दत्ता कदममांडवगण फराटा : पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील रामदास काळे व सचिन रामदास काळे या शेतकरी पिता-पुत्रांनी एक एकरात सुमारे पंचवीस टन कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेऊन अवघ्या दोन महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. त्यांच्या शेतातील कलिंगडे दुबईला निर्यात केली आहेत.
रामदास मारुती काळे यांना सन २०१९-२० सालचा पुणे जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर त्यांचे पुत्र सचिन काळे हे कृषी पदवीधर आहेत.
आपल्या शेतात केळी, डाळिंब, कलिंगड अशाप्रकारची फळ पिके घेण्यावर त्यांचा भर आहे. पारंपरिक ऊस शेतीबरोबरच कांदा लागवडीतूनही त्यांनी भरघोस उत्पन्न मिळविले आहे.
शेती करीत असताना योग्य नियोजन, खर्चाची बचत व पिकाची योग्य काळजी घेतल्यास भरघोस उत्पादन मिळू शकते व आपल्याला चांगला नफा मिळू शकतो, असे सचिन काळे यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागात उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी समजली जाते. शहरात मात्र नेमके याच्या उलट आहे. शेतकऱ्यांनी कष्ट घेतले तर यश मिळतेच हे स्पष्ट होत आहे.
ठिबक सिंचनाचा यशस्वी वापर- सर्वसाधारणपणे अनेक शेतकरी रमजानच्या महिन्यात तोडणीस येतील या अंदाजाने जानेवारी महिन्यात कलिंगडाची लागवड करतात. मात्र, सचिन काळे यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या शेतात कलिंगडाची लागवड केली होती.- लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून एकरात दोन ट्रेलर कुजलेले शेणखत टाकले. रेडारच्या सहाय्याने सात फूट अंतरावर बेड तयार करण्यात आले. लागवडीपूर्वी खतांचा बेसल डोस देण्यात आला. पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला.
एका एकरात १९ टन उत्पादन- एका एकरात कलिंगडाचे पीक घेण्यासाठी रोपे, शेणखत, रासायनिक खते, विद्राव्य खते, बुरशीनाशके, कीटकनाशके, सापळे यासाठी सुमारे पंचाहत्तर हजार रुपये खर्च आल्याचे सचिन काळे यांनी सांगितले.- एका एकरात त्यांनी १९ टन निर्यातक्षम कलिंगडाचे उत्पादन घेतले. या कलिंगडांना अकरा हजार रुपये प्रति टन बाजारभाव मिळाला तर उर्वरित सहा टन कलिंगडे स्थानिक व्यापाऱ्यांना सहा हजार रुपये प्रति टन दराने विकली.- कलिंगडाच्या विक्रीतून त्यांना सुमारे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये मिळाले. खर्च वजा जाता काळे पिता-पुत्रांनी एक लाख सत्तर हजार रुपये नफा अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत मिळवून परिसरातील शेतकऱ्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे.
अधिक वाचा: पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल