रमांचा पुरेपूर मोबदला कसा मिळेल याचा बारकाईने विचार करून शेतीचे ते व्यवस्थापन करत असतात. ‘आपण काही नोकरील नाहीत, पण आपल्याला रोज पैसे मिळाले पाहिजेत असं नियोजन करायचं मी ठरवलं आणि आज परिस्थिती अशी आहे की मला माझ्या शेतातून रोज पैसे मिळतात. कधी हजार, कधी दोन हजार तर कधी तीन हजारही. मात्र मी त्यासाठी मेहनत घेतो. माझा शेतमाल स्वत:च ग्राहकांना विकतो. त्यासाठी खास माणसं नेमली आहेत. व्यापाऱ्याला किंवा दलालाला मी माल देत नाही. गणेशभाई आपल्या समृद्धीचं रहस्य सांगतात.
रोजच्या कमाईची अशी आहे मेख
गणेशभाईंचा मुख्य भर हा फळबागांवर आहे. याशिवाय सुबाभूळ, बांधावरचा बांबू अशीही शेती ते करतात. मुख्य म्हणजे शेतातल्या प्रत्येक घटकातून आपल्या कष्टाची कमाई कशी मिळेल यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्या शेतात मोसंबी, चिकू, पेरू, आवळा, जांभूळ, आंबा अशा फळबागेची लागवड आहे. प्रत्येक फळाच्या हंगामानुसार त्याच्या विक्रीचेही नियोजन त्यांनी करून ठेवलेले आहे. सध्या त्यांच्या शेतात मोसंबीचा आंबेबहार सुरू आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत तो चालेल. बागेतली मोसंबी दररोज क्रेटमध्ये भरून ते आपल्या शेतावर कामाला असलेल्या माणसांकडून जवळच असलेल्या शहादा शहरात विक्रीला पाठवतात. तिथे त्यांनी स्टॉलच लावलेला आहे. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या या मोसंबीचा गोडवा वेगळा असल्याने त्याची हातोहात विक्री होते.
ऑक्टोबर नंतर पुढे जानेवारीपर्यंत पेरूचा बहार चालतो. हे पेरू मात्र बाजूच्या खेडोपाडी विक्रीचे नियोजन गणेशभाई करतात. त्यासाठी अर्थात त्यांची माणसं असतातच मदतीला. जानेवारी नंतर चिकू आणि नंतर आंब्याचा बहार सुरू होतो. त्याचीही अशाच प्रकारे दररोज स्वत:च्या बळावर ते विक्री करतात आणि ताजा पैसा मिळवतात. या जोडीला आवळे, जांभळं अशी फळं असतातच. या सर्वातून त्यांना खर्च जाऊ योग्य मोबदला मिळतो.
वनशेतीतूनही पैसा
मी फार त्रासदायक पिकांच्या मागे लागत नाही. कापूस आणि सोयाबीन अशी खरीपातली पिकं घेतो, पण त्यांचं क्षेत्र मर्यादित असतं. तीन-चार एकर कापूस आणि दोन एकरवर सोयाबीन बस्स. ऊरलेलं सर्व शेत फळबागा आणि वनशेतीसाठी राखून ठेवलेलं असतं, असं गणेशभाई सांगतात ते्व्हा त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याला दाद द्यावीशी वाटते. त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर बांबूची लागवड केलेली आहे. तर मागच्या ९ ते १० वर्षांपासून ते सुबाभूळची शेती करतात. सुबाभळीची झाडं ही वाढण्यासाठी तीन वर्षे लागतात. तेवढ्या कालावधीत पहिली दोन वर्ष त्यात कापसाचं आंतरपिक घेतात येतं. ही वाढलेली झाडं शहाद्यापासून सुमारे अडीचशे किलोमीटरवर असलेल्या पेपर कारखान्याला विक्री केली जाते. त्यातून सुमारे ४० हजारांचं उत्पन्न मिळतं. शिवाय विक्रीनंतर २५ दिवसांत पैशांची हमी असते ती वेगळीच. याशिवाय बांबूचीही विक्री करतो, त्यातील उत्पन्न वेगळंच, असतं, गणेशभाई आपल्या प्रयोगशील शेतीबद्दल भरभरून बोलत राहतात. शेतकऱ्यासाठी शेती व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन फार आवश्यक असल्याचं ते मानतात आणि तसा सल्लाही देतात. सुबाभळीच्या बाबतीत मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, योग्य नियोजन करून लागवड करावी असा सावधतेचा इशाराही ते जाताजाता शेतकरी बांधवांना देतात.
सेंद्रीय शेतीचे प्रयोग
गणेशभाईंची पूर्वी एकत्रित शेती होती. त्यानंतर वाटण्या झाल्या आणि त्यांच्या वाटेला ३२ एकर क्षेत्र आलं, तेव्हापासून म्हणजे २००० सालापासून ते सेंद्रीय पद्धतीनं शेती करतात. त्यासाठी गांडूळ खताचा आधार घेतात. मातीत गांडुळंही आहेत आमच्या असं अभिमानानं सांगतात. त्यांनी सेंद्रीय शेतीत आतापर्यंत विविध प्रयोग केले आहेत. शेतातून जी खराब फळं निघतात, त्यांचा एकत्र रस काढून तो परत झाडालाच मी टाकतो. त्याचाही फायदा होतो. मी दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करत असतो. शेणखतासाठी मी गाई बाळगल्या आहेत, मात्र त्या गावातल्या एका बेरोजगार व्यक्तीकडे सांभाळायला दिल्या आहेत. त्याच्याकडून मी त्या गाईंची शेण आणि गोमूत्र विकत घेतो. त्याला गायी सांभाळण्याचे पैसे देतोच, शिवाय त्याला शेणखताचेही पैसे देतो. मला त्यातून वर्षाला १२ टॅक्टर शेणखत मिळतं. त्याचा शेतात अर्थातच फायदा होतो. एखादी गाय व्याली, तर घरच्या दुधासाठी मी ठेऊन घेतो. बाकी इतर दुधाळ गायी त्या व्यक्तीलाच देतो. त्यातूनही त्याला उत्पन्न मिळते. या सर्व व्यवस्थापनातून मला खत मिळतं आणि जनावरं सांभाळ्यासाठी वेगळ्या मनुष्यबळाची आवश्यकता राहत नाही. शिवाय जो व्यक्ती बेरोजगार होता, त्यालाही रोजगार मिळतो. सेंद्रीय खतांच्या व जनावरे सांभाळण्याच्या या प्रयोगाबद्दल व व्यवस्थापनाच्या फंड्याबद्दल ते आपल्याला भरभरून सांगत राहतात. व आपल्यालही त्यांच्या नवीन कल्पनेचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.
गणेशभाईंकडे एक ट्रॅक्टर, शेततळे, अशी व्यवस्था आहे. चार गडी त्यांनी नोकरीला ठेवलेत. शेतात ट्रॅक्टर चालविण्यापासून तर फळांच्या विक्रीपर्यंतची कामे तेच करतात. गणेशभाईही त्यांच्या जेवणाची, चहा-नाश्त्याची आपुलकीने काळजी घेतात. त्यांना सांभाळतात. आपल्या शेतातून रोज ताजा पैसा कमावून दुसऱ्यालाही रोजगार मिळवून देण्याइतपत औदार्य दाखविण्याचे काम अस्सल शेतकरीच करू शकतो. कोणतंही कर्ज न घेता किंवा अनुदानाची अपेक्षा न करता कल्पकतेनं शेती करता येते हे गणेशभाई दाखवून देतात. त्यांच्या या प्रयोगातून खऱ्या अर्थानं समृद्धी नांदते. उगाच नाही शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. गणेशभाईं गोविंद पाटील यांच्यासारख्या अनुभवी, कल्पक व प्रयोगशील शेतकऱ्याकडून आपल्याला हे प्रत्ययाला येते, हे नक्की.
संपर्क : गणेशभाई गोविंद पाटील, मु.पो. लोणखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार