सातारा : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतप्रमींची संख्या कमी नाही. तसंच सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव उर्फ बापू यांचं बैलगाडा शर्यतीमध्ये नावाजलेलं नाव. त्यांना लहानपणापासूनच शर्यतीची आवड होती त्यामुळे त्यांनी घरीच खिल्लार जातीची बैल पाळली आणि त्याच बैलांच्या जिवावर शर्यती जिंकल्या. या बक्षिसांनी त्यांचं घर भरून गेलं आहे. त्यांच्या घरातील बक्षिस आणि चित्रांवरून त्यांची बैलगाडा शर्यतीबद्दलची आवड लक्षात येईल.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील बराच भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर सांगली आणि सोलापुरातीलही बराच भाग दुष्काळी असल्यामुळे या परिसरात ज्वारी, हरभरा, सोयाबीन आणि काही प्रमाणात द्राक्षे, डाळिंब, केळी सारखी फळपीके घेतली जातात.
ज्वारी हे येथील मुख्य पीक असून बराच भाग माळरानाचा असतो त्यामुळे जनावरे पाळण्याकडे या परिसरातील शेतकऱ्यांचा कल असतो. खिल्लार हा गोवंश सातार, सोलापूर, सांगली आणि कर्नाटकातील याच परिसरातील आहे. तर मोकळ्या माळरानात चरत असलेल्या या जातीचा चपळ आणि तापट हा मूळ स्वभाव आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब खिल्लार गोवंशावर चालतात.
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव तालुक्यातील राहुल जाधव हेसुद्धा पहिल्यांदा शेती करता करता दुग्धव्यवसाय करत होते. पण त्यानंतर त्यांनी खिल्लारचे संगोपन सुरू केले आणि त्यांची विक्री सुरू केली. यातून त्यांना चांगला पैसा मिळू लागला. पुढे त्यांनी खिल्लार बैल शर्यत आणि प्रदर्शनासाठी मैदानात उतरवले आणि मैदाने जिंकली. त्यामध्ये त्यांना अनेक बक्षिसे मिळाली असून परिसरात त्यांच्या नावाचा लौकिक झाला आहे. तर बक्षिसांनी त्यांच्या खराच्या भिंती भरल्या आहेत. त्यांना मिळालेल्या बक्षिसामध्ये चांदीच्या गदा, प्रशस्तीपत्रे, मानचिन्हे, ट्रॉफी, रोख बक्षिसे अशा बक्षिसांचा सामावेश आहे.
राहुल जाधव यांना प्रदर्शनात मिळालेले बक्षिसे
- निढळ
- पांगरखेल
- भवानवाडी
- गोंदवले
- गंगोती
- वाठार
- मुंबई (बनजोड)
- कर्जत जामखेड
- ललगुण
- चिलेवाडी
- किन्हई
- अंबवडे
- अंभेरी
- कासेगाव (कराड)
- खटाव
- भुरकवडी
- दहिवडी
- झरे
- हुबालवाडी वाटेगाव
- पेडगाव
- सुर्याची वाडी
- वडगाव हवेली
- भवानीनगर (विटा)
- पुसेगाव - हिंदकेसरी
खिल्लारमुळे मला परिसरात ओळख मिळाली आहे. त्याचबरोबर खिल्लारवरच आमचे सगळे अर्थकारण अवलंबून आहे. हेच आमच्यासाठी उत्पन्नाचे साधन आहे. बैलगाडा शर्यत सुरू झाली नसती तर येथील अर्थव्यवस्था कोलमडली असती. शर्यतीवरील बंदी उठवून खिल्लारला एक प्रकारचे पुनर्जीवन मिळाले आहे.- राहुल जाधव (बापू) प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि शेतकरी