Join us

InterCropping : डाळिंबात घेतले तब्बल ७ आंतरपिके; वर्षाकाठी ६ लाखांचा नफा! नारायणगावच्या वसंत पिंपळे यांचा अनोखा प्रयोग

By दत्ता लवांडे | Published: August 21, 2024 6:48 PM

InterCropping : डाळिंबाच्या लागवडीपासून पहिल्या तोड्यापर्यंतचे अंतर हे १८ महिने ते २ वर्षांचे असल्याने तोपर्यंत वेगवेगळ्या आंतरपिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. 

जुन्नर येथील वसंत पिंपळे या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या डाळिंबाच्या शेतात एकाच वेळी सात आंतरपिके घेण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वीही ठरला. डाळिंबाची लागवड केल्यापासून एका वर्षाच्या आत सात आंतरपिकांपासून त्यांना ५ ते ६ लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे. आंतरपिकांच्या प्लॉटचा उत्कृष्ट नमुना त्यांनी आपल्या शेतात तयार केलाय.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा कृषी क्षेत्रात पुढारलेला तालुका. शेती तंत्रज्ञानाचा वापर, शेतीमध्ये नवे प्रयोग, नवनव्या शेतीपद्धती, प्रक्रिया उद्योग आणि पूरक उद्योगामध्ये पुण्यातील जुन्नर तालुका प्रमुख तालुक्यांपैकी एक. येथील शेतकऱ्यांचेही शेतीमधून मिळणारे उत्पन्न इतर भागांतील शेतकऱ्यांपेक्षा अधिक आहे. फळबागांची लागवड करत त्यामध्ये आंतरपिके घेऊन येथील शेतकरी चांगला नफा कमावत आहेत.

दरम्यान, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वसंत पिंपळे यांनी आपल्या २५ एकर क्षेत्रावर डिसेंबर महिन्यात डाळिंबाची लागवड केली होती. डाळिंबाच्या दोन ओळींतील अंतर १२ फुटाचे होते. तर डाळिंबाच्या लागवडीपासून पहिल्या तोड्यापर्यंतचे अंतर हे १८ महिने ते २ वर्षांचे असल्याने तोपर्यंत वेगवेगळ्या आंतरपिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. 

सात प्रकारची आंतरपिकेडाळिंबाची लागवड केल्यानंतर दोन दिवसांत पपई आणि पुढील दोन दिवसांत पपईच्याच रांगेत खरबुजाची लागवड करण्यात आली. त्यानंतर डाळिंबाच्या दोन झाडाच्या मध्ये शेवंतीची लागवड केली. पुढे पपईची वाढ झाली आणि खरबुजाचे पीक निघून गेल्यानंतर त्यामध्ये झेंडूचे पीक घेतले. झेंडूचे एक पीक घेतल्यानंतर पुन्हा झेंडूची लागवड त्याच बेडवर करण्यात आली. दरम्यान बांधावर गवती चहा आणि अंजिराची लागवड करण्यात आल्यामुळे त्यापासूनही वेगळे उत्पन्न मिळते. मोकळ्या जागेवर मक्याची लागवड करून त्यापासूनही पिंपळे यांनी उत्पन्न घेतले आहे. 

गवती चहापासून एक लाखांचे निव्वळ उत्पन्नत्यांनी आपल्या २५ एकर डाळिंबाच्या शेतातील बांधावर गवती चहाची लागवड केली आहे. तर काही ठिकाणी अंजिराची लागवड केली आहे. सुपर मार्केटमध्ये आणि मॉलमध्ये गवती चहाची थेट विक्री होत असल्यामुळे दररोज ५० ते ८० किलो गवती चहा विक्री केला जातो. तर कमीत कमी ३८ रूपये आणि जास्तीत जास्त ८० रूपयांपर्यंत दर मिळतो. त्यामुळे दिवसाला ४ हजार रूपयांच्या गवती चहाची विक्री होते. खर्च वजा जाता महिन्याकाठी १ लाख रूपयांचा निव्वळ नफा केवळ गवती चहातून मिळतो.

डाळिंबाचा सर्व खर्च आंतरपिकातून निघतोडाळिंबाच्या बागेत लावलेल्या पपई, शेवंती, झेंडू, खरबूज, अंजीर, गवती चहा, मका या पिकांतून खर्च वजा जाता ६ लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे. तर या पैशांतून डाळिंबाला लागणारा सर्व खर्च निघाला आहे. आंतरपिकांमुळे शेतीतील वेगवेगळ्या पिकांना रोगनियंत्रण आणि अन्नद्वव्याच्या व्यवस्थापनासाठी फायदा होतो. तर झेंडू, शेवंतीमुळे किडीवर नियंत्रण राहण्यास मदत होते असे पिंपळे सांगतात.  

वेगळा आदर्शपिंपळे यांच्या शेतात कुठेच मोकळी जागा दिसत नाही. योग्य व्यवस्थापन आणि वेळेचे गणित बसवून त्यांनी आपल्या एकाच शेतात तब्बल सात प्रकारची आंतरपिके घेऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरिपकांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो हे त्यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे