Join us

पहिल्याच वर्षी साडेतीन एकरात लावली केळी, निर्यात थेट इराणला, एकरी ६ लाखांचा नफा

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 11, 2023 8:30 PM

एखाद्या प्रदेशाच्या सु पीकतेची , समृद्धीची मानकं काय?  गावातील घरांच्या उतरत्या छपरांच्या रचनेवरून तर कधी केळीच्या बागांवरून किंवा पदार्थांमधील ...

एखाद्या प्रदेशाच्या सुपीकतेची, समृद्धीची मानकं काय?  गावातील घरांच्या उतरत्या छपरांच्या रचनेवरून तर कधी केळीच्या बागांवरून किंवा पदार्थांमधील नारळाच्या वापरावरूनही हे ठरवता येऊ शकते. पण कपाशी उगवणाऱ्या कोरडवाहू भागातही समृद्धी असू शकते हे दाखवलंय औरंगाबादमधल्या एका शेतकऱ्याने. पैठण तालुक्यातल्या बद्रीनाथ बोंबळे या शेतकऱ्याने यंदा साडेतीन एकरात केळीची लागवड केली.   

केळीची पाच हजार झाड लावल्यानंतर या शेतकऱ्याने एक हजार केळींची थेट इराण देशाला निर्यात केली.  आणखी दीड महिन्यामध्ये उरलेली सगळी केळी निर्यात करण्याचा बद्रीनाथ बोंबळे यांचा विचार आहे. 

"जागीच केळी विकत घेऊन गेले. यंदा केळी लागवडीचं पहिलंच वर्ष आहे. 18 लाखाचा नफा मिळाला मला केळी उत्पादनातून. पुढच्या वर्षीची केळीसुद्धा अशीच जाणार बघा..", बद्रीनाथ सांगत होते.

बदलत्या हवामानाला अनुसरून पिके घेत या शेतकऱ्याने 850 ते 900 केळीच्या झाडांची  थेट आखाती देशात निर्यात केली. स्थानिक बाजारपेठेत मिळणाऱ्या भावापेक्षा निर्यात होणाऱ्या या केळीला अधिक भाव मिळत आहे. 

एक केळीचे झाड साधारण 28 किलोंचे. एक किलो केळीच्या झाडाला भाव १८ रु किलो. म्हणजे एका झाडाची विक्री साधारण पाचशे रुपयांच्या घरातली. अशी १००० झाडे इराण देशी बद्रीनाथ बोंबळे यांनी पाठवली.

केळीच्या निर्यातीमुळे वर्षाला ६ लाखांचा एकरी नफा झाल्याचे ते सांगतात. "मागील वर्षी एक ते 15 ऑगस्ट दरम्यान केळीची लागवड केली होती. आता बरोबर एक वर्षाने केळी उतरवत आहोत. केळीची एक बॅच इराण देशाला निर्यात केली आहे. पुढचा सगळा माल एक- दीड महिन्यात काढण्यालायक होईल."

साधारण केळीमध्ये आणि निर्यात करण्यासाठीच्या केळीमध्ये काय फरक आहे?

आपण खातो ती साधारण केळी आणि निर्यात केली जाणारी केळी यात मोठा फरक आहे. निर्यात करताना केळीच्या गुणवत्तेची पूर्ण काळजी घ्यावी लागते. केळीवर कुठलाही काळा डाग नसेल याची विशेष काळजी घ्यावी लागते. निर्यात होणारी केळी साधारण नऊ इंचाची असावी. नऊ इंच काही आम्ही मोजून पाहिले नाहीत. डोळ्यांनीच त्याची पारख करता येते. बद्रीनाथ म्हणाले.

आपण बाजारातून घेऊन जी केळी खातो ती केळी साधारण सात ते आठ इंचाचे असते. त्यावर कधी काळे डाग असतात तर अधिक रासायनिक फवारण्या केल्यामुळे कधी ती कच्ची असते.

निर्यात होणाऱ्या केळीची काय काळजी घ्यावी लागते?

लागवडीपासून काढणीपर्यंत साधारण वर्षभर केळीला नीट सांभाळावे लागते. लागवडीच्या आधी जमिनीत शेणखत टाकावी लागतात. तसेच वेगवेगळी कीटकनाशके, द्रवरूप बुरशीनाशके वापरून रोग पडण्याच्या आधीच त्याचे निराकरण करणे ,अशी काळजी घ्यावी लागते. 

यंदा आम्ही इराण देशाला केळी पाठवली आहे. पैठणला आमच्या शेतावरून केळीची खरेदी कंपनीने केली. साधारण 22 दिवसांनी ही केळी त्यांच्या देशात विकायला काढली जाईल. त्यामुळे साधारण महिनाभर आधी आपल्याला ती इथून पाठवणं गरजेचं असतं.

इथून केळी आधी नाशिक किंवा टेंभुर्णीमधील शीतगृहांमध्ये ठेवली जाईल. त्यानंतर निर्यात करण्याआधी त्याची पॅकेजिंग केली जाईल. परंतु, त्या देशात ती चांगल्या पद्धतीने पोहोचावी यासाठी २२ टिन आणि तुरटीच्या पाण्यात केळी स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर शीतगृहात त्याची साठवण होते. त्यानंतरच ती पॅकेजिंग करून मुंबईच्या बंदरातून पुढे पाठविली जाते.

केळी लागवडीपासून निर्यातीपर्यंतचा खर्च किती?

यंदा केळीच्या G-9  वाणाची लागवड केली आहे. एकूण सात लाखांचा खर्च आला. त्यातला स्वखर्च साधारण चार लाखांचा. पोकरा अंतर्गत एकूण खर्चाच्या ८० टक्के अनुदान मिळतं. त्यातले थोडे अनुदानाचे थोडे स्वतःचे. 

"वर्षभराची मेहनत आहे पण एकरी सहा लाखांचा नफा केवळ साडेतीन एकराच्या केळी लागवडीतून होत आहे. यंदा केळी लागवडीचे माझे पहिलेच वर्ष. पण पुढच्या वर्षीची सुद्धा केळी साधारण दहा हजार झाडांच्या घरात जाईल. " बद्रीनाथ म्हणाले.

'नव्या ऍग्रो' या संस्थेकडून रोहित शिरवत, अझार पठाण यांनी माझ्या शेतातील केळी पाहिली. त्यांना परदेशात माल पाठवायचा होता. त्यांनी देणार का? म्हणून विचारले. बाजारभावापेक्षा किंमत अधिक मिळत असल्याने आम्ही त्यांना केळी विकली. शेती परवडत नाही म्हणून रडत न बसता मराठवाड्यासारख्या कमी पाणी असणाऱ्या क्षेत्रात केळीच्या निर्यातीमुळे शेतकरी समृद्ध होत आहे. 

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्रपीकपीक व्यवस्थापनशेती