भाटघर पाणलोट क्षेत्रात भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात हमखास नगदी पीक असलेल्या कलिंगडाच्या शेतीचा अभिनव प्रयोग कृषी पदविकेचे शिक्षण घेत असताना यशस्वी करून दाखविला.
सुरुवातीला नांगरट करून रोटावेटर मारून चार फुटांची सरी पाडली. नंतर ड्रीप जोडून मल्चिंग पेपर अंथरूण ४ फूट बाय १ फूट अंतरावर मेलॉडी या वाणाच्या रोपांची लावण केली. त्याला दर दोन दिवसाला पाणी दिले. लावण केल्यानंतर ६० व्या दिवशी कलिंगड तोडणीस सुरुवात केली.
रासायनिक शेती न करता सेंद्रिय शेती करतो. यामध्ये मला सायबेज आशा या संस्थेचे मोलाचे सहकार्य भेटते. पहिल्या तोड्याला १२ टन, आता प्रतिकिलो १४ ते १६ रुपये भाव भेटत आहे. पहिल्या तोड्याल १२ टन, दुसऱ्या तोड्याला ४ ते ५ टन फळे निघतील.
सेंद्रिय पद्धतीने पिकविल्यामुळे चवीला अधिक गोड व अधिक काळ टिकत असल्याने फळाला जास्त मागणी आहे. शेतावर येऊन ग्राहक खरेदी करतात.
असे केले खत व्यवस्थापन- २५ टक्के कुजलेल्या शेणापासून गांडूळ खत स्वतः घरी तयार करून एकरी १ टनाचा वापर केला.- जीवामृत स्लरी, १० किलो गाईचे शेण, १० लिटर गोमूत्र, २ किलो बेसन पीठ, २ किलो काळा गूळ आणि १ मूठ जीवनी असलेली वडाच्या झाडाखालची माती, १८० लिटर पाणी याचे एकत्र मिश्रण करून आठ दिवस हे मिश्रण रापत ठेवून त्याचा वापर एकरी २०० लिटर प्रमाणे दर ४ दिवसाला त्याचा ठिबकच्या माध्यमातून केला.- लागवडीनंतर पंधरा दिवसांनी जिवामृत, गायीच्या शेणापासून तयार झालेले जिवाणू संवर्धन, आदी सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला.
उत्पादन खर्चकलिंगडाच्या रोपांसाठी ९ हजार, सेंद्रिय खतांसाठी ४ हजार, ठिबक सिंचनासाठी व मल्चिंग पेपर १५ हजार, मशागत ३ हजार. घरी बनवलेले निमअर्क व दशपर्णी अर्क याचा वापर केल्यामुळे फवारणीचा खर्च वाचला आहे. मजुरीसाठी दोन हजार खर्च करण्यात आला आहे.
दशपर्णी अर्काने कीड नियंत्रण- दशपर्णी अर्काची ४ दिवसांनी (५० लिटर गोमूत्र, कडुलिंब, रुई, समदीर सोक, गिरिपुष्प, करंज निर्गुडी, टनटनी, सीताफळ, लाल कन्हेर, पपई, एरंडाची पाने किलो, गुळवेल प्रती २ किलो, तंबाखू पावशेर, हळद पावशेर, आलं, हिरवी मिरची, लसूण यांचे वाटण करून टाकले. दोन महिने मुरत ठेवून नंतर हे मिश्रण गाळून घेतले) फवारणी केल्याने कीड नियंत्रणात आली.- घरीच लिंबाचा पाला व शेण गोमूत्र यापासून निम अर्क आणि दशपर्णी अर्क हे घरीच तयार करून त्याची ४ दिवसाला फवारणी केली.- त्याचप्रमाणे मध्ये मध्ये झेंडूची रोपे लावून कीड नियंत्रण केले.
कुटुंबाची साथसौरभला वडील दत्तात्रय नारायण खुटवड, आई द्रोपदा व मोठा भाऊ अजय, आदींची सेंद्रिय शेती कसण्यास मोलाची मदत होते. गावातच हातविक्रीने कलिंगडाची विक्री करतात. लोकांनाही रास्त भावात कलिंगड मिळण्यास मदत झाली आहे.
सेंद्रिय शेती करत असताना खूप शेतकऱ्यांनी भेट दिली. अगदी महाराष्ट्र बाहेरील लोकांनी येऊन भेट दिली. सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे आहे आणि रासायनिक खताचा दुष्परिणाम तर आहेच, पण त्यासाठी होणारा खर्च जास्त आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी येत्या काळात सेंद्रिय शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेतीला लागणारी खते घरीच तयार करता येतात. त्यामुळे त्याला जास्त खर्च नाही आणि ते शरीराला हानिकारक नाही. मी नोकरी न करता माझ्या घरची १२ एकर शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करत आहे. जर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जर सेंद्रिय शेती केली तर नोकरी करण्याची गरज नाही. रासायनिक खतांच्या दुष्परिणामामुळे अनेक रोगांना मानवी आरोग्य बळी पडत आहे. येणाऱ्या पिढीला असाध्य रोगांपासून दूर राहायचे असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. - सौरभ खुटवड, प्रयोगशील शेतकरी
अधिक वाचा: पाटलांनी केला विक्रम; खडकाळ जमिनीत एकरामध्ये काढले १२० टन ऊस उत्पादन