प्रशांत शिंदे
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील गणेश ढवण यांनी नुकतीच राज्यसभा सचिवालयाची 'संशोधन इंटर्नशिप' पूर्ण केली. त्यांचा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संशोधन इंटर्नशिप म्हणजे काय, ती कुणाला मिळू शकते, आदी संदर्भात ढवण यांच्याशी हा टॉपिक टॉक..
१) राज्यसभा सचिवालयाची संशोधन इंटर्नशिप म्हणजे काय?
ही २१ दिवसांची इंटर्नशिप असते. या कालावधीत संसदीय कामकाज समजावून सांगितले जाते. संसद सुरू असताना सभागृहात प्रश्न-उत्तरांचा तास कसा असतो, दोन्ही सभागृहांचे काम कसे चालते, बिल ऑफिस कसे असते, खासगी विधेयक कसे येते, खासदार विधेयक कसे मांडतात, सभागृहाचे नियम काय आहेत, खासदारांना फंड कसा दिला जातो, राज्यसभेचे पोर्टल कसे काम करते, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी गोष्टी असतात.
२) तुम्ही इंटर्नशिप कशी मिळवली?
राज्यसभा सचिवालयाची इंटर्नशिप मिळवण्यासाठी राज्यसभा खासदारांची शिफारस लागते. मी राज्यसभा खासदार फौजिया खान यांच्याकडे स्टेप फेलोशिप अंतर्गत काम करत होतो. ऑफिसमधील सहापैकी खान यांनी माझे नाव सुचवले. यानंतर राज्यसभेकडे सीव्ही (शिक्षण आणि अनुभव यांचा सारांश) पाठवावा लागतो. अर्जाची छाननी होऊन मुलाखत घेतली जाते. त्यांना योग्य वाटले तर निवड होते.
३) इंटर्नशिपसाठी महाराष्ट्रातून किती जण होते?
महाराष्ट्रातून मी एकटाच होतो. दहा राज्यातून ३५ मुले इंटर्नशिपसाठी आले होते. महाराष्ट्रातील एका खासदाराने मध्य प्रदेश, तर दुसऱ्या खासदाराने हरयाणातील मुलाची शिफारस केली होती. इंटर्नशिपमध्ये बहुतांशी राजकीय नेते आणि अधिकारी यांची मुले होते. ३५ मुलांमध्ये मी एकटाच शेतकरी कुटुंबातील होतो. काही मुले शेवटच्या दिवशी आले तर काहींना न येताच प्रमाणपत्र मिळाले. प्रतिष्ठित इंटर्नशिप असल्याने अधिकारी, नेत्यांच्या मुलांचा अधिक भरणा होता.
३) वर्षातून किती वेळा इंटर्नशिप दिली जाते?
वर्षातून दोनदा इंटर्नशिप दिली जाते. राज्यसभेचे सहसचित याचे प्रमुख असतात. राज्यसभेचे उपसभापती यांच्या मंजुरीने इंटर्नशिपचा कार्यक्रम निश्चित केला जातो. राज्यसभेच्या संकेतस्थळावर नॉलेज सेंटर असा पर्याय आहे. यामध्ये विविध फेलोशिप, इंटर्नशिपची माहिती असते.
४) इंटर्नशिपसाठी पात्रता काय आहे?
ही इंटर्नशिप मिळवण्यासाठी केवळ राज्यसभा खासदारांची शिफारस लागते. मी बारावीनंतर छत्रपती संभाजीनगर येथे मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझममध्ये पदवी घेतली. दिल्लीतील एका माध्यमात काम करत होतो. प्रिंट मीडियात इंटर्नशिप केली होती. आवड म्हणून एका सामाजिक संस्थेत काम करत आहे.
५) इंटर्नशिपनंतर करिअरच्या कोणत्या संथी उपलब्ध होतात?
इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर विविध संधी उपलब्ध होतात. यामध्ये देश-विदेशातील फेलोशिप मिळू शकतात. संसदेतील कामकाजाची माहिती असल्याने राष्ट्रीय पातळीवरील माध्यमात कामाची संधी मिळू शकते. खासदार, आमदार किंवा मंत्र्यांचा स्वीय सहायक म्हणून काम करता येते.
६) उपराष्ट्रपतींसोबतचा फोटो पाहून आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती?
आई-वडील दोघेही शेती करतात. उपराष्ट्रपती यांच्याहस्ते सत्कार झाल्याचा घरी फोटो पाठवला तेव्हा आई-वडिलांना सत्कार करणारा व्यक्ती कोण आहे, हे माहिती नव्हते. बहिणीने फोन करून सांगितल्यानंतर त्यांना फार आनंद झाला.
अधिक वाचा: भारतातील पहिला शेतकरी मालकीचा साखर कारखाना कुठे सुरु झाला? अन् कशी झाली साखर क्रांती? वाचा सविस्तर