Join us

Young Farmer Success Story : तरूण शेतकऱ्याचा प्रयोग! कोबीच्या आंतरपिकातून अडीच महिन्यात २.५ लाखांचे उत्पन्न

By दत्ता लवांडे | Published: September 10, 2024 9:41 PM

जुन्नर येथील रोहन चव्हाण हा शेतकरी कोबीच्या आंतरपिकातून अडीच लाखांचे उत्पादन घेणार आहे.

Pune Young Farmer Success Story : शेतीमध्ये मुख्य पिकांमध्ये आंतरपिकांची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देतात. तर मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या लागवडीतून निघू शकतो. जुन्नर येथील पारगाव जवळ राहणाऱ्या रोहन चव्हाण या तरूण शेतकऱ्यानेही असाच प्रयोग केला आहे. त्यांनी उसाच्या मुख्य पिकामध्ये कोबीची लागवड केली असून यामधून त्याला अडीच लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

दरम्यान, रोहन यांनी जून महिन्याच्या २० तारखेला आपल्या दीड एकर शेतात उसाची लागवड केली. त्यानंतर चार दिवसात आंतरपीक म्हणून कोबीची लागवड केली. दीड एकरातील उसामध्ये जवळपास ३० हजार कोबीची रोपे त्यांना लागली. दोन सऱ्यांमध्ये दोन कोबीच्या ओळी अशा पद्धतीने लागवड केली. तर ९० पैसे प्रतिरोप याप्रमाणे त्यांनी रोपे विकत घेतली होती. 

कोबीची लागवड केल्यानंतर विविध खते आणि फवारणी केली. बऱ्याचदा उसासाठी आणि कोबीसाठी एकसारखेच खतांचे डोस त्यांनी दिले. लागवड केल्यापासून अडीच महिन्यात कोबीचे पीक काढणीसाठी तयार झाले आहे. सध्या त्यांच्या कोबीच्या गड्ड्या या एक किलो ते दीड किलो वजनाच्या झाल्या आहेत. तीस हजार रोपांमधील मर वजा जाता प्रतिरोप एक किलो वजन पकडले तरी त्यांना दीड एकराच्या कोबी आंतरपिकातून २५ टनापेक्षा जास्त उत्पादन अपेक्षित आहे.

सध्या कोबीला १० रूपये किलोप्रमाणे बाजारात दर मिळतो आहे. तर दीड एकरातून आलेल्या २५ टन उत्पादनातून त्यांना अडीच लाख रूपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. साधारण ६० ते ७० हजार रूपयांचा खर्च वजा केला तर त्यांना १ लाख ८० हजार रूपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहणार आहे. मुख्य पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा नफा त्यांना या आंतरपिकातून मिळणार आहे.

कोणत्याही मुख्य पिकांमध्ये शेतकरी आंतरपिके घेऊन त्यातून चांगला नफा मिळवू शकतात. तर उसाच्या पिकामध्ये हरभरा, गहू, कोबी, फुलकोबी, कांदा, मुळा, मका अशी आंतरपिके घेता येतात. यामुळे केवळ दोन ते तीन महिन्यामध्ये शेतकऱ्यांना मुख्य पिकांएवढे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे आंतरपिके ही शेतकऱ्यांना समृद्ध करणारी ठरू शकतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊसपुणे