निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे पारंपरिक पिकांसोबत अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करणे देखील गरजेचे आहे. आता शेतकरी कमी वेळेत जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे वळला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथील प्रगतिशील शेतकरी अजय अंबादास रसाळ यांनी टरबूज शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
जालना जिल्ह्यात बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. सिंचनाचे क्षेत्र मर्यादित आहे. शेतमजुरांची कमतरता आणि मजुरीचे चढे दर यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. अशा वेळी पारंपरिक पिंकामध्ये अडकून न राहता शेतकऱ्यांनी नवनवीन आणि जादा उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करणे गरजेचे आहे.
कमी पाण्यात व अंतर्गत पिकांचा असाच पर्यायी शोध प्रगतिशील शेतकरी अजय रसाळ यांनी घेतला आहे. त्यांनी पपईच्या शेतात अंतर्गत पीक म्हणून टरबूज लागवडीचा निर्णय त्यांनी घेतला. सव्वादोन एकर शेतीमध्ये टरबूज लागवड केली. बाजारातील स्थिती आणि मागणी बघता यातून त्यांना चांगला नफा मिळाला आहे.
सहा लाखांचा नफा
अजय रसाळ यांनी सव्वादोन एकर शेतीमध्ये अंतरपीक म्हणून टरबुजांची लागवड केली आहे. या लागवडीतून ८० मेट्रिक टन टरबुजाचे उत्पादन मिळाले आहे. यामध्ये ६० मेट्रिक टनाला १२.५० किलोप्रमाणे भाव मिळाला. त्यांना ७ लाख ५० रुपये हजार एवढे उत्पन्न मिळाले. २० टनाला ७ रुपये किलोप्रमाणे १ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यातून २ लाख रुपयाचा खर्च सोडता ६ लाख ९० हजार रुपयांचा निव्वळ नफा अजय रसाळ यांना झाला आहे.
स्थानिकसह इतर राज्यांतून मागणी
• रसाळ यांना दोनच महिन्यात टरबूज शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी पिकविलेल्या टरबुजांना कलकत्ता, पुण्यासह देशातील इतर राज्यांतून मोठी मागणी आली आहे. त्यांच्याकडे दोन ते आठ किलो वजनाची टरबूज उपलब्ध झाले आहेत. मोठ्या आकाराच्या टरबुजाला बाजारात मोठी मागणी निर्माण झालेली आहे.
• टरबूज लागवडीसाठी वापरलेली आधुनिक पद्धत, खते, तणनाशक, कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले व्यवस्थापन यामुळे टरबुजाचे विक्रमी उत्पादन घेण्यात यश आल्याचे अजय रसाळ यांनी सांगितले.