शेखर पानसरेसंगमनेर : तालुक्यातील वडगाव लांडगा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पडीक, मुरमाड जमिनीवर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आणि अभियंता असलेल्या त्यांच्या मुलाने इस्राइल पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलविली आहे.
अवघ्या १२ गुंठा जागेत १०० झाडे आहेत. पडीक जमिनीवर केलेला आंबा लागवडीचा प्रयाेग यशस्वी झाला आहे.
पुढील वर्षी या झाडांची फळे चाखायला मिळतील, असे सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक दिलीप दत्तात्रय लांडगे, त्यांचा मुलगा अभियंता अजय लांडगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
लांडगे यांनी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक अशा बड्या शहरांमध्ये नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतर कुटुंबीयांसमवेत शहरात न राहता, वडगाव लांडगा येथे येऊन शेती करायची, असे त्यांनी ठरविले होते.
शेतमालाला भाव नाही, अवकाळी पाऊस यामुळे पारंपरिक पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे हे पितापुत्र वेगळ्या पद्धतीने शेती करण्याच्या शोधात होते. अभियंता अजय लांडगे याने इस्राइल पद्धतीने केशर आंब्याची लागवड याबाबत इंटरनेटवर माहिती मिळवली.
आपल्याकडील पारंपरिक पद्धतीनुसार लागवड केल्यास एक एकर क्षेत्रात खूपच कमी प्रमाणात आंब्याच्या रोपांची लागवड होते.
मात्र, तीच लागवड इस्राइल पद्धतीने केल्यास अधिकाधिक रोपे लावणे शक्य आहे. त्यासाठी त्यांनी काही कृषितज्ज्ञांचा सल्लादेखील घेतला. मातीपरीक्षण, पाणीपरीक्षण करून घेतले.
या पद्धतीने केली रोपांची लागवड१) पडीक जमिनीवर इस्राइल पद्धतीने केशर आंब्याच्या रोपांची लागवड करताना दोन झाडांमधील अंतर साधारण तीन-चार फूट तर लांबीचे अंतर १२ फूट इतके आहे. यालाच ‘क्लोज प्लांटेशन’ असे म्हणतात. ही अद्ययावत पद्धत आहे.२) ठिबक सिंचन पद्धतीने रोपांना पाणी दिले. दाेन वर्षांपूर्वी रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यावेळी काही रोपे जळाली. तेथे पुन्हा नवीन रोपे लावण्यात आली. त्यानंतर सर्वच रोपे जगली. रोपांचे रूपांतर झाडांमध्ये झाले आहे.३) पाणी देताना, खते टाकताना नियोजन करावे लागते. वर्षातून एकदा झाडांची छाटणी केली जाते. पुढील वर्षी एका झाडाला साधारण २० ते २२ किलो आंबे लागतील. जशीजशी बाग फुलेल तसे भविष्यात उत्पन्नही वाढेल. सध्या एका झाडाची उंची साडेपाच ते सहा फूट इतकी आहे.
इंटरनेटवर कृषीच्या संदर्भाने परिपूर्ण माहिती- मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी संपादन करून आंतरराष्ट्रीय कंपनीत मुंबईमध्ये नोकरी करणारा अभियंता अजय लांडगे हादेखील शनिवार, रविवार गावाकडे असतो. त्याने सांगितले की, इंटरनेटवर कृषीच्या संदर्भाने असलेल्या परिपूर्ण माहितीचा पुरेपूर उपयोग केला.- वडील आणि मी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे या गावात गेलो होतो.- तेथील इस्राइल पद्धतीने केशर आंब्याच्या बागेला भेट देत, त्यासंदर्भाने अधिकाधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतरच पुढील पाऊल टाकले.- सध्या केवळ १२ गुंठ्यांत केलेला केशर आंबा लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला. त्याबरोबरच शेतीत इतरही प्रयोग करणार आहे.
अधिक वाचा: शेतकरी गणपत औटी यांच्या साडेपाच फूट लांबीचा दुधीभोपळ्याची तालुक्यात चर्चा वाचा सविस्तर