Join us

नोकरीच्या मागे न लागता गावातच उभारला व्यवसाय, लाकडी बैलगाड्या बनवत कमावतोय..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:44 AM

शेतीकामासाठी कमी; देखाव्यास लाकडी बैलगाडीला राज्यात मागणी

शिक्षण पूर्ण झाले की, शहराच्या ठिकाणी नोकरीच्या शोधात भटकंती करणारे अनेक तरुण आजही आपण पाहतो. तर दुसरीकडे पदवीचे शिक्षण घेऊनदेखील बेरोजगार तरुण मोलमजुरी करताना दिसतात; परंतु नोकरीच्या मागे न लागता आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाला पसंती देत उच्चशिक्षित तरुणाने गावातच व्यवसाय उभारून लाकडी बैलगाडी बनवत त्याची राज्यभर ओळख निर्माण केली आहे.

खिळद येथील बी.एस्सी. शिक्षण झालेल्या युवराज गोरे याने नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित लाकडी वस्तू बनवण्याची कला जोपासली आहे. याच कलेच्या माध्यमातून त्याने गावातच दुकान उभारून लाकडी बैलगाडी, उसाचा चरक बनवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केलेआहे. साधारण बैलगाडीची किंमत ४८ हजार, तर डिझाइन असलेली बैलगाडी ६० हजार रुपयांना विकली जाते. एक बैलगाडी बनवण्यासाठी वीस दिवसांचा कालावधी लागतो. यातून आर्थिक घडी बसवण्याचे काम होते. राज्यभर या बैलगाडीला मोठी मागणी बाराही महिने असते. यामुळे थोड्याफार प्रमाणात आर्थिक उत्पन्नही गोरे यांना मिळू लागले आहे.

देखाव्यासाठी मोठी मागणी

पूर्वीच्या काळी शेतीकामासाठी मोठी मागणी होती; पण अलीकडच्या काळात आता हॉटेलच्या समोर देखाव्यासाठी डिझाइनच्या व साध्या बैलगाडीला मोठी मागणी वाढली आहे. ग्रामीण भागासह शहरात मोठी मागणी आहे.

व्यवसायातून संधी

■ नोकरीच्या मागे न लागता लहान असो वा मोठा आपला व्यवसाय तरुणांनी करायला हवा.

■ यातून विविध संधी निर्माण होऊन गावातच रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक घडी बसवण्याचे काम होत असल्याचे तरुण व्यावसायिक युवराज गोरे याने 'लोकमत'ला सांगितले.

हैदराबाद, झारखंड, गुजरातला गेला लाकडी चरक

वडील सोपान गोरे, भाऊ आणि दहा कामगार यांच्या मदतीने दरवर्षी उसाचे चरक बनवले जातात. हेच चरक हैदराबाद, २ झारखंड, गुजरातसह परराज्यांत जात असल्याने लाकडी चरक्याला देखील मोठी मागणी लक्षात येते. मागणी लक्षात घेता युवराज गोरे या व्यवसायात नेहमी व्यस्त दिसून येतात.

टॅग्स :शेती क्षेत्रव्यवसाय