Join us

जम्मू काश्मीरचं सफरचंद पिकतंय कोल्हापूरच्या मातीत; यळगूडचे शेतकरी अनिल यांचा प्रयोग यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:11 IST

Farmer Success Story जम्मू काश्मीर भागातून येणारी सफरचंदे आता कोल्हापूरच्या मातीत पिकत आहेत. येथील हवामानात बदल असला तरी शेतकरी सफरचंदाची शेती करू शकतो, हे यामुळे सिद्ध झाले आहे.

दुर्वा दळवीकोल्हापूर : जम्मू काश्मीर भागातून येणारी सफरचंदे आता कोल्हापूरच्या मातीत पिकत आहेत. येथील हवामानात बदल असला तरी शेतकरी सफरचंदाची शेती करू शकतो, हे यामुळे सिद्ध झाले आहे.

हातकणंगले तालुक्यातील यळगूड येथील अनिल माणगावे यांनी अर्ध्या एकरात सफरचंदाची लागवड केली आहे. सफरचंदासोबत केशर आंबा, पेरू, चिकू, शेवगा, कांदे, लसूण ही आंतरपिके घेतली आहेत.

माणगावे यांचे शिक्षण सातवीपर्यंतच झाले आहे. शिक्षण कमी असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून सफरचंदाची लागवड कशी करावी, याची माहिती घेऊन हा प्रयोग यशस्वी केला.

सफरचंदाची शेती त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर केली असून, ५० झाडे लावली आहेत. यातील प्रत्येक झाडाला सुमारे ३० ते ३५ फळे लागली असून, एका झाडापासून पाच किलो सफरचंदाचे उत्पादन मिळते.

झाडांसाठी खड्डे काढून त्यात लागवड केली. यासाठी माणगावे यांनी केवळ शेणखताचा वापर केला आहे. डिसेंबरपासून झाडांना पाणी देणे बंद केले.

पानगळीनंतर झाडांना नव्याने पालवी फुटली. फुले आल्यानंतर मार्चमध्ये फळ धरण्यास सुरुवात होते. एप्रिल-मेमध्ये सफरचंद लागतात.

सफरचंदाचा आकारही मोठा असून, रंग, चवही उत्तरेतून येणाऱ्या फळासारखी आहे. साधारणपणे या झाडाला जे तापमान आवश्यक असते ते असल्याने माणगावे यांना हे पीक घेताना कोणतीही अडचण आली नाही.

पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले असून, पंचक्रोशीतील शेतकरी त्यांच्या सफरचंदाच्या शेतीला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

आंतरपिकेही देतात उत्पन्नसफरचंदासोबतच माणगावे यांनी केसर आंब्याची लागवड केली आहे. याची २१० झाडे लावली आहेत. यासोबतच पेरू, चिकू, शेवगा, कांदा, लसूण, भुईमूग ही आंतरपिके त्यांनी घेतली आहेत. त्यामुळे अर्ध्या एकर शेतीत भरघोस उत्पन्न मिळाले आहे.

व्यवसाय सांभाळून शेतीसाठी विशेष वेळ- माणगावे यांची वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती आहे, ज्यात उसाची लागवड तीन एकरात केली जाते. अर्ध्या एकरात आंतरपिके माणगावे कुटुंबीय घेतात.- माणगावे हे व्यावसायिक असून, घरचे सर्वच सदस्य शेतीसाठी वेळ देतात. त्यामुळेच विविध पिकांची लागवड करून हे प्रयोग ते यशस्वी करतात.

अधिक वाचा: ओतूरचे शेतकरी शरदराव यांचा केळी शेतीत नवा प्रयोग; घेतले शुगर फ्री लाल केळीचे उत्पादन

टॅग्स :शेतीशेतकरीपीककोल्हापूरजम्मू-काश्मीरफळेफलोत्पादन