Join us

Jamun Success Story : दौंडच्या भुजबळांनी जांभुळ शेती करत, ‘जांभळाचा ब्रँड’ कसा तयार केला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 8:19 PM

Jamun Success story: डाळिंब पिकाऐवजी दौंडचे प्रयोगशील शेतकरी भुजबळ हे जांभूळ (Jamun Farming) शेतीकडे वळले. आता त्यांचा जांभळाचा ब्रँड तयार झालाय. तुम्हीही असा ब्रँड तयार करू शकता.

Jamun Success Story: पारंपारिक शेतीला फाटा देऊन डाळिंबाऐवजी बांधावरील फळझाड समजल्या जाणाऱ्या जांभळाची शेतात लागवड करत दौंड तालुक्यातील दिनेश भुजबळ हे लाखोंचे उत्पादन घेत आहेत. कोरोना काळात थेट जोडलेल्या ग्राहकांना ते रसरशीत आणि ताजे जांभळे घरपोहच देतात. यामुळे ग्राहकांची विश्वासार्हता कमावून त्यांनी आपल्या जांभळाचा ब्रँड तयार केला आहे. 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका हा उसासाठी आणि फळपिकांसाठी ओळखला जातो. येथील राहू परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड केली जाते. येथीलच पिल्लनवाडी गावचे रहिवाशी दिनेश भुजबळ हे शेतकरी आपल्या शेतात बऱ्याच वर्षांपासून डाळिंबाची लागवड करत होते. पण २०१४ साली त्यांनी डाळिंब बाग काढून जांभूळ लागवड करण्याचा निर्णय घेतला. सव्वादोन एकरामध्ये त्यांनी २२५ झाडे लावली असून ही बाग आता १० वर्षांची झाली आहे. 

जांभूळ लागवड केल्यापासून ५ व्या वर्षी फळे लागायला सुरूवात झाली आणि तेव्हापासून त्यांनी थेट ग्राहकांना विक्री करायला सुरूवात केली. कोरोना काळामध्ये त्यांना विक्री करण्यास खूप अडचणी आल्या. म्हणून त्यांनी आपला माल थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी घेतलेला निर्णय फायद्याचा ठरला आणि अजूनही भुजबळ हे आपल्या शेतातील जांभळे त्याच ग्राहकांना घरपोहच देतात. त्यामुळे भुजबळ यांच्या शेतातील जांभुळांवर ग्राहकांचा विश्वास बसलाय.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री  भुजबळ यांच्या बागेला २०१९-२० साली फळधारणा झाली पण २०२० साली लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना थेट विक्रीसाठी अडचणी आल्या. यावर मात करत त्यांनी फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करत थेट ऑनलाईन पद्धतीने ग्राहक मिळवले आणि विक्री सुरू केली. आज ते उत्पादित झालेल्या मालातील ८० टक्के माल थेट ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने विक्री करतात.

ताज्या जांभळांची विक्रीजांभूळ झाडावरून तोडले की दोन तासांमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सोय ते करतात. त्यामुळे ग्राहकांना ताजे फळ खायला मिळते. ताज्या फळाला ग्राहक किंमत मोजायला मागेपुढे पाहात नाहीत असा त्यांचा अनुभव आहे.

प्रतवारीझाडावरून जांभळांची तोडणी केल्यानंतर प्रतवारी केली जाते. जांभळाच्या आकारानुसार त्याची पॅकिंग केली जाते. मोठ्या आकाराच्या जांभळाचीच ग्राहकांना विक्री केली जाते. प्रतवारी करताना जांभळावर डाग आणि साल निघाली नसल्याची खात्री केली जाते. एक किलो, दोन किलो आणि मागणीप्रमाणे पॅकिंग केले जाते. 

ब्रँड बनवलाभुजबळ यांच्याकडील जांभूळ खात्रीचे आणि चवीला उत्तम असल्यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. यातच भुजबळ यांनी ब्रँडची जोड दिली आणि गणेश गार्डन - भुजबळ फार्म या नावाने बॉक्स पॅकिंग करायला सुरूवात केली. यामुळे ग्राहकांना जांभळाची क्वालिटी चांगली मिळायला लागली आणि भुजबळ फार्मच्या जांभळाची जाहिरात होण्यासही मदत झाली. आज ते पूर्व पुणे भागांत आपल्या जांभळांची विक्री करतात.

उत्पन्नभुजबळ यांनी लागवड केलेल्या २२५ झाडांतील साधारण १०० झाडांना दरवर्षी माल लागतो. बाकीच्या झाडांना पुढील वर्षी माल लागतो. त्यामुळे झाडांच्या मालाची सरासरी कमी निघते. एका झाडाला एका वर्षाला साधारण ५० किलोपर्यंत माल निघतो असं ते सांगतात. यातून १२ ते १३ लाखांची वार्षिक उलाढाल होते.

टॅग्स :फलोत्पादनशेती क्षेत्रशेतकरी