यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान केंद्राने एकात्मिक शेती पद्धतीतून आदिवासी भागात विविध सुधारित तंत्रज्ञान राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावे स्वयंपूर्ण व्हावीत, शाश्वत शेतीद्वारे विकास, महिलांचे सबलीकरण, संपूर्ण कुटुंबासाठी काम व त्यातून आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावणे हा त्यामागील उद्देश.
एकात्मिक शेती पद्धती शेतकऱ्यांकडे सद्यस्थितीत असलेली पिके व जोडधंदे, त्यांची उत्पादकता, शेतकऱ्यांचा कार्यक्रम आखणी प्रक्रियेत सहभाग, त्यांचे स्थानिक परिस्थितीचे ज्ञान यांचा वापर करून भावी कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आली. स्थानिक लोकांचा विकासकार्यक्रमात क्रियाशील सहभाग हा कोणत्याही विकासाचा आत्मा असतो, हे तत्व वापरून केंद्राने प्रत्येक प्रक्रियेत शेतकऱ्यांचे सहाय्य घेतले. यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान केंद्रामार्फत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेहेडपाडा या गावात शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे विविध विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने येथील आदिवासी शेतकऱ्यांमध्ये चैतन्य फुलू लागले आहे.
एकात्मिक शेती अंतर्गत विविध आधुनिक तंत्रज्ञान देताना मुख्यतः शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे. यासाठी सर्वात आधी गावातील विविध पीक पद्धती, पिकांची उत्पादकता, उत्पादन खर्च यांचा अभ्यास करण्यात आला. शेतीसोबतच गावात असणारे परंपरागत शेतीपूरक जोडव्यवसाय यांचीही माहिती घेण्यात आली. महिला व लहान मुलांचे आरोग्य, महिलांमार्फत करण्यात येणारी शेतीची कामे व त्यातील अडचणी समजून घेण्यात आल्या.
त्याचबरोबर स्थानिक लोकांचे या व्यवसाय बद्दलचे मत, त्यांच्या गरजा, समस्या व तंत्रज्ञान अवलंबनासाठीची त्यांची इच्छाशक्ती जाणून घेण्यात आली. त्यानुसार स्थानिक लोकांच्या मदतीने आराखडा आखण्यात आला.
अशी केली प्रात्यक्षिकेपीक उत्पादकता वाढ याअंतर्गत भाताची चारसूत्री लागवड पद्धती, युरिया ब्रिकेटचा वापर, खुरासणी पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन तसेच कांदा पिकाच्या अॅग्रीफाऊंड लाईट रेड, लसणाची यमुना सफेद आणि वाल पिकाची कोकण भूषण व फुले सुरुची हे सुधारित वाण शेतकऱ्यांना पुरविण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवून आद्यरेषा प्रात्यक्षिके राबविण्यात आली. विद्यापीठाच्या रोपवाटिकेत तयार करण्यात आलेल्या केशर आंबा कलमे शेतकऱ्यांना पुरविण्यात आली आणि वरकस व मोकळ्या जागेवर या पिकांची लागवड करण्यात आली. पावसावर मोठ्या प्रमाणावर अवलंबित्व असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी याद्वारे अर्थाजनाचा श्रोत निर्माण करण्यात आला आहे.
पिकांसोबतच केंद्राने जोडधंदा विकासावरही भर दिला. परसातील कोंबडीपालन हा आदिवासी भागातील परंपरागत व्यवसाय. कोंबड्यांचे वजन वाढावे व अंडी देण्याची क्षमता वाढीस लागावी यादृष्टीने शेतकऱ्यांना ब्लॅक अॅस्ट्रोलॉर्प ही कोंबडीची प्रजात देण्यात आली. नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम ब्लॅक अॅस्ट्रोलॉर्प हि कोंबडीची प्रजात कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. तसेच शेळी पालनात वजन वाढ व जुळी पिले देण्याची क्षमता वाढविण्यासाठी केंद्राने शेळी वंशसुधार कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी गावात उस्मानाबादी शेळ्या व बोकड पुरविण्यात आले.
आणि महिलांचे श्रम कमी झालेशेतातील बहुतांश कामे महिला करतात हे लक्षात घेऊन, महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले गेले. यात विशेषतः महिला गटांना साळीपासून तांदूळ काढण्यासाठी मिनी राईस मिल, कापणीसाठी वैभव आणि लक्ष्मी विळे तसेच भुईमुग फोडणी यंत्र येथील आदिवासी महिलांना पुरविण्यात आले. भात पिकात भात कापणीसाठी मजुरांची उपलब्धता आणि होणारा जास्तीचा खर्च यावर उपाय म्हणून केंद्रामार्फत ग्रामीण युवकांच्या गटाला स्वयंचलित भात कापणी यंत्र या गावात देण्यात आले आहे. यामुळे मजूर आणि कापणीच्या खर्चात सुमारे ७० टक्के बचत होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
महिला व मुलांमध्ये असणाऱ्या प्रथिने व लोह कमतरता दूर करण्यासाठी प्रत्येक घराजवळ परसबाग उभारण्यात आली. यासाठी खास प्रथिने, लोह व शरीरास आवश्यक इतर अन्नद्रव्येयुक्त भाजीपाल्याचे बियाणे पुरविण्यात आले. धान्य साठविण्याची समस्या लक्षात घेऊन शास्रोक्त पद्धतीने धान्य साठविण्यासाठी धान्य पिशव्या देण्यात आल्या.
या भागात स्वयंपाक चुलीवर करण्यात येत असल्याने महिलांना धुरामुळे श्वसनाचे विकार होतात. शिवाय जळणासाठी सरपणही मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळे केंद्राने धूरविरहीत चुली ग्रामीण महिलांना पुरविल्या. त्यामुळे या चुलीवर कमी सरपनात अन्न शिजवता येते. याचबरोबर महिलांना पापड, कुरडया, लाडू व इतर प्रक्रियेचे कौशल्ये देण्यात येत आहेत.
स्वयंरोजगार निर्मितीमहिलांना शेती सोबतच अन्य व्यवसायातून आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून त्यांना मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण केंद्रामार्फत देण्यात येत आहे. तसेच या गावातील महिलांना सोलन, हिमाचल प्रदेश येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे मशरूम संशोधन केंद्रात नेऊन प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना इतर भागात करण्यात येणाऱ्या विविध उद्योगधंद्याची ओळख व्हावी, ते अभ्यासता यावे व त्याजोगे त्यांना विविध कामासाठी उद्युक्त करणेहेतू शेतकऱ्यांची अभ्यास सहल कांदा व लसून संशोधन केंद्र, राजगुरुनगर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव व बारामती, सावित्रीबाई फुले शेळी उत्पादक शेतकरी कंपनी, सिन्नर येथे नेण्यात आली. यादरम्यान त्यांना परसबागेतील सुधारित कोंबडीपालन, फळरोपवाटिका, भाताच्या विविध लागवड पद्धती, शेळी पालन, गांडूळखत प्रकल्प, मधुमक्षिकापालन यासारखे प्रकल्प दाखविण्यात आले.
सेंद्रिय शेती बेहेडपाडा गावातील प्रत्येक कुटुंबाला कम्पोष्ट बेड पुरविण्यात आले आहेत. त्यासोबत कृषी विज्ञान केंद्राच्या जैविक घटक प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले जैविक खते पुरविण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणावर बायो एनरीच कम्पोष्ट खत निर्मिती शेतकऱ्यांमार्फत तयार करण्यात येत आहे. तसेच, भात, नागली, कांदा, लसून, आदी पिकांत जैविक घटक वापरून खर्च कमी करण्यात येत असून उत्पादनवाढही करण्यात आली आहे.
अंमलबजावणी कार्यपद्धती प्रत्येक कार्यक्रम व आद्यरेषा प्रात्यक्षिके राबविण्याआधी त्यांना त्याविषयीचे सविस्तर प्रशिक्षण व कृती प्रात्यक्षिके देण्यात आली. त्यामुळे तंत्रज्ञान व त्याच्या वापराविषयीची भीती दूर करून आत्मविश्वासाने शेतकऱ्यांमार्फत ते राबविले गेले. उत्पादनाच्या विभिन्न टप्प्यांवर केंद्राच्या शास्त्रज्ञांनी भेटी देऊन वेळोवेळी समस्यांचे निवारण करून मार्गदर्शन केले. एकात्मिक शेतीच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे हे मॉडेल याच प्रकारच्या आदिवासी भागातही राबविणे व मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान अवलंबनातील दरी दूर करणे सहज शक्य होत आहे.
भारतातील ६५ टक्के लोकसंख्या अजूनही शेती व शेती निगडीत व्यवसायावर अवलंबून आहे. एका स्थित्यंतरातून शेतीची वाटचाल सुरु आहे. स्वातंत्र्यानंतर वाढत्या लोकसंख्येची भूक भागविणे हे सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. त्यामुळे उत्पादकता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले गेले. कृषि विस्तार यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यात आली. संशोधन संस्था जास्त उत्पादन देणाऱ्या जाती व उत्पादन तंत्रज्ञान यावर भर देऊ लागल्या. उत्पादन वाढीचा उद्देश फलद्रूप होऊ लागला.
विस्तार यंत्रणा व संशोधन संस्था यांच्या प्रयत्नामुळे भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण तर झालाच, शिवाय आता आपला देश शेतीमाल निर्यातही करू लागला आहे. त्यासाठी विस्तार यंत्रणांना आपल्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल करणे क्रमप्रात झाले. स्थानिक गरजा व समस्या, लोकांचा सहभाग, पिक पद्धती, जोडधंदा यावर आधारित तंत्रज्ञानाचा प्रसार हाच शाश्वत शेतीचा राजमार्ग आहे, ह्या निष्कर्षाप्रत आपण आलो असून एकात्मिक शेती पद्धती हा त्याचाच एक भाग आहे.
प्रत्येक उपक्रम राबविताना त्याची सद्यस्थितीतील उपयुक्तता, जास्तीचे उत्पन्न, संपूर्ण कुटुंबासाठी काम, गरज व समस्या निवारण व सर्वात महत्त्वाचे, म्हणजे त्यांचा क्रियाशील सहभाग या गोष्टी प्राधान्यक्रमाने ध्यानात घेतल्या गेल्या. आदिवासी कुटुंबे स्वावलंबी करणे, पिकांसोबतच जोडधंदे विकास व त्याद्वारे त्यांचे जीवनमान उंचावणे यामुळे एकात्मिक शेती पद्धती आदिवासी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
– डॉ. नितीन ठोके, वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख, कृषिविज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ