Join us

नोकरीऐवजी तरुणाने अवलंबला शेतीचा मार्ग; भाजीपाला पिकातून करतोय बारमाही कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:47 IST

बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता समीर बळीराम बालगुडे या तरुणाने शेतीची आवड जोपासत बारमाही शेतीचा मार्ग अवलंबला आहे.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता समीर बळीराम बालगुडे या तरुणाने शेतीची आवड जोपासत बारमाही शेतीचा मार्ग अवलंबला आहे.

निव्वळ शेतीच नाही तर शेतमालाची विक्रीही स्वतःच करीत आहे. ग्राहकांना आवडणाऱ्या भाज्या, फळभाज्यांची लागवड समीर करीत आहे.

मंडणगड तालुक्यातील घराडी येथील समीर बळीराम बालगुडे हा तरुण बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शेतीकडे वळला. शेती व त्यास पूरक दुग्धोत्पादन व्यवसाय करीत आहे.

खरीप हंगामात भात, नागली, वरी, भाजीपाला, फळभाज्यांचे उत्पादन घेतो, तर उन्हाळी पावटा, वांगी, टोमॅटो, मिरची, सर्व प्रकारच्या पालेभाज्या, कलिंगड उत्पादन घेत आहे.

शेतीला जोड दुग्धोत्पादन व्यवसाय सुरू केला आहे. पाच गायीचे संगोपन करून दिवसाला वीस लिटर दुधाची विक्री करीत आहेत.

विशेष म्हणजे समीर यांची स्वतःची जमीन कमी असताना, भाड्याने जमीन घेऊन भाजीपाला लागवड करीत असून, शेती व्यवसायात प्रगती करत आहेत.

सर्व प्रकारच्या भाज्यांची लागवड व विक्री- समीर मंडणगड व कुंबळे येथील आठवडा बाजारात भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावतात.- त्यामुळे भाजी खरेदीसाठी स्टॉलवर येणाऱ्या ग्राहकांना एकाच ठिकाणी जास्तीत जास्त भाज्या खरेदी करता येतील त्याचा विचार करून भाज्यांची लागवड करीत आहेत.- त्यामुळे खरेदी करणारा ग्राहकही समाधानी व विक्री सुलभ होत असल्याने समीरलाही त्याचा फायदा होत आहे.- उन्हाळ्यात काकडी, कलिंगड, पालेभाज्यांसाठी वाढती मागणी असल्याने लागवड करीत आहेत.- पावसाळी चिबूड, दोडकी, भेंडी, पडवळ, दुधी भोपळा, भोपळा, काकडी चांगली संपते, त्यामुळे ग्राहकांची आवड लक्षात घेऊन लागवड करीत आहेत.- बारमाही शेतीसाठी स्वतः समीर राबत असून, शेतमाल तसेच दूध विक्रीही स्वतःच करीत असल्याने त्याचा त्यांना फायदा होत आहे.

आई-वडील शेती करत असल्याने आवड निर्माण झाली. त्यामुळे बारावीनंतर शेतीकडेच वळलो. ओला चारा जनावरांसाठी पोषक असल्याने जोड दुग्धोत्पादन व्यवसाय सुरू केला. दूध विक्रीतून चार पैसे मिळतात, शेणखत शेतीसाठी उपयुक्त ठरत आहे. - समीर बालगुडे, घराडी (मंडणगड)

अधिक वाचा: गाईच्या मल-मूत्रातून पिकवली हळद; नऊ महिन्यांत केली साडेचार लाख रुपयांची कमाई

टॅग्स :शेतकरीशेतीभाज्यारत्नागिरीपीक व्यवस्थापनलागवड, मशागतपेरणी