Lokmat Agro >लै भारी > जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड

जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड

Jigarbaz two friends rent farming... Education and experience combination got good success in watermelon crop | जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड

जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड

बी. एस्सी. ॲग्रीच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या प्रितम व प्रथमेश या दोन जिगरबाज विद्यार्थ्यानी तळसंदेत ३५ गुंठे कलिंगडाची शेती वाट्याने कसून जोमदार पीक आणले आहे. दोघांचे हे कष्ट कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.

बी. एस्सी. ॲग्रीच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या प्रितम व प्रथमेश या दोन जिगरबाज विद्यार्थ्यानी तळसंदेत ३५ गुंठे कलिंगडाची शेती वाट्याने कसून जोमदार पीक आणले आहे. दोघांचे हे कष्ट कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

दिलीप चरणे
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दोघा बळीराजाच्या मुलांनी वाट्याने शेती करून कृषी शिक्षणाला अनुभवाची जोड दिली आहे.

बी. एस्सी. ॲग्रीच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या प्रितम व प्रथमेश या दोन जिगरबाज विद्यार्थ्यानी तळसंदेत ३५ गुंठे कलिंगडाची शेती वाट्याने कसून जोमदार पीक आणले आहे. दोघांचे हे कष्ट कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.

तळसंदेच्या डीवायपी कृषी ॲग्रीच्या चौथ्या वर्षात प्रितम राजेंद्र चव्हाण (रा. चिखलहोळ, ता. खानापूर, जि. सांगली) व प्रथमेश पांडुरंग आडसूळ (रा. मळगे खुर्द, ता. कागल) हे दोघे शिकत आहेत. दोघेही शेतकऱ्याची मुले आहेत.

दोघांनी विचार करून कृषी शिक्षण घेताना प्रात्यक्षिक म्हणून प्रत्यक्ष शेतीत घाम गाळत कसून अनुभव घेण्याचे ठरविले. एखाद्या शेतकऱ्याची शेतीच आपण वाट्याने करू असा निर्णय त्यांनी घेतला. तळसंदे लगतच्या शिवारात पोपट पाटील यांची ३५ गुंठे जमीन त्यांनी वाट्याने घेतली.

प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कलिंगडाचे तीन महिन्याचे पीक घेण्याचे त्यांनी पक्के केले. निरस व मुरमाड क्षेत्र त्यांनी निवडले. नांगरट करून रोटर मारला. बेड करून ड्रीप अंथरून मल्चिंग केले. शुगर फॅक्टरी नावाचे कलिंगडाचे वाण निवडले.  

उशिरा हंगाम मिळाल्याने रोपे लावलेली खराब झाली. तरी त्यांनी जिद्द सोडली नाही. खराब होत असलेल्या कलिंगडाच्या रोपांचे योग्य ते संगोपन करून ती त्यांनी जगवली. ड्रीप मध्येही अनंत अडचणी आल्या तरीही दोघांनी त्याच्यावर मात केली.

वाट्याच्या शेतीसाठी अन्य मजूर त्यांनी घेतले नाहीत. आपण शेतकऱ्याची मुले असल्याने प्रत्यक्ष घाम गाळून स्वतः कष्ट केल्याचे प्रितम व प्रथमेश यांनी सांगितले. दोघा मित्रांनी कर्ज धरून १ लाख ६० हजार उत्पादन खर्च केला आहे. घरी माहिती न देता हे त्यांनी धाडस केले आहे. घराकडून खर्चासाठी दिलेले पैसे साठवून त्यांनी या कामाची सुरुवात केली. थोडे कर्ज घेऊन उत्पादन खर्च केला आहे.

आता त्यांचे कलिंगड पीक तोडणीला आले आहे. सध्या बाजारात १३ रुपये किलो कलिंगडाचा दर सुरू आहे. शेतात तयार झालेल्या कलिंगडाचे आता ४ ते ७ किलो पर्यंत वजन भरत आहे. पिकाची वाढ अजून  सुरूच आहे. ३० टन कलिंगड उत्पन्न निघून ३ लाखांपर्यंत पैसे येतील अशी दोघांची अपेक्षा आहे. वाट्याच्या शेतीत कष्ट करताना कॉलेजला एकही दांडी न मारता त्याने हा प्रयोग यशस्वी केला आहे.

यामध्ये दोघांचे अपार कष्ट आहेत. प्रतिक ताकमारे व संदेश कदम व इतर मित्रांनीही त्यांना साथ दिली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, कार्यकारी संचालक अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डी. एन. शेलार यांची त्यांना प्रेरणा मिळाली असल्याचे प्रितम व प्रथमेश यांनी स्पष्ट केले.

कृषी शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना प्रितम व प्रथमेश यांच्या या उपक्रमा पासून प्रेरणा मिळेल. कृषीचे विद्यार्थी असे धाडसी प्रयोग करून नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे शेती व्यवसाय अधिक समृद्ध करतील अशी आशा वाटते. - प्रा. योगेश पाटील, डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे

Web Title: Jigarbaz two friends rent farming... Education and experience combination got good success in watermelon crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.