नसीम शेख
अनेक युवक नोकरीच्या मागे धावून नोकरी न मिळाल्यास पदरी निराशा पाडून घेत आहे. मात्र, पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शेतीतच आपली नोकरी शोधणारे युवक निराळेच. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथील २३ वर्षीय युवा शेतकरी भारत पंढरीनाथ जाधव यांची शेतीतील यशोगाथा अनेक युवकांना प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून भारत जाधव हे दरवर्षी लाखोंचे उत्पादन घेत आहे. यंदा त्यांनी आपल्या शेतातील दीड एकर क्षेत्रात अद्रकीचे पीक लावले होते.
या पिकावर भरपूर कष्ट आणि मेहनत घेतल्याने त्यांना या दीड एकर क्षेत्रात जवळपास ३५० क्विंटल अद्रकीचे उत्पन्न झाले. ज्यातून त्यांना ३० लाख रुपये मिळाले. त्यांनी एका वर्षात शेतीतून मिळवलेले हे उत्पन्न एका नोकरदारापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.
जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तोट्याची वाटणारी शेती ही फायद्याची करता येते. हे भारत जाधव यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे सध्या त्यांचा हा शेती प्रयोग तालुक्यातील अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरू पाहत आहे.
जिद्दीने शेती केल्यास नोकरीची गरज नाही
आपल्याकडे शेती हा एक जुगार समजला जात असला तरी शेतीमध्ये सातत्य ठेवले तर निश्चितच शेती चांगले उत्पन्न देऊन जाते. यापूर्वी अद्रकीच्या पिकात एक वेळ अपयश आल्यानंतर ही मी जिद्दीने हे पीक घेत राहिलो. याकामी वडील पंढरीनाथ जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून जर जिद्दीने शेती केली तर त्यांना नोकरीच्या मागे पळण्याची अजिबात गरज भासणार नाही. - भारत जाधव, युवा शेतकरी
हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट